Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:47 AM2019-10-01T05:47:41+5:302019-10-01T05:52:17+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसही काही बोलत नाही.

Maharashtra Vidhan Sabha 2019: Considering the situation in the state, the voters will be strong | Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

Next

प्रतिपक्षांचा उमेदवार जाहीर झाल्याखेरीज आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवायचे हा खेळ आता जुना झाला. तो नेहमी यशस्वी झाला असे नाही, अनेकदा तोंडावर आपटलादेखील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही पक्षांनीच ठरावीक जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत तर अन्य पक्षांनी अजून त्यांचे उमेदवार जाहीर करायचे आहेत. मतदानाची तारीख जाहीर झाली, निकालाची तारीखही उघड झाली आणि सरकारी यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज आहे. मात्र, पक्षोपक्षातील लाथाडी व उमेदवारांची ओढाताण अजूनही संपली नाही.


सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुस-याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी त्यांचे जागावाटप त्याच्या आकड्यानिशी निश्चित केले म्हणतात. पण या जागा कुणाला मिळणार याविषयी कुणीच काही बोलत नाही. भाजप सत्ताधारी आहे आणि त्या पक्षाने आपल्या पक्षाच्या प्रचाराची एक फेरी पूर्णही केली आहे. शिवसेनेची बालयात्राही कुठेकुठे फिरून आली आहे.

राष्ट्रवादीचे उत्साही नेते शरद पवार यांच्याही सभा ठिकठिकाणी झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते मात्र अद्याप सुस्त आहेत आणि ते त्यांच्या घराबाहेर सोडा पण फोटोतूनही बाहेर आले नाहीत. प्रचाराच्या जबाबदा-या निश्चित नाही. परिणामी, हा पक्ष ही निवडणूक लढविणार की नाही याचा संभ्रम लोकांना पडला आहे. दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या या पक्षाची त्याच्या आजच्या पुढाऱ्यांनी केलेली ही अवस्था त्यांच्याविषयी चीड व पक्षाविषयी कीव वाटायला लावणारी आहे. अवघ्या एका पराभवाने त्याची एवढी पडझड झाली असेल तर तो मुळातच मजबूत होता की नाही याची आपल्याला शंका यावी.

कोणत्याही पक्षाचे पुढारी आत्मविश्वासाने बोलत नाहीत. भाजपचा अपवाद सोडला तर साºयांची भाषा ‘ततपप’ अशीच आहे. काँग्रेसने याच वर्षात देशातील तीन राज्ये जिंकली आहेत. तरीही त्याच्यात जरासा जोम येऊ नये, हा त्याच्या शक्तिपाताचा पुरावा म्हणायचा काय? राष्ट्र वादीत भांडणे आहे, रडारड आहे, समजुती आहेत आणि सारा पक्ष रिकामा झाला तरी त्याचे नेते खंबीर आहेत. शिवसेना सत्तेत आहे. युतीविषयीच्या खात्रीत आहे. पण तिला किती जागा सुटतील याची चिंता भेडसावत आहे. भाजप मात्र झाली तर युती, नाहीतर स्वबळावर अशी धमकीवजा भाषा बोलत आहे. त्या पक्षाला पैशाचे पाठबळ मोठे आहे आणि मोदींचा आधार भक्कम आहे, सत्तेत मश्गुल आहे.

काँग्रेसचे नेते मोठे आहेत, पण त्यांच्यातील गुंते सोडविण्यातच त्रस्त दिसत आहेत. राहुल गांधींचा अल्पसंन्यास संपत नाही. ज्योतिरादित्यांचा निकाल लागत नाही आणि पक्षाचे जे अध्यक्ष व उपाध्यक्ष गेलेत त्यांची तोंडओळखही महाराष्ट्राला फारशी नाही. बाळासाहेब थोरात सज्जन आहेत, पण डावपेचात कमजोर आहेत. पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्र समजायचा आहे तर अशोक चव्हाणांना तो ठाऊक आहे. पण ते अडगळीत आहेत. मतदार शाबूत आहेत, कार्यकर्ते मजबूत आहेत. पण नेत्यांचीच अशी दुरवस्था आहे. ही स्थिती आघाडीला फारशी अनुकूल नाही. सोनिया गांधी येतील, प्रियंका येईल आणि सारे काही ठीक होईल, हा आशावाद पुरेसा नाही. त्याला स्थानिक प्रयत्नांचे पाठबळ नाही आणि ते उभे होत नाही तोवर जबर शत्रूंशी पक्ष कसा लढा देईल? ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारांच्या निवड समितीचे पक्षाने प्रमुख केले. पण ते महाराष्ट्रात कधी आलेच नाहीत. भाजपमध्येही सारे काही ठीक आहे असे नाही. खडसे नाराज आहेतच. गडकरी दुर्लक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांखेरीज दुसरा चेहरा तो पक्ष पुढेही करीत नाही. ही स्थिती मतदारांनीच मजबूत होण्याची व तारतम्य राखून मतदान करण्याची आहे. हे तारतम्य त्यांच्यात अखेरपर्यंत टिकावे, एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करायची. कारण तोच लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Considering the situation in the state, the voters will be strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.