Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

By सुधीर लंके | Published: June 5, 2024 10:40 AM2024-06-05T10:40:04+5:302024-06-05T10:40:38+5:30

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल!

Maharashtra Lok Sabha election results 2024: Ajit Pawar's hidden fist exposed! | Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

 - सुधीर लंके
(निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर)

‘माझ्या नादाला लागतो त्याचा मी  कंड जिरवतो’ असे विधान अजित पवारांनी लोकसभेच्या प्रचारात केले होते. शरद पवारांना रिटायर्ड करण्याची भाषाही त्यांनी वापरली. अजित पवारांची ही ‘दादागिरी’ मतदारांनी मात्र सभ्य व लोकशाहीच्या भाषेत झुुगारलेली दिसते. आई, वडिलांना न सांभाळता घराबाहेर काढण्याची शहरीकरणात एक प्रथा आहे. तोच कित्ता अजित पवारांनी राजकारणात गिरवला. स्वत:चे काका शरद पवार यांनाच पक्षातून बेदखल करत ४१ आमदारांच्या मदतीने त्यांनी राष्ट्रवादी ताब्यात घेतली. भाजप त्यांना तुरुंगात टाकायला निघाला होता. पण त्याच भाजपने त्यांना क्लीन चिट देत उपमुख्यमंत्री केले. 

बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवत तेथेही त्यांनी शरद पवारांसोबत दोन हात केले. पण, वयोवृद्ध संबोधले गेलेले शरद पवार जिंकले व अजित पवार हाता-तोंडावर आपटले. अजित पवार गटाने महायुतीत बारामती, शिरूर, धाराशिव व रायगड या चार जागा लढविल्या. परभणीची जागा रासपच्या महादेव जानकर यांना सोडली. पण रायगड वगळता एकही जागा अजित पवारांना जिंकता आली नाही. रायगडला सुनील तटकरे हेही स्वत:च्या ताकदीमुळे जिंकले. शरद पवार हेच ‘मास लीडर’ आहेत.

आमदारांना केवळ कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. राजकारणाला तत्त्वज्ञान व बांधिलकी लागते हे आता अजित पवारांनाही कदाचित मान्य होईल. या निकालाने अजित पवारांसोबत गेलेल्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ या बड्या नेत्यांचीही वाट बिकट झाली. निवृत्तीच्या काळात भाजपची साथ केल्याचा डाग त्यांना लागला. त्यांच्यासह इतर आमदार किती काळ अजित पवारांसोबत राहतील ही शंकाही आता आहे. शरद पवार, रोहित पवार हे ईडीची नोटीस येताच चौकशीला सामोरे गेले. अजित पवारांनी मात्र आपण स्वच्छ आहोत हे सिद्ध करण्याऐवजी भाजपशी मांडवली केली. या तोडफोडीच्या व स्वार्थी राजकारणामुळेच महाराष्ट्राने भाजप, शिंदे गट व अजित पवारांना तडाखा दिला.

पवार हे मराठा लीडर आहेत. त्यांना पर्याय म्हणून दुसरे पवार आपण महाराष्ट्राला देऊ हे भाजपचे आडाखेही उधळले गेले. मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची कामगिरी तुलनेने सरस ठरली. अजित पवारांची झाकली मूठ मात्र उघडी झाली. शरद पवारांच्या छत्रछायेखाली ‘दादागिरी’ करणे सोपे आहे. ती चालून जाते. पण, त्यांना सोडून अजित पवारांचा पक्ष व ‘दादागिरी’ चालत नाही हेच हा निकाल सांगतो. अरुणाचल प्रदेशमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे तीन आमदार जिंकले. विधानसभेला महाराष्ट्रात त्यांचे किती आमदार येणार? हे आता भविष्यात ठरायचे आहे.
  

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2024: Ajit Pawar's hidden fist exposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.