- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीला होते असे मानले जाते; परंतु मी, माझे मित्र आणि ‘लोकमत’ परिवार दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा कार्यक्रम थोडा आधीच सुरू करतो. मी जेव्हा ‘परिवार’ असा शब्द वापरतो तेव्हा मला सातत्याने उदंड प्रेम देणारे तुम्ही वाचकही त्यात येताच येता! दिवाळी आहे... आपण आपला आनंद व्यक्त करत नाही, प्रेमाच्या प्रकाशात आपल्या प्रियजनांना पाहत नाही, तोवर दिवाळीचा आनंद अधुरा राहतो; म्हणून सर्वात आधी आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!
गतवर्षीपेक्षा ही दिवाळी पूर्णपणे वेगळी ठरणार आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. ऐन दिवाळीतल्या यावर्षीच्या निवडणुकीचा विचार करत असताना मला अचानक लहानपणी वाचलेला एक मोठा अर्थपूर्ण वाक्प्रचार आठवला; ‘मन ही मन में लड्डू फुटे, हाथो मे फुलझडियां.’ मनात आनंदाचे, उत्साहाचे लाडू फुटणे आणि हातात फुलबाजा असणे ही दोन्ही आनंदाची प्रतीके होत. परंतु, निवडणुकीच्या हंगामात पात्रे मात्र वेगवेगळी आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या मनात स्वाभाविकपणे लाडू फुटत आहेत.
आता हे लाडू खरोखरच कोणाचे तोंड गोड करणार हे सांगणे मात्र कठीण असले, तरी ज्यांच्या मनात लाडू फुटत आहेत ते आपल्या मतदारांचे तोंड गोड करू पाहतील आणि आपल्या भागात विकासाची गंगा आणण्याच्या फुलबाजाही धडाडून फुलवतील हे मात्र नक्की! खरोखरीच विकासाला वाहून घेतलेले अनेक नेते आहेत हे मी जाणतो. परंतु, पोकळ बाता करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीच्या उत्सवात यावेळी मतदारांच्या जीवनात दिवाळी येईल, असे मानायला हरकत नाही. आता दिवाळीच्या काळात निवडणुका आल्याच आहेत तर मतदारांचे आगत-स्वागतही त्याच हिशोबाने होणार. एरव्ही पाच वर्षे मतदारच नेताजींचे तोंड गोड करत असतात. ते कुठे दिसले-भेटले की, लगोलग त्यांना पुष्पहार घालतात आणि ते आपल्या मतदारसंघात आलेच तर फुलबाजाच काय पण फटाक्यांच्या माळाही लावतात. लोकशाहीच्या या भारतीय शैलीत मला अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता, त्यातल्या काही ओळी पुन्हा पुन्हा आठवतात...
‘हम पडाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आखों से ओझल वर्तमान के मोहजाल मे आनेवाला कल न भुलाये आओ फिर से दिया जलाये.. आहुती बाकी यज्ञ अधुराअपनों के विघ्नोने घेरा अंतिम जय का वज्र बनानेनव दधीची हड्डीया गलाये आओ फिर से दिया जलाये..’
दिवाळी आणि निवडणुकीविषयी विचार करताना अचानक एक शब्द आठवला, धनत्रयोदशी! जो सतत धनाचा विचार करतो त्याला धनत्रयोदश म्हणणार नाही का? धनत्रयोदशीचा दिवस नसतो तेव्हाही आपली निवडणूक व्यवस्था पूर्णपणे धनाच्या ताब्यात गेलेली असते, हे लिहिताना माझ्या मनात बिलकुल संदेह नाही. तेव्हाही धनत्रयोदशीच साजरी होत असते. नियमानुसार निवडणुकीतला खर्च जाहीर करावा लागतो. उमेदवार लोकप्रिय असेल आणि आपल्या मतदारसंघात त्याने पुष्कळ काम केले असेल, तरीही निवडणूक लढण्यासाठी १५ ते २० कोटी रुपये तर लागतातच.
मुळात तिकीट मिळण्यावरूनच काही संघर्ष असेल तर हाच आकडा ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याचवर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘द इकॉनॉमिस्ट’ या अमेरिकन पत्रिकेने लिहिले की, भारतातील लोकसभेची निवडणूक जगातील सर्वांत महागडी, इतकेच नव्हे तर अमेरिकन निवडणुकीपेक्षाही महाग निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीत कमीत कमी ८३ हजार कोटी रुपये खर्च झाले असावेत, असा अंदाज आहे. याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी किमान १५३ कोटी रुपये. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज्’ या सुप्रसिद्ध संस्थेने असा अंदाज व्यक्त केला होता की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ५५ ते ६० हजार कोटी रुपये खर्च झाले होते.
प्रत्येक जागेमागे हा खर्च १०० कोटी रुपयांच्या घरात जातो. प्रत्येक जागेवर तीन उमेदवार असतील, असे गृहित धरले तर एकेका उमेदवाराला प्रत्येकी ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल. प्रत्यक्षातला खर्च यापेक्षाही जास्त असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्याकडे ‘निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत’ असे म्हणून उभे राहायला नकार दिला होता हे तुम्हाला आठवत असेलच. कधी ना कधी हा काळ बदलेल, लोकशाहीची खरी दिवाळी त्या दिवशी साजरी होईल जेव्हा निवडणुकीत ‘धनत्रयोदशी’ असणार नाही. तूर्त दिवाळीचा आनंद घ्या आणि निवडणुकीत तुमच्या उमेदवाराला नीट पारखून घ्या. निवडणुकीवर पुन्हा कधी चर्चा होईलच... पण दिवाळी अगदी दाराशी आली आहे.
नभ में तारों की बारात जैसे, तम को ललकारते ये नन्हे दिये!तम का आलिंगन कर, अमावस में नव उजियारा लाते ये नन्हे दिये!बहुत कुछ बतियाते ये नन्हे दिये,तम का शौर्य घटाते ये नन्हे दिये!मनातला अंध:कार दूर करून प्रेम आणि करूणेच्या प्रसन्न प्रकाशाने अवघे जीवन पुलकीत करून टाकणारा हा सण आहे! तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो... प्रेम आणि आनंदाने तुम्हा-आम्हा सर्वांचे जीवन उजळून जावो, यासाठी मी प्रार्थना करतो! शुभ दीपावली...