मुक्काम पोस्ट महामुंबई - अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
उद्या २२ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची अधिसूचना निघाली की, उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होईल. भाजपने पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. महाविकास आघाडीत अजून जागांचा घोळ कायम आहे. जशा याद्या जाहीर होतील तसे बंडखोर सक्रिय होतील. आज रात्री भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची मीटिंग मुंबईत ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. शिंदेसेनेचे नेते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. उद्धवसेनेचे नेते मातोश्रीवर बैठका घेत आहेत.
काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते नावांची यादी अंतिम करण्यात गुंतून पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर फिरणारा एकही नेता काँग्रेसकडे आज नाही. शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढून मागील तीन दिवसांपासून आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी ते मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांच्या जोडीला आपली शिवस्वराज्य यात्रा संपवून जयंत पाटीलही मुंबईत आहेत.
उद्धव ठाकरे गटातही संजय राऊत, अनिल देसाई अशी मंडळी यादीच्या कामात आहेत. बाकीच्या नियोजनात ठाकरे पिता-पुत्र आहेत. भाजपमध्ये बऱ्यापैकी यादीचे काम नियंत्रणात आले होते. त्यामुळे त्यांनी ९९ जणांची यादी जाहीर करून टाकली. शिंदेसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जी यादी येईल ती अंतिम असेल.
अजूनही प्रचाराचा माहोल म्हणावा तसा सुरू झालेला नाही. ठाकरे आणि शरद पवार गटातून प्रत्येकी ४० आमदार दुसऱ्या गटात गेल्यामुळे दोघांच्या मिळून ८० जागा रिकाम्या झाल्या आहेत. या दोन्ही पक्षात इनकमिंग करणाऱ्यांना चांगली संधी आहे. अजित पवार गटाला किती जागा मिळणार, हेच माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडचेच अनेक जण इतर पक्षात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ६६ मतदारसंघांवर कोण वर्चस्व मिळवेल? कोणाचा स्ट्राइक रेट चांगला असेल? त्यावर राज्याचे नेतृत्व ठरू शकते. बंडखोरीची लागण ठाणे जिल्ह्यात जास्त आहे. भाजप नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यापूर्वी ऐरोली मतदारसंघातून ते दोन वेळा निवडून आले होते, यावेळी त्यांना भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या जागी बेलापूरमधून उमेदवारी हवी होती. मात्र भाजपने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर गणेश नाईक यांना ऐरोलीमधून उमेदवारी दिली आहे. वडिलांना उमेदवारी मिळाल्याने आता संदीप नाईक काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल.
अशीच परिस्थिती उल्हासनगरची आहे. गेल्या चार निवडणुका पप्पू कलानी विरुद्ध कुमार आयलानी अशा झाल्या. यंदाही याच वळणावर ती निवडणूक जाईल असे चित्र आहे. कुमार आयलानी यांना अंतर्गत विरोधाचा जोरदार सामना करावा लागणार आहे. त्यातून त्यांच्याविरुद्ध कोणी उभे राहिले तर आश्चर्य नाही. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणू असा शब्द शेकापचे जयंत पाटील यांनी दिला होता. मात्र ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे आता ठाकरे यांना शेकापची सोबत नकोशी झाल्याची चर्चा आहे. तसे झाले तर रायगड जिल्ह्यातही बंडखोरी होऊ शकते.
डोंबिवली विधानसभेतून भाजपचे विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात शिंदेसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी बंडखोरी करून उद्धवसेनेतून उमेदवारीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तेथे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी त्याला विरोध केला आहे. जर दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली तर थरवळही बंडखोरी करतील. कल्याण पूर्व मध्ये भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथून शिंदेसेनेचे महेश गायकवाड बंडखोरी करून उभे राहण्याची शक्यता आहे.
कल्याण पश्चिमेला भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार प्रयत्नात होते. मात्र, तेथे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर दावेदार आहेत. तिथेही शिंदे गटाकडून रवी पाटील, श्रेयस समेळ बाशिंग बांधून तयार आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेसेनेतच चुरस आहे. माजी उपमहापौर रमाकांत मढवी, राजेश मोरे, महेश पाटील, राजेश कदम, विश्वनाथ दुबे एवढी मंडळी इच्छुक असताना बाशिंग एकालाच बांधले जाईल. तेव्हा बाकीचे काय करतील, हा प्रश्नच आहे.
शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर जोगेश्वरी पूर्व मधून उभे राहण्याची तयारी करत आहेत. तसे झाले तर भाजप त्यांच्याविरोधात किंवा नोटाला मतदान करेल. विलेपार्लेमधून भाजपचे विद्यमान आमदार पराग आळवणी दोन वेळा निवडून आले आहेत. भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ही जागा शिंदेसेनेला मिळावी म्हणून डॉ. दीपक सावंत प्रयत्न करत होते. तर भाजपकडून संजय उपाध्येही इथून प्रयत्नशील होते.
दिंडोशीची शिंदेसेनेची जागा भाजपला दिली तर शिंदेसेनेचे इच्छुक अपक्ष म्हणून मैदानात उतरतील. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी इच्छुक आहेत. भाजपने पहिल्या यादीत इथला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे इथे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. हीच परिस्थिती भाजपकडे असलेल्या घाटकोपूर पूर्व (आमदार पराग शहा) आणि वर्सोवा (आमदार भारती लव्हेकर) यांच्या मतदारसंघात आहे. या दोन्ही विद्यमान आमदारांना पक्षाने वेटिंगवर ठेवले आहे. घाटकोपूर पूर्व मधून प्रकाश मेहता उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. इतर पक्षांच्या उमेदवाऱ्या जशा जाहीर होतील तसे बंडखोरीची लाट किती तीव्र असेल हे लक्षात येईल.