‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

By यदू जोशी | Published: May 26, 2023 12:18 PM2023-05-26T12:18:29+5:302023-05-26T12:19:58+5:30

महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही.

maha Vikas Aghadi which brother is younger, which is twin and which is mole? Time is so early, BJP will be careful | ‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

googlenewsNext

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाविकास आघाडीत नवीन भावकी सुरू झाली आहे. कोण मोठा, कोण लहान यावरून वाद पेटला आहे. जन्मतारखेवरून लहान- मोठा भाऊ ठरवता येतो; पण पक्षांबाबत तो निकष लागत नाही. लहान- मोठ्याच्या वादात ‘आम्ही तर तिळे भाऊ’ हा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा युक्तिवाद वादावर पडदा टाकण्यासाठी योग्य वाटला; पण तो तिन्ही पक्षांकडून स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. दुसरे चव्हाण म्हणजे पृथ्वीराजबाबांनी आधी राष्ट्रवादी मग काँग्रेस अन् शेवटी शिवसेना, असा क्रम लावत मातोश्रीला धाकली पाती ठरवले. काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून ठाकरेंच्या शिवसेनेला लहान ठरवत आहेत. 

ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दिसत असताना त्यांना लहान कसे करायचे, त्यांचे महत्त्व कमी कसे करायचे, हा प्रश्न भाजपला सतावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्षच भाजपला जणू आपणहून मदत करत आहेत. महाविकास आघाडीसाठी ठाकरेंबद्दलची सहानुभूती हा मोठा फॅक्टर आहे व त्यातूनच त्यांची प्रतिमा मित्रपक्षांच्या नेत्यांपेक्षा मोठी बनली आहे. ठाकरेंना मविआचे नेते मानले की, मग त्यांच्या पक्षाकडेच मविआचे नेतृत्व जाईल. म्हणजे पुन्हा आपल्याला क्रमांक दोन, तीनवर बसावे लागेल. हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना नको आहे, त्यातूनच ठाकरेंना लहान ठरवणे सुरू झाले आहे. भाजपला तेच हवे आहे.

हे सगळे सुरू होण्याआधी साधारणत: दोन महिने आधी इथेच लिहिले होते की, कोण लहान, कोण मोठा यावरून महाविकास आघाडीत वाद पेटेल. १५ आमदार अन् ५ खासदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची वा लोकसभेच्या जागा देण्याची इतर दोघांची तयारी नसेल. तसेच घडत आहे. 

आपल्या ताकदीची कल्पना नसलेली शिवसेना गतवैभवाच्या आधारे अडून बसली आहे. ‘आम्ही तिन्ही भाऊ एकत्र राहतो, फक्त किचन वेगवेगळे आहे’ असे काही जण सांगतात; तिघांनी वेगवेगळे होणे हा त्यानंतरचा टप्पा असतो. महाविकास आघाडी सध्या किचन एक असण्याच्या टप्प्यात आहे. देशपातळीवर भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकवटत असताना महाराष्ट्रातील मविआचे नेते एकमेकांवर टीका करत सुटले आहेत. भाजपच्या विरोधातील वातावरणाचा एकत्रित फायदा मविआला महाराष्ट्रात घेता आला नाही, हे विश्लेषण समोर येईल तेव्हा उशीर झालेला असेल. 

भिन्न विचारांचे पक्ष भाजपच्या विरोधात एकवटून सत्तेत येऊ शकतात हे मॉडेल महाराष्ट्राने २०१९ मध्ये देशाला दिले. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठीचा शंखनाद महाराष्ट्रातून होऊ शकतो, हा विश्वास घेऊन देशभरातील दिग्गज नेते मुंबईत येऊन शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटत आहेत.   

नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे तीन- तीन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येऊन गेले. आणखीही काही नेते येतील. एकीकडे महाराष्ट्राबद्दल हा विश्वास देशातील नेत्यांना वाटत असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र एकमेकांना सान- थोर  ठरवत फिरत आहेत. 

हा विरोधाभास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदारांना अस्वस्थ करणारा आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणे काँग्रेसला मान्य नसणार. राष्ट्रवादीही ते मान्य करणार नाही. त्यावर सामूहिक नेतृत्व हाच तोडगा असू शकेल. 

ती चर्चा भाजपच्या पथ्यावर
लोकसभेची निवडणूक आणखी दहा महिन्यांनी आहे. विधानसभा निवडणुकीला तर आणखी १७ महिने आहेत. मग मविआतील जागावाटपाची चर्चा आतापासूनच कशासाठी? तीन पक्षांत कोणते मतदारसंघ कोणाला, हे आतापासूनच ठरले, तर ते महाविकास आघाडीसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार व कोणता उमेदवार असू शकेल, याचा नेमका अंदाज भाजपला ८-९ महिने आधीच येईल आणि आपला उमेदवार ठरविणे सोपे जाईल. 
मविआला तयारीसाठी जास्त अवधी मिळेल, हे खरे असले तरी आपल्या पक्षाला जागा न मिळालेले; पण इच्छुक असलेले नेते भाजपच्या गळाला लागू शकतील. जागावाटपाची बोलणी आताच करण्यामागे बाहेरच्या कुणाचा वा आतल्या कुणाचा चक्रव्यूव्ह तर नाही हेही तपासले पाहिजे.

Web Title: maha Vikas Aghadi which brother is younger, which is twin and which is mole? Time is so early, BJP will be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.