माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे पुन्हा एकदा भारतीय इतिहासाबाबत बरळले आहेत. केवळ संसद सदस्यच नाही तर ते केंद्रीय मंत्रिपदावरदेखील राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा खरपूस समाचार घेण्याची गरज आहे. महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान जगाने मान्य केले आहे. अहिंसेच्या मार्गाने लोकशाही मूल्यांची बीजे रोवत त्यांनी दिलेला लढा हा मानवी जीवनाच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. यासाठीच त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न जगभरातील विचारवंत, लेखक, इतिहासाच्या अभ्यासकांनी केला आहे. आजवर ८२ भाषांत १ लाख १० हजार पुस्तके या महात्म्याच्या जीवनावर लिहिली गेली आहेत. इतकी पुस्तके आजवरच्या मानवाच्या जीवनात कोणावर लिहिली गेलेली नाहीत.
स्वातंत्र्यलढ्याची पूर्ण दिशा बदलूनच त्यांनी नवा इतिहास घडविला आहे. त्यांच्या या योगदानास हेगडे महाशयांनी ‘नाटक होते, ब्रिटिशांशी संगनमत करून केलेले नाटक होते, ब्रिटिश या देशातून निघून जाणारच होते,’ अशी मुक्ताफळे उधळली आहेत. अशी महामूर्ख व्यक्ती भारतीय संसदेची सदस्य आहे. केंद्रीय मंत्रिपदावरही होती, हे जगाला सांगताना आपली मान खाली जाते. महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा कोणत्या मूल्यांसाठी आहे, याचे तत्त्वज्ञानही मांडले आहे. केवळ स्वातंत्र्य मिळवून चालणार नाही, त्याचे स्वराज्यातून सुराज्यात रूपांतर करण्याची गरज आहे. यासाठी हा देश पारतंत्र्यात कसा गेला, आपला समाज जाती-धर्मांच्या भिंतींनी कसा विभागला गेला आहे, याचा विचार करून त्या भिंती उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रमच त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून राबविला. तेव्हा काँग्रेस या राष्ट्रीय चळवळीतील अनेक दिग्गज अचंबित झाले होते.
सवर्णांना हा कार्यक्रम नको वाटत होता. समाजातील पददलितांना सोबत घेतले पाहिजे, बहुसंख्य माणसांना गुलामगिरीच्या कष्टप्रद अवस्थेत ठेवून मिळणारे स्वातंत्र्य काय उपयोगाचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तेव्हापासूनच गांधी या महात्म्याला मारण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. १९२४ पासूनच महात्मा गांधी यांनी हरिजन यात्रा काढून जातीअंताचा लढा सुरू केला होता. तो ज्यांना मान्य नव्हता, अशा मंडळींनी गांधींना मारण्याचा प्रयत्न चालू ठेवला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांना यश आले नाही. मात्र, स्वतंत्र भारतात तरी हा माणूस राहता कामा नये यासाठी आटोकाट प्रयत्न करून ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनेला जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. गांधी मेले, पण त्यांचा विचार मेला नाही. महात्मा गांधी यांना मरण येत नाही. कारण त्यांनी मांडलेला विचार चिरकालीन आहे. ज्या ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी संघर्ष केला, त्यांनीच ब्रिटिश संसदेच्या प्रांगणात नुकताच भव्य पुतळा उभारला आहे. त्यांच्या विचारांपासून जगाने प्रेरणा घ्यावी, असा विचार त्यामागे आहे.
अनंतकुमार हेगडे यांच्यासारखे महामूर्ख संसद सदस्य मात्र महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील या संघर्षाला नाटक म्हणून हिणवतात. गांधी मरणार नाहीत. त्यांचा विचार संपणार नाही, हेच त्यांचे दु:ख आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी दिलेली राज्यघटनाही हेगडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना मान्य नाही. पण राजकीयदृष्ट्या आंबेडकर यांना विरोध करणे किंवा कमी लेखणे परवडणार नाही, म्हणून ते गप्प आहेत. ही प्रवृत्ती वेळीच रोखली नाही तर उद्या आंबेडकर यांचाही ते अपमान करायला धजावतील.
हेगडे आणि त्यांच्यासारखेच विचार करणारे अंधभक्त असंख्य जन्माला आले आहेत. स्वातंत्र्यलढा चालू होता तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता. इतिहासाचा अभ्यास करूनही जर ही भूमिका घेतली जात असेल आणि राष्ट्रपित्याचा असा अवमान केला जात असेल तर भाजपने केवळ खुलासा करण्यासाठी नोटीस देण्याचे नाटक करू नये. खासदाराचा राजीनामा घ्यावा. त्यांना पक्षातून काढून टाकावे. स्पष्टपणे सांगावे की, गांधी कधी मरणार नाहीत. ते विचाररूपाने आणि मानवी कल्याणाच्या मूल्याने कायमच जिवंत राहतील.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी दिलेली राज्यघटनाही हेगडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना मान्य नाही. पण राजकीयदृष्ट्या आंबेडकर यांना विरोध करणे किंवा कमी लेखणे परवडणार नाही, म्हणून ते गप्प आहेत.