शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Maharashtra Government: राज्याच्या राजकारणाला समतोल सत्ताकारणाचे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 5:31 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारला महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

 महाराष्ट्राच्या राजकारणाने शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याच्या साक्षीने एक मोठे वळण घेतले आहे. मुंबई मराठी माणसांची आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्याच उदरात शिवसेनेचा जन्म झाला. बावन्न वर्षांनंतर या सेनेची स्थापना करणाºया ठाकरे कुटुंबीयांतील सदस्याने सत्ताग्रहण केले आहे. हे ग्रहणही काँग्रेस विचारसरणीच्या बरोबर जाण्याच्या निर्णयाने झाले आहे. त्यालादेखील राज्याच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने महत्त्व आहे.पुलोद सरकारनंतर अनेक पक्षांचे आणि विचारांचे पाठबळ लाभलेले हे सरकार असणार आहे. त्यामुळे हे सरकार स्थापन करण्याचे गणित सुटले असले तरी सत्ता हाती घेऊन ती समतोलपणे राबविण्याचे कसब उद्धव ठाकरे यांना आत्मसात करावे लागणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी हे अनुभवी असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्वत: कधीही संसदीय कामकाजात भाग घेतलेला नाही. त्यांच्या दृष्टीने ही कसोटी ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मुरब्बी पक्षांना सांभाळणे भाजपपेक्षा कठीण काम आहे. सरकारची धोरणे कशी ठरवायची, त्याचा समाजमनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तसेच राजकीय परिणाम काय होणार याची या पक्षांना जाणीव आहे. तसा अनुभव शिवसेनेला असला तरी अनेकवेळा भावनेवर स्वार होण्याची त्यांची पद्धत आहे. सरकार भावनेवर चालत नाही. त्याचेही एक राजकीय व्यवहार, अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र असते. ही सर्व कसरत उद्धव ठाकरे यांना करावी लागणार आहे.

सत्ता समन्वयाने चालवायची, जनकल्याण हा केंद्रबिंदू मानायचा असे ठरविले तर ते शक्य आहे. वीस वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते, तेव्हा तिजोरीत खडखडाट होता. आघाडीचे सरकार चालविताना देशमुख यांनी उत्तम समन्वय ठेवला म्हणून राज्य सावरले गेले. आजच्या महाराष्ट्रासमोरही अनेक आव्हाने आहेत. शेतकरीवर्ग संकटात आहे, रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. निसर्गाच्या प्रकोपाने सामान्य माणूस हादरून गेला आहे. ही सर्व व्यवस्था सावरण्याचे दिवस आले असताना ठाकरे यांच्या शिरावर मुकुट आला आहे. तो मिरविण्यापेक्षा त्याच्या आधारे कडक धोरणे राबविण्याची तयारी करावी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस या पक्षांत अनुभवी नेत्यांची फळी आहे. त्यांना विश्वासात घेऊन राजकारणविरहित शासन निर्णय केले तर एक उत्तम पर्याय मिळाल्याचे समाधान जनतेला होईल.आजवर ठाकरी भाषेत ओरखडे ओढणे वेगळे आणि प्रत्यक्षात राजसत्तेवर ठाकरी वचक निर्माण करणे वेगळे असणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षाही खूप आहेत. शिवसेना हा पक्षच मुळात चळवळीतून पुढे आलेला आहे. सरकार एकदा निर्णय घेत नसेल तर निवेदने देणे, मोर्चा काढणे अशा मार्गाने जाण्याची परंपरा त्यांना नाही. ‘एक घाव, दोन तुकडे’ करण्याची रीत या पक्षाने अवलंबली आहे. तसेच निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार घेईल, या अपेक्षेचे ओझेही असणार आहे. त्याला साद घालावी लागेल. सभागृहात १०५ सदस्य असलेला भाजपसारखा सत्तेचा अनुभव असलेला सक्षम विरोधी पक्षही समोरून चाल करणार आहे. अशा प्रसंगी महाविकास साधण्यासाठी आघाडी मजबूत असावी लागेल. यश मिळाले तर विजयाची पताका कायमच खांद्यावर राहील. मात्र, त्याचबरोबर प्रसंगी अपयशाचेही धनी व्हावे लागेल.
महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. येत्या काही दिवसांनी आणखी मंत्री साथीला येतील. एक मजबूत मंत्रिमंडळ असणार आहे. त्याचवेळी समंजसपणा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी व्यापक भूमिका घेण्यासाठी सज्ज रहावे लागेल. सरकारकडून राज्याच्या भल्याचे निर्णय होवोत, ही शुभेच्छा!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस