- डॉ. एस. एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई, सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरण)
उद्योजकांसाठी फाटाफूट ही आनंददायी बाब असते, असे विचार क्लेटन ख्रिस्टेनसेन यांनी ‘इन्होव्हेटर्स डिलेमा’ या पुस्तकात मांडले आहेत. कोणताही नवा उपक्रम हा जुन्याच्या फाटाफुटीतून निर्माण होतो, हे त्यांनी मांडले. ज्या कंपन्या यशस्वी ठरतात, त्या केवळ ग्राहकांची गरज भागवतात म्हणून नाही, तर त्यांच्या भविष्यातील गरजांचा अंदाज बांधून त्या यशस्वी होतात. त्यांनी पुस्तकात दाखवून दिले आहे की, किमान साधने असलेल्या लहान कंपन्या बाजारात उतरून विद्यमान व्यवस्था उलथून टाकत असतात. लहान कंपन्या मोेठ्या कंपन्यांना त्यांच्याच क्षेत्रात आव्हान देताना हुशारी दाखवतात. त्यातून प्रस्थापित व्यवस्था बाजूला फेकली जाते.
महाराष्ट्रात नुकतेच हेच घडले. एका राष्ट्रीय पक्षाला यापूर्वी कुणी कधी आव्हान दिले नसेल, असे आव्हान देत तात्पुरते का होईना जखमी केले. त्यामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या. लहान पक्षांनी हा बदल घडवून आणला आहे, पण हे कसे घडून आले? राजकारणात चाणक्य नसतात. जे लोक दूरचे पाहतात, सावधपणे हालचाल करतात आणि योग्य वेळी हल्ला करतात, तेच त्यावेळचे चाणक्य ठरतात. हार्वर्ड बिझिनेस पब्लिकेशनसाठी हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो. कारण येथे अनुभवी राजकारण्यांना धोबीपछाड दिला. तसेही राजकारण हा सदैव शक्यतांचा खेळ असतो, पण कुशल फाटाफुटीमुळे राजकारण तो आता अशक्यतेचा खेळ झाला आहे.
तीन पक्ष महाविकास आघाडीच्या नावाने एकत्र येणे हे संकटाला निमंत्रण देणारे ठरू शकते, यावर कसा विश्वास ठेवायचा? तेव्हा यावेळी फाटाफूट घडवून आणणाऱ्या तंत्राला जास्तीतजास्त गुण द्यायला हवे. या ठिकाणी यशाचा मंत्र ठरला महाविकास आघाडीने निर्माण केलेला समान किमान कार्यक्रम. त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यातच त्या मंत्राचे यश दिसून येणार आहे. व्यापारात ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या की भागते, तसे येथे घडणार नाही, तर येथे ग्राहकांच्या भावी गरजांच्या पूर्ततेचाही विचार करावा लागेल. राष्ट्रीय चॅनेल्सवर मात्र परस्परभिन्न विचारांचे लोक कसे एकत्र आहेत आणि त्यांच्यात कशी फाटाफूट होणार आहे, याच्याच चर्चा झडू लागल्या आहेत.
सध्याच्या घटनेत भारतीय जनता पक्षाने स्वत:च्या पायावर स्वत:च्या हाताने कुºहाड मारून घेतली आहे का? महाराष्ट्रातील त्या पक्षाच्या नेत्यांचे सत्तेच्या खेळाचे आकलन चुकले का? फोडाफोडीचा आपल्याला पाठिंबा मिळणे शक्य नाही, हे भाजपच्या लक्षात आले असते, तर त्यांनी राष्ट्रपती राजवट हटविली असती का? अशा वेळी त्यांनी मध्यरात्री सत्तापरिवर्तनाचा डाव खेळला असता का? त्यांचा असा समज होता की, त्यांचा नवीन मित्र (अजित पवार) व्हिप जारी करून सर्वांना आपल्यासोबत घेईल. ते न मानणाऱ्यांची आमदारकी रद्द करण्यात येईल. येथेच निर्णय घेण्यात चूक झाली. या सापळ्यात धुरंधर नेते कसे अडकले? घाईघाईत त्यांनी राष्ट्रपतींची राजवट हटविली, गुप्तपणे शपथविधीचे आयोजन करताना अनेक घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केले. त्यात निवडणुकीपूर्वीची मित्रता-शत्रुता गुंडाळून ठेवण्यात आली. त्यावरून त्यांना त्यावेळी तरी वास्तवाचे भान नसल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच विरोधकांचे लक्ष्य ठरले आहेत, पण अनेकदा त्यांच्या राजकीय धूर्तपणाबद्दल त्यांची प्रशंसाही करण्यात येते. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया या नेत्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न ना कधी त्यांच्या शत्रूंनी केला ना मित्रांनी.
आता भाजप आणि सेना हे पक्ष पुन्हा कधी एकत्र येणारच नाहीत का? त्याचे उत्तर इतक्यात तरी नाही. महाभारतात पांडवांसाठी कृष्णाने पानिप्रस्थ, सोनप्रस्थ, वृक्षप्रस्थ, इंद्रप्रस्थ आणि तीलप्रस्थ ही पाच खेडीच मागितली होती, पण दुर्योधनाने सुईच्या अग्राइतकीही भूमी मिळणार नाही, असे सांगून ही मागणी धुडकावली. त्यानंतर, महाभारत घडले. शिवसेनेनेदेखील अर्ध्या काळाकरिता राजमुकुट परिधान करण्याची मागणी केली होती. ती नाकारण्यात आली, पण सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा महाभारत घडू दिले नाही. त्यामुळेच लोकशाही सरकारची स्थापना महाराष्ट्रात होऊ शकली. आधुनिक काळातील ही फाटाफूट उत्कृष्ट व्यवस्थापनाचा धडा शिकवून गेली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना पुन्हा एकदा स्थिरता लाभली आहे. त्याचा उपयोग करून त्यांनी पुन्हा वर उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ज्या गोंधळातून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले, त्यातून त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचे महत्त्व जाणायला हवे. एकत्र आल्याने एकमेकांना नीट समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पवार यांना जसे नवे मित्र मिळाले आहेत, तसेच राज्यालाही निरनिराळ्या विचारांच्या लोकांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. आपल्या पक्षातील कच्चे दुवे कोणते आहेत, हे अजितदादांनी दाखवून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आभारच मानायला हवेत. त्यामुळे त्या दुव्यांकडे लक्ष पुरवून ते दुरुस्त करता येतील.
कुटुंबाला एकत्र ठेवण्यात पवारांसारख्या महानायकाने जे कौशल्य दाखविले त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. त्यांनी राज्याला जो नवीन प्रयोग दिला आहे, तो यशस्वी व्हायला हवा. या सगळ्यात सुप्रिया सुळे यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रगती महत्त्वाची ठरावी. नव्याने निर्माण झालेले हे कौटुंबिक बंध आघाडी या नात्याने अधिक मजबूत होतील, हे त्यांनी दाखवून दिले पाहिजे.