Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कमळाची कमाल, धनुष्याची धमाल अन् घड्याळाचा गजर; मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतलं
By यदू जोशी | Published: November 24, 2024 07:59 AM2024-11-24T07:59:43+5:302024-11-24T08:00:27+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा दणदणीत विजय आकाराला आणला, ‘देणारे मुख्यमंत्री’ या लोकप्रिय प्रतिमेच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी घवघवीत यश मिळवले, आणि अजित पवार यांनी यावेळी काकांना धोबीपछाड दिली!
यदु जोशी
सहयोगी संपादक, लोकमत
लोकसभा निवडणुकीत दणकून आपटलेली महायुती पाच महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत दोनशे पार जाईल, असे भविष्य कोणी वर्तविले असते, तर कोणाचाच विश्वास बसला नसता. मात्र आज तेच वास्तव आहे. १९९५ पासून महाराष्ट्रात युती वा आघाडीचेच सरकार आले, पण २०० हून अधिक जागा कोणालाही मिळविता आलेल्या नव्हत्या. तो चमत्कार यावेळी घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांना लोकांनी डोक्यावर घेतले आणि शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना नाकारले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारामध्ये संविधान बदल, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची गरज हे मुद्दे प्रकर्षाने मांडले, पण ते चालले नाहीत. लोकसभेत महाविकास आघाडी एकेक ‘नरेटीव्ह’ देत होती आणि त्यावर खुलासे करण्यात महायुतीचा वेळ जात होता. यावेळी महायुतीने अनेक ‘नरेटीव्ह’ सेट केले आणि महाविकास आघाडीवर त्यांची उत्तरे देत बसण्याची पाळी आली. महायुतीच्या विजयात अर्थातच वैयक्तिक लाभाच्या योजनांसह राज्य सरकारच्या निर्णयांचा धडाकाही सहायभूत ठरला. लाडकी बहीण, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना, त्यापोटी दिलेले २७०० कोटी रु., कृषी वीजबिलात दिलेली माफी, विविध लहान लहान समाजांसाठी स्थापन केलेली महामंडळे, वृद्धांना एसटीचा मोफत प्रवास, मुलींचे मोफत शिक्षण अशा निर्णयांना मतदारांनी पसंती दिली.
मविआतील घटक पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मोठमोठी आश्वासने दिलेली होती पण महायुतीने काही योजनांचे पैसे आधीच बँक खात्यात जमा करून टाकल्याने मतदारांचा अधिक विश्वास बसला. काँग्रेसशासित राज्यांमध्ये निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही हे मोठमोठ्या जाहिराती देऊन महायुतीने लोकांच्या मनावर बिंबविले गेले. ‘देणारे मुख्यमंत्री’ अशी लोकप्रिय प्रतिमा निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यांना मोठे यश आले. ते कोणालाही भेटतात, कोणाशीही बोलतात, स्वत: ला ‘नेता’ नाही तर ‘कार्यकर्ता’ म्हणतात हे त्यांचे रूप मतदारांना भावले. पायाला भिंगरी लावल्यासारखे ते महाराष्ट्रभर फिरले, पहाटे चारपर्यंत लोकांना भेटत राहिले. त्यांची ही प्रतिमा महायुतीसाठी धावून आली. महायुतीच्या आमदारांना त्यांनी भरभरून निधी दिला.
‘शिवसेना कोणाची?- उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?’- या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीत ‘शिवसेना निम्मेनिम्मे दोघांचीही’ असे उत्तर दिले होते, पण हे उत्तर आजच्या विधानसभेला मात्र बदलले आहे. या निवडणुकीने ‘शिवसेना आजतरी शिंदेंचीच’ असे उत्तर दिले आहे. भाजपच्या दणदणीत विजयाचे शिल्पकार अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत. सर्वच विरोधकांचे ते ‘टार्गेट नंबर वन’ होते, त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोलले गेले पण अभ्यासू, रणनीती आखून ती अमलात आणण्याची उत्तम जाण असलेल्या फडणवीस यांनी राज्य, विभाग, जिल्हानिहाय नाही, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सूक्ष्म नियोजन केले. लोकसभेनंतर त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे ठरत असतानाच पक्षनेतृत्वाने त्यांना महाराष्ट्रातच ठेवले, विधानसभा निवडणुकीची ‘ओनरशिप’ दिली. राज्यात खरेतर त्यावेळी कमालीचा जातीय तणाव होता, ओबीसीविरुद्ध मराठा हा संघर्ष शिगेला पोहोचला होता, अशावेळी ब्राह्मण चेहरा देणे ही मोठी जोखीम होती, पण पक्षाने ती घेतली. जाती पातींपलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या भल्याचा नेहमीच विचार करणारे आणि पक्षादेश शिरोधार्ह मानणारे फडणवीस यांनी सगळी सूत्रे हाती घेतली आणि पक्षाला विजयपथावर नेले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांना स्वत:च्या जातीचा कधीकधी अडसर आला, पण आज मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास टाकत तो अडसर दूर फेकला. फडणवीसांचा टोकाचा द्वेषही काहींनी केला, पण मतदारांनी त्यांच्यावर प्रेमच केल्याचे हा निकाल सांगत आहे.
लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या दारुण पराभवानंतर यावेळी मिळविलेले दिमाखदार यश हे अजित पवार यांना मोठा दिलासा देणारे आणि त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत करणारे ठरले आहे. काका शरद पवार यांनी त्यांना लोकसभेला पार चितपट केले होते, यावेळी त्यांनी काकांना धोबीपछाड दिला. काहीसे अबोल, रागीट अशी प्रतिमा असलेले अजित पवार यांनी ती बदलली. ते मिश्कील झाले, लोकांमध्ये सहज मिसळू लागले, त्यातून त्यांचा सामान्यांशी कनेक्ट वाढला. पूर्वी भाजपसह विरोधकांनी त्यांची जी काही वाईट प्रतिमा तयार करून ठेवलेली होती, ती पुसण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आल्याचे दिसते. शरद पवार यांनी अजितदादांकडे नेतृत्वाची धुरा सोपविली नाही; पण, आजच्या निकालाने मतदारांनी ती बव्हंशी सोपविली आहे. काकांना सोडून त्यांनी फार मोठी चूक केली आणि ते राजकारणातून संपत जातील असा तर्क देणाऱ्यांना त्यांनी हाताची दहाही बोटे तोंडात घालायला लावली आहेत. दमदार दादांनी दिमाखदार यश मिळविले.
महायुतीत यावेळी चांगला समन्वय होता, जागावाटपही लवकर झाले. भाजपने जागावाटपात स्वतःचा वरचष्मा ठेवला, पण मित्रपक्षांचेही समाधान केले. लोकसभेसारखा घोळ होऊ दिला नाही. थोडी खळखळ झाली, पण ती बाहेर न येऊ देण्यात महायुती यशस्वी झाली. प्रत्येक मतदारसंघात तिन्ही पक्षांच्या समन्वय समित्या नेमण्यात आल्या, त्यामुळे समन्वय खालपर्यंत गेला. लोकसभेला विरोधात गेलेली जातीय समीकरणे यावेळी आपल्याकडे वळविण्यात महायुतीला मोठे यश आले. मराठा समाजाने महायुतीला मोठी पसंती दिलीच; पण, शिवाय विदर्भ व राज्याच्या अन्य ओबीसीबहुल भागात मिळालेले यश बघता ओबीसींनीही त्यांना भरभरून मते दिली. जातीय विवादांचा फटका आपल्याला बसणार नाही याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. ‘कटेंगे तो बटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’द्वारे एकाचवेळी भाजपने धार्मिक ध्रुवीकरण केले, हिंदूंना जातींपलीकडे नेत एकत्र आणले.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे हिंदू दलित भाजप-महायुतीसोबत गेले. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरींच्या सभांचा धडाका कामी आला, महाराष्ट्राच्या प्रचारात स्वत:ला किती ठेवायचे याचे अचूक भान मोदी यांनी ठेवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेटवर्कचे या यशामध्ये मोठे योगदान आहे. ठिकठिकाणी संघ स्वयंसेवकांनी दक्ष राहत अथक परिश्रम घेतले. संघाचे शताब्दी वर्ष २०२५ मध्ये सुरू होत आहे, अशावेळी संघाला भाजपने ‘गुरूदक्षिणा’ दिली. आता संघ स्वयंसेवकच मुख्यमंत्री होणार का, हे लवकरच कळेल.
yadu.joshi@lokmat.com