Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 05:30 AM2019-11-27T05:30:09+5:302019-11-27T05:42:29+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: BJP failed to form Government in Maharashtra | Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

Next

सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस सरकारला एका दिवसाच्या आत विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितल्यानंतर, काही तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार तगणार नाही, हे स्पष्ट झालेच होते. फडणवीस यांनीही त्यामुळे आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. त्यांचे सरकार जेमतेम ७८ तास टिकले. अजित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार आहेत, या भरवशावर भाजपचे नेते व देवेंद्र फडणवीस विश्वास ठेवून होते आणि त्या आधारेच त्यांनी सरकार बनविण्याचा खटाटोप केला, पण प्रत्यक्षात अजित पवार यांना शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने एकटे पाडले, तेव्हाच हे सरकार टिकणार नाही, हे स्पष्ट झाले. भाजपने अजित पवार यांना सोबत घेण्याच्या खेळीमुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ऐक्य अधिक मजबूत झाले.


या ऐक्यातील १६२चा जादुई आकडा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी परेड करून आणि सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनात सादर करून दाखवूनही दिला. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र आणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधीच भाजपला मिळू दिली नाही, शिवाय तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब विश्वासदर्शक ठराव मांडायला लावा, असा आग्रह धरला. न्यायालयात जाण्याचा त्यांचा निर्णय यशस्वी ठरला. हा निर्णय अतिशय दूरगामी परिणाम करणारा आहे. अनेक राज्यांत भाजप व पूर्वी काँग्रेसने फोडाफोडी करून सरकारे स्थापन केली आहेत. गेल्या वर्षी कर्नाटकातही असे नाट्य पाहायला मिळाले होते, पण न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने एखाद्या पक्षाला संख्याबळ न तपासता सरकार स्थापण्याची संमती देण्याआधी राज्यपालही चार वेळा विचार करतील.

आता हा मुद्दाच निकालात निघाला असून, महाविकासआघाडीचे सरकार राज्यात येणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे नक्की आहे. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा शिवसेनेच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत़ या पक्षांनी कायम एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे आता किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार चालविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. सत्तावाटपाच्या सूत्राबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे. हे मतैक्य राज्याचा कारभार चालविताना कायम राहावे आणि जनतेचे, विशेषत: आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अडथळे येऊ नयेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिघांना एकत्र आणण्यात आणि अजित पवार यांना भाजपपासून दूर करण्यात सर्वात मोठा वाटा शरद पवार यांचा आहे. त्यामुळे सरकार चालवितानाही त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

राज्यात कोणाचेही सरकार आले, तरी ते पाच वर्षे राहावे, अशी जनतेची इच्छा असते. सर्व राजकीय पक्षांनी सत्तेसाठी केलेले साटेलोटे लोकांना आवडलेले नाही. ही जनभावना लक्षात घेऊन, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी यापुढे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील काही नेत्यांना सरकारमधील कामाचा अनुभव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे मात्र रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव यांच्या हातीच सत्ता येणार आहे. दोन्ही काँग्रेस व इतर पक्ष यांना न दुखावता कारभार हाकणे सोपे नाही. विरोधी बाकांवर १0५ आमदार असलेला भाजप असल्याने सतत सत्तासंघर्ष होतच राहील. तरीही विरोधी पक्षाचे महत्त्व जाणून त्यांचा सन्मान करणे, निर्णय घेताना विश्वासात घेणे हे उद्धव ठाकरे यांना करावे लागेल. भाजपने या सरकारला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ते मिळणे वाटते इतके सोपे नाही, पण भाजपनेही विरोधासाठी विरोध न करता राज्याच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: BJP failed to form Government in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.