- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहआपल्या पौराणिक कथांमधील महाभारत १८ दिवसांत संपले होते. परंतु महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी सुरू झालेले महाभारत तीन आठवडे उलटले तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. १८ दिवसांच्या अनिर्णयानंतर अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. आता असे का व्हावे, याने मतदार अचंबित झाला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांपुढे दोन पर्याय होते. एक भाजप-शिवसेना व अन्य मित्रपक्षांची महायुती व दुसरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतरांची महाआघाडी. मतदारांनी भाजपला १०५ व शिवसेनेला ५६ मतदारसंघांत विजयी करून स्पष्ट बहुमत दिले. काँग्रेसच्या ४४ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ मिळून महाआघाडीला ९८ जागा मिळाल्या. त्यामुळे जनमताचा कौल महायुतीच्या बाजूने झाला हे अगदी स्पष्ट होते.निकाल जाहीर झाले तेव्हा सर्व काही ठीक चालले आहे, असे वाटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘दिल्लीत नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ असे आधीच जाहीर केले होते. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे देवेंद्र फडणवीसही सुरुवातीपासून सतत सांगत होते. पण नंतर अचानक खरेपणा व खोटेपणाचा एक राक्षस मैदानात उतरला. तो जणू विचारत होता : कसे स्थापन कराल सरकार? आधी खरे कोण व खोटे कोण ते तर ठरवा! पण याचा निर्णय कोणी करायचा? या वादात पक्ष दोनच होते. हे दोघे स्वत:ला खरे तर दुसऱ्याला खोटे ठरवत होते. यात तिसरा कोणी असता तर यापैकी खरे कोण व खोटे कोण याचा फैसला त्याला करता आला असता. पण या खऱ्या-खोट्याला साक्षीदार असा तिसरा कोणीच नाही, असा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला. हे जे दोन पक्ष आहेत ते कधी मित्रासारखे वागतात, पण प्रसंगी परस्परांना टपली मारण्यास व शेपटी पिरगळण्यासही कमी करत नाहीत. या विचित्र जानी दुश्मनीमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झाले!जाऊ द्या, हा राजकारणाचा भाग आहे. त्याच्याशी आम्हाला काय घेणे-देणे, असे आपण म्हणू शकतो. सर्वसामान्यपणे आयुष्यात सत्यावरच सर्व व्यवहार चालताना आपण पाहतो. एखाद्याने विश्वासार्हता गमावली की लोक त्याच्यापासून लगेच चार हात दूर राहू लागतात. राजकारणी अभावानेच खरेपणाने वागतात, असा अनुभव असूनही राजकीय पक्षांकडून जनतेने खरेपणाची अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. अशाच राजकारण्यांकडून प्रेरणा घेऊनच लोकप्रिय सिनेगीत लिहिले गेले : झूट बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. मै मैके चली जाऊंगी, तुम देखते रहियों...!पण राजकारणाचे घोडे खऱ्या-खोट्यावर अडण्याची अशी विचित्र वेळ राज्यात पहिल्यांदाच आली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत. त्याला उद्धव ठाकरे उत्तर देतात, तुम्ही मला खोटारडा ठरविल्यावर मी तुमचा फोन का घेऊ? त्यामुळे हा सत्य व असत्याचा पेच आहे.अशा परिस्थितीत बिचारा मतदार बुचकळ्यात आहे. दोघे सत्तेत पाच वर्षे एकत्र राहिले. निवडणूक एकत्र लढविली. विचारधारा एक - दोघांचा मतदार एकसारखाच असूनही दूध का बरे नासावे? काहींना हा खरा वाटतो व काहींना दुसरा खोटा वाटतो. या सत्य-असत्याच्या भांडणाने जनतेने दिलेल्या जनादेशावर बोळा फिरविला जात आहे. मतदार विचार करतोय की, शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे, अनेक प्रकल्प अर्धवट पडले आहेत, महाराष्ट्राची स्थिती ठीक नाही याची फिकीर करण्याऐवजी आम्ही ज्यांना निवडून दिले त्यांना एकमेकांना खरे-खोटे ठरविणे अधिक महत्त्वाचे कसे काय वाटू शकते? पण त्यांना कान पकडून जाब विचारणार कोण? सत्य-असत्याच्या भांडणात राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. यापूर्वीही राज्यात दोनदा राष्ट्रपती राजवट होती. एकदा ११२ दिवस व दुसऱ्यांदा ३३ दिवस. आता या वेळी ती किती दिवस राहते याचा हिशेब जनता करत आहे.दुसरीकडे जे निवडून आले आहेत त्यांना पुन्हा निवडणूक झाली तर आपले काय होईल, याची घोर चिंता सतावते आहे. मुंबईत राहून काही उपयोग नाही. तरी तो मुंबई सोडायला तयार नाही. आपण गावाला गेलो आणि इथे काही झाले तर नसती आफत येईल, अशी त्यांना काळजी आहे. भीती अशी वाटते आहे की, शेतकऱ्यांची हालत खूपच वाईट आहे. बडे नेते शेतकऱ्यांचा कैवार घेत इकडे-तिकडे धावपळ करत आहेत. ज्यांना शेतीचा गंधही नाही ते शेतकऱ्यांचे कैवारी होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांचा रोष नको म्हणून ते जणू एक पाय मुंबईत ठेवून मतदारसंघांकडे धावत आहेत. नव्याने निवडणूक होण्याच्या भीतीने सर्वांनाच ग्रासले आहे. महिन्या-दोन महिन्यांत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे हे सहज सोपे नाही. जिंकताना घाम निघतो. त्यामुळे सरकार स्थापन व्हावे व ते पूर्ण पाच वर्षे टिकावे अशीच सर्वांची इच्छा आहे. अगदी विळ्या-भोपळ्याची मोट बांधून सरकार झाले तरी चालेल, या मन:स्थितीत राज्याची जनता आहे.सध्या तरी राज्यातील मतदार हताशपणे हेच आळवत आहे... आम्ही कौल दिला, पण या सत्य-असत्याच्या भांडणाने आम्हाला अगदी वीट आणला!
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्य-असत्याच्या संघर्षाने मतदार हताश!
By विजय दर्डा | Published: November 18, 2019 4:08 AM