>> दिनकर रायकर
'मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आता घरी जाणार नाही. मी घरच्यांना सांगितलंय की तुमचं तुम्ही बघा; मला आता काही लोकांकडे बघायचं आहे'... ही वाक्यं आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात अनुभवी, मुरब्बी राजकारणी आणि देशातील वजनदार नेते शरद पवार यांची. राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या काही शिष्यगणांना भाजपानं फोडल्यामुळे ते अस्वस्थ, उद्विग्न झालेत... जरा चिडलेतच! या गयारामांना 'बघून घेण्याचा' निर्धार करून ते पुन्हा आखाड्यात उतरलेत. वयाच्या ८०व्या वर्षीही राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन मैदानात उतरल्यानं सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होतंय. शरद पवारांची एनर्जी, त्यांच्या कामाचा आवाका, विविध क्षेत्रांतील संचार, विजिगुषी वृत्ती, व्यासंग, कार्यकर्त्यांशी असलेलं नातं, याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. अगदी विरोधकही पवारांची 'पॉवर' मानतात, ते याचमुळे. परंतु, एवढी 'पॉवर' असूनही राष्ट्रवादीची 'हवा' का गेली आणि त्यांचेच शिलेदार भाजपाची 'वाहवा' का करत आहेत, याचा विचार केल्यास, हे सगळं पवारांमुळेच होतंय असंच म्हणावं लागतं. तसं तर, महाराष्ट्रात कुठलीही मोठी घडामोड घडली की त्यात 'पवारसाहेबां'चं नाव येतंच. बऱ्याचदा त्याला काही आधारही नसतो. परंतु, आज जे राजकारण सुरू आहे, त्याची बिजं पवारांनीच पेरली असल्याचे अनेक पुरावे देता येतात.
'तेल लावलेला मल्ल', असं शरद पवारांना उगाच म्हटलं जात नाही. या उपाधीचा उगम शोधायचा तर १९७८ मध्ये जावं लागेल. कारण, त्याच वर्षी त्यांनी आपले गुरू, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं (काँग्रेस रेड्डी) सरकार पाडून मोठा धमाका केला होता. फक्त ११ आमदार घेऊन ते जनता पार्टीकडे (जनसंघ (आजचा भाजप), समाजवादी, शेकाप, भाकप, माकप) गेले होते आणि त्यांच्याशी हात मिळवून स्वतः मुख्यमंत्री झाले होते. राजकारणात रिस्क घ्यावी लागते, पुढे जाण्यासाठी धाडस करावं लागतं आणि तेच पवारांनी केलं होतं. म्हणून तरुण वर्गात, प्रस्थापितांना धक्का देणारा नेता, अशीच त्यांची इमेज झाली होती. तर, पाठीत खंजीर खुपसल्याचा शिक्का काहींनी मारला होता. परंतु, पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळं काही माफ असतं, अशीच त्यांची धारणा होती. आता मात्र आपल्याला सोडून जाणाऱ्या शिष्यांचा त्यांना राग येतोय.
१९९३ मध्ये छगन भुजबळांना फोडून शरद पवारांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवलेल्या धनंजय मुंडेंना फोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याची ताकद कमी केली होती. तेव्हा त्यांच्यासाठी हा सगळा 'पार्ट ऑफ द गेम' होता. पण, आता हे सगळं भाजपा-शिवसेना करतेय, तर त्यांचा तीळपापड होतोय. नातेवाईकांच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत काय झालं होतं, हे आपण पाहिलं आहेच. थोडक्यात काय, जे पेरलंय, तेच उगवतंय!
आणखी अशी बरीच उदाहरणं देता येतील. पण, हे फोडाफोडीचं राजकारण थोडं बाजूला ठेवू. पुन्हा शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येऊ. तर, राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी पवार स्वतः उतरलेत, हा जसा कौतुकाचा विषय आहे, तसा चिंतनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेला इतकी वर्षं झाल्यावरही, जनतेचा विश्वास जिंकू शकेल, अशी फळी शरद पवारांना का तयार करता आली नाही? आपण स्थापन केलेला पक्ष आपल्या निवृत्तीनंतर कसा टिकेल, कसा वाढेल, याचा विचार न करता त्यांनी तीच-तीच माणसं सोबत घेऊन राजकारण केलं. त्यामुळेच इतिहास, भूगोल जाणणाऱ्या, देशाच्या राजकारणाची सूत्रं हलवणाऱ्या पवारांना स्वतःच्या पक्षाचं भविष्य समजलं नाही का?, असा प्रश्न निर्माण होतो.
निवडणुकांमध्ये हरणं-जिंकणं, यश-अपयश येणारच. एकेकाळी दोन खासदार असणारा पक्ष आज केंद्रात बहुमताचं सरकार चालवतोय, निम्म्या देशात त्यांची सत्ता आहे. हे सगळं शरद पवारांनी 'याचि देहि, याचि डोळा' पाहिलंय. हे सगळं कसं शक्य झालं, याचीही त्यांना नक्कीच कल्पना असेल. त्यादृष्टीने राष्ट्रवादीची आजची अवस्था ही एक प्रकारे संधीच आहे. नव्या पिढीला, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुढे आणून पक्षाला नवं बळ देता येऊ शकतं. पण दुर्दैवानं, आजही पवार तसा विचार करताना दिसत नाहीत. पक्षांतर्गत लोकशाही नाही, या मुद्द्यावरून पहिल्यांदा पक्ष सोडणाऱ्या पवारांच्या पक्षात लोकशाही आहे का? आजही ते आपल्या नातवांचा आणि नेत्यांच्या मुलांचाच जास्त विचार करताना दिसतात. हे घराणेशाहीचं आणि जातीचं राजकारण पुढे कितपत यशस्वी होईल, याबद्दल शंका आहे. अर्थात, हे पवारांना कळत नसेल असं नक्कीच नाही; पण त्यानुसार वळलंही पाहिजे. अन्यथा काय होऊ शकतं, हे वेगळं सांगायची गरज नाही.
संबंधित बातम्या
... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर
'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट
'मी ह्रदयात मग गेला कशाला?' गयारामांना शरद पवारांचा भावनिक 'टोला'
मला आता काही लोकांकडे बघायचंय : शरद पवार
पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह; काँग्रेसची स्थिती 'जैसे थे'