मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. विशेषत: गुरुवार, २२ जुलै रोजी या संपूर्ण भागात तीनशे ते नऊशे मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे तीन दिवसांत पंधराशे मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. याच ठिकाणाहून कृष्णा-कोयनेसह पाच नद्यांचा उगम होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाट, गगनबावडा, दाजीपूर इत्यादी ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने पंचगंगा नदीला महापूर आला. कोकणात गोव्याच्या सीमेपासून पालघर म्हणजे गुजरातच्या सीमेपर्यंत कोसळधार पाऊस होता. सुमारे १०२ ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने दरडी कोसळण्याचे मोठे संकट अंगावर आले.
चिपळूण शहराला लागून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यात झालेल्या प्रचंड पावसाने अख्खे शहर पुरात भिजून चिंब झाले. महाडची देखील हीच अवस्था होती. तेथून जवळच असलेल्या तळिये गावावर दरड कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले. अद्यापही काही लोक बेपत्ता आहेत. महाबळेश्वर परिसरात लहान-मोठ्या दरडी कोसळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या सर्व आपत्तीत आतापर्यंत ११२ जणांना जीव गमवावा लागला आहे. अद्याप ९९ जणांचा शोध लागलेला नाही. हा आकडा मोठा असू शकतो. सुमारे तीन हजार २१२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नऊ जिल्ह्यांतील एक लाख ३५ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे. त्यापैकी सांगली या एका जिल्ह्यात ७८ हजार लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तेथे ४० हजार ८८२ जणांना हलविण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता दलाच्या ३४ टीम्स दाखल झाल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा आहेत.
मान्सूनचे वारे पाऊस घेऊन येतात आणि सह्याद्रीला अडून पावसाने चिंब करून टाकतात; पण त्याचे स्वरूप असे अक्राळविक्राळ असेल असे वाटले नव्हते. कोकणात, तसेच घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची एखाद-दुसरी घटना घडत असे, पण चालू वर्षी ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावेच्या गावे गाडली गेली. वाशिष्ठी नदीला अचानक महापुराचा लोंढा आला. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर पाण्याखाली गेले. या साऱ्यांच्या पुनर्वसनाचे आव्हान राज्य सरकारच्या समोर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवस कोकणचे दौरे करून परिस्थितीची पाहणी करीत आहेत. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यांच्या घरातील माणसं मृत्युमुखी पडली आहेत आणि घरही जमीनदोस्त झाले आहे, त्यातूनही वाचलेल्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत द्यावी लागणार आहे.
पशुधनाचे व शेतीचे नुकसान झाले आहे. चिपळूण किंवा खेडसारख्या तालुक्याच्या गावची बाजारपेठच पाण्यावर तरंगावी तशी तरंगत होती. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे नीट करून तातडीने मदत देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्याच विविध खात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूणच्या एस.टी. आगारात पंधरा-वीस फूट पाणी उभे राहिल्याने एस.टी. गाड्या बुडाल्या आहेत. आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. सरकारची मदत म्हणजे फार मोठ्या दिव्यातून जावे लागते. त्यासाठी झालेले नुकसान कागदावर आणावे लागते. मात्र, आगीत किंवा पुराच्या पाण्यात असे पुरावेच नष्ट होत असतात. त्यांच्या झालेल्या नुकसानीशी मेळ घालताना माणूस वैतागून जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनेक सार्वजनिक संस्थांचेही नुकसान झाले आहे.
पाणीपुरवठा योजना, वीज वितरण व्यवस्था, रस्ते, गटारी, शाळा, महाविद्यालये इत्यादींच्या उभारणीसाठीही मदत करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आता राज्य सरकारने तातडीची मदत देऊन अशा दरडी कोसळण्याच्या जागांची पाहणी करून काही गावांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा विचार करायला हवा. चिपळूणच्या अतिक्रमणांनीदेखील संकटात भर टाकली आहे. ती अतिक्रमणे मोडून काढली पाहिजेत, तेव्हा लोकप्रतिनिधींनी आडवे पडता कामा नये, आजचे संकट पुन्हा येणारच नाही, असे कोणी सांगू शकत नाही. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला दोनच वर्षांपूर्वी महापुराने अर्धमेले करून टाकले होते. आता पुन्हा महापुराने प्रचंड नुकसान होत आहे. कोविडशी लढताना महाराष्ट्र शासनाला महापूर, अतिवृष्टी आणि दरडी कोसळून ओढवलेल्या आव्हानांचाही पराभव करावा लागणार आहे. त्यासाठी पुनर्वसनाची दीर्घ पल्ल्याची योजना आखावी लागेल.