Maharashtra Government: शरद पवार यांची देशपातळीवरील राजकीय प्रतिष्ठा पणाला
By अतुल कुलकर्णी | Published: November 26, 2019 06:04 AM2019-11-26T06:04:28+5:302019-11-26T06:06:39+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणातले एक महत्त्वाचे नाव शरद पवार यांनी महाराष्ट्रात एक नवा राजकीय प्रयोग करायला घेतलाय.
- अतुल कुलकर्णी
( वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणातले एक महत्त्वाचे नाव शरद पवार यांनी महाराष्ट्रात एक नवा राजकीय प्रयोग करायला घेतलाय. पुलोदच्या प्रयोगानंतर अनेक वर्षांनी त्यांनी ‘महाविकास आघाडी’चा हा प्रयोग भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि अन्य सहयोगी पक्षांची मोट बांधली आहे. हे सरकार किती चालेल यापेक्षा असे सरकार बनू शकते आणि भाजपला आव्हान देता येऊ शकते, असा संदेश त्यांना देशभर द्यायचा आहे. त्यासाठीच अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्ष या प्रयोगाचा काय निकाल लागतो याकडे लक्ष ठेवून आहेत. आज अनेक राज्यांमध्ये अपुऱ्या किंवा कमी संख्याबळाच्या आधारावर भाजपने अनेक प्रकारची मोडतोड करीत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील दुखावलेले स्थानिक पक्ष अस्वस्थ होते. पवारांनी जे काही महाराष्ट्रात घडविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या प्रादेशिक पक्ष नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
मात्र ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे हे भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या लक्षात आले नाही तरच नवल. त्यामुळे ही आघाडी जमत आली असे वाटत असताना त्यांनी रात्रीतून राजकीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ करीत अजित पवार यांना आपल्या जाळ्यात ओढून घेत भाजपचे सरकार स्थापनही करून टाकले. यात भाजपने दुहेरी खेळी केली आहे. जर विधानसभेत भाजप आणि अजित पवार यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात यशस्वी झाले तर देशभरात शरद पवारांच्या खेळीकडे लक्ष लावून बसलेल्या अनेकांच्या मनसुब्यावर आपोआप पाणी फिरणार आहे. पण विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला नाही, तर पवार घराण्यातले एक नेते अजित पवार यांच्यावर सगळे खापर फोडण्यास भाजप मोकळी होईल. त्यामुळे विजय कोणाचाही झाला तरी पराभव मात्र पवार घराण्यातल्या एका पवारांचा होणार आहे.
आजवरच्या राजकारणात शरद पवार यांची प्रतिमा जे बोलतील त्याच्या नेमक्या विरुद्ध वागणारे, कृती करणारे अशीच झाली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी बंड केले तेव्हा त्यामागेही शरद पवार यांचीच फूस असेल असे सांगितले गेले. आज शरद पवार वयाच्या ८० व्या वर्षी प्रसिद्धीच्या परमोच्च टोकावर आहेत. राज्यात त्यांनी पक्षासाठी यश खेचून आणले आहे आणि ते भाजपच्या विरोधात मते मागून आणले आहे. राज्यातील जनता भाजपच्या विरोधात आहे याचा अंदाज त्यांना आहे. आपण भाजपसोबत गेल्यास आपल्या राजकारणावर त्याचे काय पडसाद पडतील हेही ते ओळखून आहेत. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सगळ्या पक्षांना घेऊन ते इतके पुढे निघून गेले आहेत की आता त्यांना परत फिरणे अशक्य आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी बंड करीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांनी तातडीने टिष्ट्वट करून त्याचे खंडन केले. अजित पवार यांनी मी राष्ट्रवादी पक्षातच आहे, असे टिष्ट्वट करताच शरद पवार यांनी त्याचेही तातडीने खंडन केले. अशी तत्काळ प्रतिक्रिया देणे त्यांच्या स्वभावाविरुद्ध आहे. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या १३ आमदारांनाही वेगाने परत आणले.
आपल्याच पुतण्याने, आपल्या पक्षातल्या आमदारांना फसवून राजभवनावर शपथविधीला नेले तेव्हा त्यातल्या तीन आमदारांना बोलावून पत्रकार परिषदेत आपल्या पुतण्याविरुद्ध बोलायला लावले, आपण कसे फसविले गेलो हेही त्या आमदारांना सांगायला लावले. पवारांच्या आजवरच्या राजकारणात असे याआधी कधीही घडलेले नाही. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सोमवारी रात्री शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी व मित्रपक्षांच्या १६२ आमदारांना एकत्र आणले. त्यांच्यापुढे अत्यंत स्पष्ट भाषण करीत त्यांना तुमची आमदारकी शाबूत राहील, ती माझी व्यक्तिगत जबाबदारी आहे, असे सांगत आश्वस्तही केले.
ते करीत असतानाच माझी कोणतीही वेगळी भूमिका नाही, हेही त्यांनी जोरकसपणे स्पष्ट केले. त्यांच्यावर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या दोन भिन्न मतांच्या नेत्यांनी संपूर्ण विश्वास टाकला आहे. अहमद पटेल यांच्यासारख्या फारसे दिल्लीच्या बाहेर न पडणाºया नेत्यास मुंबईत बोलावून बैठकीत सहभागी करून घेतले. हे पाहता देशभरातील भाजपविरोधी नेत्यांना आता पवारांमध्ये वेगळा नेता दिसू लागला आहे. पवारांच्या राजकारणातील हा सर्वाेच्च बिंदू आहे. यात यशस्वी किंवा अयशस्वी होण्यावर त्यांचेच नाही, तर अनेकांचे खूप काही अवलंबून आहे. आता हा फक्त महाराष्ट्रात सरकार स्थापण्यापुरता मर्यादित विषय उरलेला नाही.