- यदु जोशीशरद पवार या सहा शब्दांभोवती महाराष्ट्राचे राजकारण कितीतरी वर्षे फिरत आहे. त्यांच्या बरोबरीचे अनेक नेते आज हयात नाहीत, जे आहेत ते थकले, निवृत्त झाले पण ‘लोक माझे सांगाती’ म्हणत पवार अथक चालतच आहेत. विस्मयकारक स्टॅमिना लाभलेल्या या नेत्याकडे वयाच्या ८२व्या वर्षीही तल्लखता अन् राजकीय चाणाक्षपणा आहे. त्यांचे शरीर हे विविध व्याधींचे संग्रहालय... पण, त्याची तमा न बाळगता हा योद्धा लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात त्याने जन्माला घातलेल्या महाविकास आघाडीसाठी किल्ला लढवत आहे. या आघाडीतील शिवसेना फुटली, त्यांच्या स्वत:च्या पक्षाची शकले पडली. कुटुंब फुटले, पुतण्याने वेगळा सुभा तयार केला. इतके सारे होऊनही शरद पवार नावाचा माणूस छातीला माती लावून महाराष्ट्र पालथा घालत आहे.
४०-४२ च्या उन्हात काल ते नागपूर, वर्धेत होते, आग ओकणारे दोन पावणेदोन महिने आता ते अंगावर घेत फिरतीलच. गेल्या ५५ वर्षांच्या राजकारणात वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर बरीच टीका झाली. निर्णयांमधील लवचिकता आणि त्यातून संधी प्राप्त करणे हे अनेकदा त्यांना चांगले साधले. १९७८ मध्ये त्यांनी पुलोदचा प्रयोग केला आणि केवळ ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. ते करताना वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांचा आजही पाठलाग करतोच आहे. काँग्रेसला आव्हान देत समाजवादी काँग्रेस जन्माला घातली, पुढे राजीव गांधींच्या नेतृत्वात या पक्षाचे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झाले. पुढे सोनिया गांधी पंतप्रधान होण्याला त्यांनी विरोध केला आणि या मुद्द्यावर झालेल्या संघर्षातून काँग्रेस सोडली व राष्ट्रवादीची स्थापना केली. मात्र, लगेच काही महिन्यांनी काँग्रेससोबत महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाले. २०१९ मध्ये तर त्यांनी कमाल केली. हयातभर ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी मैत्री जपत राजकीय वैर केले, त्यांच्या पुत्राला सोबत घेत शिवसेना-राष्ट्रवादी अन् काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार आणून त्यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांना शह दिला.
महाराष्ट्राला पुरोगामी अन् विकासाच्या मार्गावर नेणारा नेता म्हणून पवारांचे कौतुक होते तेव्हा त्या संदर्भात अनेक दाखले दिले जातात. त्याचवेळी महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण अदृश्य हातांद्वारे चालविणारा नेता म्हणून विरोधक त्यांना लक्ष्य करतात. एकाच नेत्याच्या ठायी या दोन्ही गोष्टींचा अनुभव येणे, असे खचितच घडत असावे. स्वत:च्या पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर अत्यल्प बळ असूनही राष्ट्रीय स्तरावरील नेता अशी स्वत:ची ओळख कायम टिकवण्यात पवार आजवर यशस्वी ठरले. विरोधी नेत्यांशीही चांगले संबंध असणे हे पवारांचे आणखी एक वैशिष्ट्य. पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. पवारांचे बोट धरून राजकीय आयुष्याची सुरुवात करणारे पुतणे अजित पवार यांनाच मोदी भाजपसोबत घेऊन गेले. त्यामुळेच वार्धक्यात आज मोठ्या पवारांसमोर आयुष्यातील सर्वात मोठे राजकीय आव्हान उभे आहे. कुटुंब, पक्ष आणि महाराष्ट्राचे राजकारण यावर हुकूमत आपलीच हे सिद्ध करण्यासाठीच्या अत्यंत कठीण परीक्षेला ते बसले आहेत. सोबतच त्यांना मुलीच्या राजकीय भवितव्याचाही फैसला होऊ घातला आहे. ४ जूनला सगळीच उत्तरे मिळतील.