- अतुल कुलकर्णी(संपादक, लोकमत, मुंबई)
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तीच शिवसेना फोडली गेली. ४० आमदार पक्ष सोडून गेले. पक्षाचे नावही गेले. धनुष्यबाणही जवळ राहिला नाही. उद्विग्नपणे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. ज्यांनी शिवसेना फोडली त्यांनी बाळासाहेबांचे फोटो लावत तो बाण मिरवला. ‘काँग्रेससोबत जायची वेळ आली, तर मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करून टाकेन’, असे कधी काळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. ती क्लिप गावोगावी फिरवली गेली. ज्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्यासोबत ‘जनाब उद्धव’ गेले अशी टीकाही झाली. मात्र उद्धव यांनी यातल्या कशानेही न डगमगता ठाम भूमिका घेत महाराष्ट्रभर एकहाती पक्षाचा प्रचार केला. स्वतःच्या तब्येतीच्या मर्यादा असतानाही स्वतःला झोकून दिले. त्या ठाकरेंच्या पदरात जनतेने यशाचे माप टाकले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेली मशाल पेटवून दोघे बापलेक झपाटल्यासारखे महाराष्ट्रात फिरले. गमवायला काहीच हाती उरले नव्हते. व्यवस्थेच्या विरोधात बोलायला अनेक नेते घाबरत होते. वेगवेगळ्या तपास यंत्रणांचे दबाव चारी बाजूने येत असताना, उद्धव यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर चौफेर टीका करत आपणच खरे भक्कम विरोधक आहोत हे दाखवून दिले. त्यांची ही तडफ लोकांना भावली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी राज्यभर असलेली सहानुभूती मतांमध्ये परिवर्तित झाली. त्यातून उद्धव यांना दहा ठिकाणी यश मिळाले.
मुंबईत मिळालेल्या यशामुळे उद्धव यांचीच शिवसेना खरी शिवसेना, असा कौल जनतेने दिला. मुंबई त्यांनी चार ठिकाणी उमेदवार उभे केले होते. ते चारही उमेदवार विजयी करत मुंबईकरांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या निवडणुकीने मुंबईत आणि महाराष्ट्रात एक नवा राजकीय फॉर्म्युला सेट केला आहे. मुस्लीम आणि मराठी एकत्र येऊ शकतात. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची मते एकमेकांकडे ट्रान्सफर केली जाऊ शकतात, हे गणित या निकालाने सोडवून दिले आहे. त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.
विद्यमान सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेऊ शकेल असा नेता या निवडणुकीतून मुस्लीम समाजाला दिसला. हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्राक्तन म्हणायचे की यश... यावर चर्चा घडत राहतील. एका मतदारसंघात फिरत असताना ज्या पद्धतीने मुस्लीम समाजाने त्यांचे स्वागत केले ते पाहिले तर मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजेही रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना हा निकाल हेच उत्तर आहे.