१९४२ चा काळ स्वातंत्र्यलढ्याला वेगळी दिशा देणारा ठरला. संपूर्ण देशाचे लक्ष महात्मा गांधीवर केंद्रित झाले होते. अजमेरच्या एका प्रकरणावरुन महात्मा गांधी यांनी सात दिवसांचा उपवास सुरू केला. हा उपवास वयामुळे त्रासदायक ठरला. उपवास सोडण्याची वेळ आली व मोसंबीच्या रसाचा पेला बापूसमोर ठेवण्यात आला. मात्र, काही केल्या गांधीजी उपवास सोडेनात. सर्वांच्या मनात चलबिचल सुरु झाली. अनेकांनी आग्रह सुरू केला. मात्र, बापूनी रसाचा पेला उचलला नाही. त्यांची नजर सातत्याने कुणाचा तरी शोध घेत होती. ही बाब त्यांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात आली. काही वेळाने एकेकाळी गांधीजीचे वैचारिक विरोधक असणारे लोकनायक बापूजी अणे तेथे आले आणि महात्मा गांधीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.
गांधीजीनी अणे आल्यावरच उपवास सोडला. स्वातंत्र्य लढ्यात विविध विचारधारांच्या व्यक्तीमध्ये मतभेद असले तरी मनभेद नव्हते व एकमेकांबाबत किती आदर होता, हे या प्रसंगातून दिसते. वऱ्हाडातील टिळक अशी ओळख असलेल्या बापूजी अणे यांनी सर्वच विचारधारांचा सन्मान करत स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. आयुष्यभर रोखठोक भूमिका घेतलेले बापूजी परखडपणासाठी विशेष प्रसिद्ध होते. अनेक संधी असताना त्यांनी विदर्भाच्या मातीशी शेवटपर्यंत नाळ कायम राखली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जन्म झालेल्या अणे यांचा राजकीय कार्याचा पिंड विद्यार्थीदशेतच तयार झाला होता.
१९०४ साली मॉरिस कॉलेजला असताना नागपुरात अणे यांची टिळकांशी भेट झाली. तेव्हाच टिळकांनी अणेमधील क्षमता ओळखली होती. कोलकाता विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यावर अणे यांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायाला सुरुवात केली; परंतु प्रक्षोभक भाषणांचा ठपका लावत ब्रिटिशांनी त्यांची वकिलीची सनदच रद्द केली.
१९९५ ते १९२० या कालावधीत टिळकांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केले. २९ जानेवारी १९१७ रोजी पुण्याला किर्लोस्कर नाट्यगृहात 'स्वराज्याशिवाय गत्यंतर नाही' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी बापूजी मोठ्या विनयाने म्हणाले, पुण्याहून मी जे राजकीय पाणी वहाडात नेले तेच पुन्हा परत आणत आहे. त्यावेळी लोकमान्य म्हणाले, बापूजी अणे हे अत्यंत विचारी गृहस्थ आहेत. हे पाणी पुण्याहून भरुन नेलेले नाही. ते मूळचे यवतमाळचेच आहे.'
१९२० ते १९३० या कालावधीत अणे यांनी महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीला उघड विरोध केला व कायदेमंडळातून प्रतिसहकाराचे राजकारण चालविले. १९२४ साली मध्यप्रांत आणि वहाडच्या असेंब्लीमध्ये निवडणूक लढवून ते विजयी झाले. लोकमान्यांच्या तालमीत वाढलेल्या बापूजींना अहिंसेचा अतिरेक मान्य नव्हता. तर गांधीजी अहिंसेबाबत कुठलीही तडजोड करायला तयार नव्हते. मात्र, राजकारणात पंथ निर्माण झाल्याने शत्रूचा फायदा होतो, दिला. या सम्यक विचारातून अणेंनी १९३० नंतर महात्मा गांधीच्या सत्याग्रहाला पाठिंबा देखील दिला.
गांधीजीनी मीठाचा सत्याग्रह सुरू केला, त्याचवेळी बापूजी अणे यांनी पुसदच्या पूस नदीच्या पात्रात जंगल सत्याग्रहाची घोषणा केली. आरक्षित वनामध्ये गवत कापून सत्याग्रहाला सुरुवात केली. महात्मा गांधीच्या विचारांना विरोध असला तरी बापूजी गांधीजींना कधीही नकोसे झाले नाहीत. सत्याग्रह आंदोलनाची तात्पुरती समाप्ती झाल्यावर व्हाईसरॉयने गांधीजींना बोलणी करायला बोलविले तेव्हा तहनाम्याचा मसुदा तयार करण्यासाठी अणेंना दिल्लीला बोलवून घेतले होते. आयर्विन पॅक्टच्या वेळीदेखील त्यांना बोलविण्यात आले होते. इतकेच काय तर १९३३ साली त्यांना कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपददेखील देण्यात आले.
१९४२ साली भारत छोडो आंदोलनाच्या वेळी बापूजी अणे दिल्लीच्या ब्रिटिश मंत्रिमंडळात होते. गांधीजींनी तुरुंगात उपोषण सुरु केले. ब्रिटिश कॅबिनेटमधील सर्व सहकारी विरुद्ध विचारांचे होते. मात्र, महात्मा गांधींना मुक्त करा, अशी भूमिका अणे यांनी कॅबिनेटमध्ये मांडली व सहमतीही घडवली. मात्र, स्टेट सेक्रेटरींनी ठरावाची अंमलबजावणी केली नाही व संकेत पायदळी तुडविले म्हणून बापूजीनी त्वरित कॅबिनेटमधून राजीनामा दिला.
बापूजी अणे हे केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर सामाजिक चळवळीमध्येदेखील सक्रिय होते. वन्हाडातील शेती, वेठबिगारी, बलुतेदारी, जंगल कायदे या मुदयावरदेखील त्यांनी लढा दिला. जातीय निवाडा व भाषावर प्रांतरचना यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. 'लोकमत' या नाममुदेचे जनकत्व बापूजींचे! बापूजीच्या साप्ताहिकासाठी हे नाव खुद्द लोकमान्य टिळकांनीच सुचवले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील बापूजीनी राष्ट्रबांधणीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. विशेष म्हणजे वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा त्यांनी वेळोवळी उचलून धरला. मात्र, त्यांना इतर नेत्यांचे सहकार्य लाभले नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांतदेखील वेगळ्या विदर्भाची चळवळ कायम आहे.
-योगेश पांडे, मुख्य उपसंपादकलोकमत, नागपूर