गेली पाच वर्षे राजकीय पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकीय शिवारात केलेल्या चिखलात अखेर महायुतीची, त्यातही कमळाची शेती फुलली आहे. राज्यनिर्मिती नंतरच्या चाैदा विधानसभा निवडणुकांमधील हा सर्वाधिक देदीप्यमान असा विजय आहे. पन्नास वर्षांपूर्वी, १९७२च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने २२२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही पक्षाला किंवा आघाडी, युतीला दोनशेचा आकडा ओलांडता आला नव्हता. यंदा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेना व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने न भूतो न भविष्यती असा विजय संपादन करून नवा विक्रम नोंदविला. महायुतीच्या या त्सुनामीत काँग्रेस, उद्धवसेना व शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा पुरता पालापाचोळा झाला. तिन्ही पक्ष कसेबसे आमदारांचा दुहेरी आकडा गाठू शकले. विदर्भाने काँग्रेसची, तर मुंबईने शिवसेनेची थोडीबहुत लाज राखली. यापैकी दोन्ही काँग्रेसचे असे पानिपत २०१४ च्या मोदीलाटेत होईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात तेव्हा तसे झाले नाही. ती वेळ दहा वर्षांनंतर आली.
महायुतीच्या या ऐतिहासिक विजयातील भाजपाची कामगिरी विक्रमी आणि अत्यंत चित्तवेधक आहे. दहा वर्षांपूर्वी संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी यांची लाट होती तेव्हादेखील सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढत असताना भाजपला महाराष्ट्रात १२२ जागाच जिंकता आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी युती केल्यानंतर तो आकडा १०५ पर्यंत खाली आला. आता अवघ्या १५२ जागा लढवून भाजपने एकशेतीसपेक्षा अधिक जागा जिंकल्या. हे यश अद्भुत आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिक उठून दिसणारे आहे. किंबहुना त्या पीछेहाटीमुळेच भाजप कार्यकर्त्यांची फळी पेटून उठली, कामाला लागली. आपला पक्ष सर्वांत मोठा असूनही पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळू शकले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अपरिहार्यतेमुळे उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. तेव्हा या लाडक्या नेत्यासाठी मुख्यमंत्रिपद मिळवायचेच अशा जिद्दीने पक्षसंघटनेने रात्रंदिवस मेहनत घेतली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांनी तळागाळात काम केले. अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न केले. भाजपची संघटनशक्ती व काैशल्य तसेही इतर पक्षांनी हेवा करावा, असे आहेच. त्या काैशल्याचा अत्युच्च व अप्रतिम आविष्कार या निवडणुकीत दिसला. सामान्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने पक्षाला ऐतिहासिक राजकीय यश मिळविता आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या तर राजकीय जीवनमरणाचा प्रश्न होता. लोकसभेप्रमाणे दणका बसला तर राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल अशी स्थिती होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपसोबत गेल्यामुळे मूळ पक्ष कोणाचा या प्रश्नाचे उत्तर त्यांना निवडणुकीतून द्यायचे होते. अनुक्रमे उद्धव ठाकरे व शरद पवार या दोन्ही नेत्यांचा उत्साह लोकसभेतील यशामुळे दुणावला होता. फुटिरांवर अखेरचा घाव घालण्यासाठी ते दंड थोपटून मैदानात उतरले होते. त्यामुळेच ‘करा अथवा मरा’ अशा भूमिकेतून शिंदे व अजित पवार ही निवडणूक लढले आणि दोघांनीही आपल्या मूळ पक्षापेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळवून ‘पक्ष कोणाचा?’ हा प्रश्न मोडीत काढला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण किंवा विविध समाजघटकांसाठी घोषित केलेल्या योजनांची साथ फडणवीस, शिंदे व अजित पवार यांना मिळाली आणि तिघांनी मिळून हा अभूतपूर्व विजय मिळविला. या निकालाचे अनेक अर्थ आहेत. गेली जवळपास सहा दशके राज्याच्या व देशाच्या राजकारणावर अमीट छाप उमटवणारे शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा शेवट असू शकेल. आयुष्यात स्वत: एकही निवडणूक न हरलेल्या पवारांची कारकीर्द मात्र वेदनादायी पराजयाने थांबावी, याचे अनेकांना वाईट वाटू शकते. तरीदेखील स्वत:च्या पुतण्यानेच पक्ष फोडल्यानंतर वयाच्या ८४ व्यावर्षी, तेदेखील असाध्य आजाराचा सामना करीत ज्या त्वेषाने ते आधी लोकसभा व आता विधानसभा लढले, ते अचंबित करणारे होते. त्यांच्यासोबत राहिलेल्यांना आता पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करावी लागेल.
उद्धव व राज या ठाकरे बंधूंच्या राजकारणावरही या निकालाने मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक विजयामुळे किमान उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या फेररचनेचा विचार करू शकतील. तथापि, माहीममधील अमित ठाकरे यांचा पराभव पिता राज ठाकरे यांच्यासाठी खूपच वेदनादायी असेल. बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या राज्यातील सर्वाधिक प्रभावी प्रादेशिक पक्षाचा राजकीय वारसा या निवडणुकीने ठाकरे कुटुंबाबाहेर, एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारांनी सोपविला आहे. काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष बनेल आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद वाट्याला येईल, असे मानून त्या शर्यतीत असणारे बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत.
हरयाणानंतर देशातील सर्वांत जुन्या पक्षाला हा दुसरा मोठा धक्का आहे. २०१४ पासून असे धक्के देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसला बसत आले आहेत. तरीदेखील पक्ष पुन्हा उभा राहावा म्हणून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. आतातरी पराभव व फेरबांधणी हे समीकरण जुळेल की नाही हे सांगता येत नाही. राजकीय पक्ष व नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनता, मतदारांच्या दृष्टीने या निकालाला वेगळे महत्त्व आहे. या मतदारांनीच राजकीय अस्थैर्य, राजकीय हडेलहप्पी, नेत्यांच्या कोलांटउड्या, वैचारिक व्याभिचार व पक्षांच्या फोडाफोडीविरोधात जबरदस्त काैल दिला आहे. कारण, त्यांना सामान्यांच्या भविष्याचा, राज्याच्या प्रगतीचा विचार करणारे स्थिर सरकार हवे होते. एकदिलाने, एकजुटीने वागलात तर युती व आघाडी चालेल, तथापि एकमेकांच्या विरुद्ध कटकारस्थाने करणाऱ्या पक्षांची आघाडी नको, हा मतदारांनी दिलेला स्पष्ट संदेश आहे.
महाराष्ट्रापुढे खूप मोठी आव्हाने आहेत. देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य हा लौकिक टिकवून ठेवायचा आहे. पायाभूत सोयीसुविधा तसेच शेती, उद्योगाचा विकास हवा आहे. बेरोजगारांच्या हाताला काम हवे आहे. शेती-माती-पाण्याचा विचार व्हावा, शहरांमधील जगणे सुसह्य व्हावे, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीद्वारे भावी पिढ्यांच्या भविष्याची बेगमी व्हावी, अशा अपेक्षांच्या पूर्ततेसाठी स्थिर तसेच केंद्र सरकारशी सुसंगत असे सरकार जनतेने निवडून दिले आहे. या जनमताचा आदर व्हावा. यावेळच्या निवडणूक प्रचारात शब्दांचा विखार होता. शेवटी शेवटी त्याला शस्त्रांची धारही आली. धर्म तर विभागलेले होतेच, पण जाती दुभंगल्या, अगदी उपजातींमध्येही भिंती उभ्या झाल्या. या विखाराचे व्रण दीर्घकाळ राहिले तर ते वातावरण कलुषित करतात. आता युद्ध संपले आहे. जनमताचा कौल मिळाला आहे. या दरम्यान दोन्हीकडून ज्या जखमा झाल्या, त्या मिटाव्यात यासाठी विजेत्यांनी आणि पराभुतांनीही प्रयत्न करायला हवेत. तोच खरा ‘महाराष्ट्र धर्म’ आहे!