- एम. व्यंकय्या नायडूउपराष्ट्रपतीदीडशे वर्षांपूर्वी २ आॅक्टोबर, १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका अलौकिक व्यक्तीचा गुजरातमध्ये पोरबंदर येथे जन्म झाला. तीच व्यक्ती असामान्य विचार आणि कतृत्वाने ‘महात्मा’ पदापर्यंत पोहोचली आणि तिने कालपटलावर आपला अमिट ठसा उमटविला. या महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या अमूल्य ठेव्याकडे पाहून आपण अचंबित होतो. अशी ही व्यक्ती भारतीय होती व देशाच्या इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी आपले नेतृत्व केले, याचा आपल्याला अपार अभिमान वाटतो.खरं तर गांधीजींनी आपल्याला दिलेला वारसा हा अखंड स्फूर्तीचा झराच आहे. वातावरण बदल, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या सातत्याने वाढणाऱ्या आव्हानांशी जग दोन हात करत असताना, गांधीजींनी शिकविलेली मूल्ये नैतिकतेची मोजपट्टी ठरत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी म्हणाले, ते अगदी योग्य आहे. लोकांच्या सामूहिक इच्छाशक्तीवरील गांधीजींचा प्रगाढ विश्वास, त्यांची नैतिकतेशी अतूट बांधिलकी, सामाजिक-आर्थिक विषमता दूर करण्यासाठीचे त्यांचे अथक परिश्रम आणि सर्वांचे प्राक्तन सामाईक असल्याविषयीची त्यांची श्रद्धा हे सर्व आजच्या काळालाही चपखलपणे उपयोगी पडणारे आहे.बापूंनी अनुसरलेला सत्याग्रहाचा सिद्धांत कालांतराने जगभरात राजकीय व सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली साधन ठरला, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘अहिंसा ही मानवाच्या हाती असलेली सर्वात अमोघ शक्ती आहे. मानवी बुद्धीने शोधून काढलेल्या सर्वाधिक संहारक अस्त्राहून अहिंसेची शक्ती मोठी आहे.’ २ आॅक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून जाहीर केला, ही आपणा भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मानवी स्वभावाचे त्यांना सखोल ज्ञान होते आणि त्यातूनच हिंसाचार व दडपशाहीवर फक्त अहिंसा, मानवता व करुणा यानेच मात करता येते, याचा धडा त्यांना दक्षिण आफ्रिकेत मिळाला. गांधीजींची ही दृष्टी आणि वसाहतवादी शासनाकडून होणारी पिळवणूक व दडपशाही याविरुद्ध अहिंसेचा एक अत्यंत प्रभावी अस्त्र म्हणून त्यांनी केलेला वापर याने मार्टिन ल्युथर किंग (ज्यू), नेल्सन मंडेला व हो ची मिन्ह यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना कायमचे प्रभावित केले. प्राचीन ऋषिमुनींची अमोल दिव्यदृष्टी आणि एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचे व्यवहारज्ञान आणि सहृदयता यांचा समुच्चय असलेला गांधीजी हा एक महामानव होता.आज आपण देशाचा सामाजिक स्तर कसा सुधारावा आणि शासनव्यवस्था अधिक सक्षम कशी करावी, याचा विचार करत असताना, बापूंनी भूमितीतील चौकोन आणि वर्तुळ या संकल्पनांच्या आधारे स्वराज्य व शासनाविषयीच्या आपल्या कल्पना कशा मांडल्या होत्या, हे पाहणे उपयुक्त ठरेल. ‘हरिजन’ नियतकालिकात २ जानेवारी, १९३७ रोजी लिहिलेल्या लेखात त्यांनी स्वराज्याची कल्पना अशी मांडली होती: ‘स्वराज्याच्या माझ्या कल्पनेविषयी जराही गैरमज करून घेऊ नका...एकीकडे राजकीय स्वातंत्र्य आहे, तर दुसºया टोकाला आर्थिक स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याची ही दोन टोके आहेत. त्यापैकी एक नैतिक व सामाजिक आहे. त्याचे अंतिम उद्दिष्ट खºया, सर्वोच्च अर्थाने धर्म आहे. या धर्मात हिंदू, इस्लाम व ख्रिश्चन अशा धर्मांचा अंतर्भाव होतोे, तरीही तो या सर्वांहून श्रेष्ठ आहे. याला आपण स्वातंत्र्याचे वर्तुळ म्हणू या. यापैकी एक जरी कोन चुकला, तर या वर्तुळाचा आकार बिघडून जाईल’. गांधीजींनी मांडलेली ही वर्तुळाच्या चतुष्कोनांची कल्पना त्यावेळी जेवढी समर्पक होती, तेवढीच ती आजही आहे.गांधीजींच्या विकासाच्या कल्पनेतही लोकांना परिवर्तनाचे मुख्य साधन मानले गेले होते. गांधीजींचा हा तळापासून वर जाणारा सर्व समावेशक, सुकर आणि शाश्वत विकासाचा विचार होता. या व्यवस्थेत खरी लोकशाही अभिप्रेत असल्याने त्यांनी याची तुलना रामराज्याशी केली. ग्रामराज्याशिवाय रामराज्य अपूर्ण आहे, असे बापूजींचे मत होते. आज आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत आणि समग्र विकासाच्या मॉडेलने खेडी बळकट करून ग्रामीण व शहरी भागातील तफावत दूर करण्यासाठी झटत असताना, गांधीजींचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न अधिकच समर्पकतेने लागू होणारे ठरते. मोदींच्या या मॉडेलमध्येही गांधीजींच्या विचारानुसार शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा व सार्वजनिक स्वच्छता या माध्यमांतून खेड्यांचा विकास करण्याची कल्पना आहे.अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट सामाजिक रूढींचे उच्चाटन करणे व सांप्रदायिक सलोखा जोपासणे हाही गांधीजींच्या विचारसरणीचा गाभा होता. अस्पृश्यता हे एक पाप आहे, एक गुन्हा आहे व हिंदू समाजाने या सापाला ठेचले नाही, तर एक दिवस तोच हिंदूंना गिळून टाकेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. सार्वजनिक स्वच्छता व निरामय परिसर हे राजकीय स्वातंत्र्याहून अधिक महत्त्वाचे असल्याचे ते मानत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये सुरू केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ ही गांधीजींच्या स्मृतीला कृती आणि विचाराने वाहिलेली सर्वश्रेष्ठ श्रद्धांजलीच आहे.आपल्या संसदीय लोकशाहीवर आत्मचिंतन करतानाही गांधीजींचे विचार तेजस्वी मार्गदर्शक ठरतात. गांधीजींच्या मते सत्शील चारित्र्य हा समाजसेवेसाठी प्रमुख निकष होता. त्यांनी ठामपणे म्हटले होते की, चारित्र्यवान नसलेली व्यक्ती उच्च कोटीची देशसेवा कदापि करू शकणार नाही, असे मला वाटते. मंत्र्यांनी मंत्रिपदे सेवेचे माध्यम म्हणून उपभोगायला हवीत, असा त्यांचा आग्रह असे. काहीही करून प्रत्येकाने ज्यांचा त्याग करायला हवा, अशी सहा महापातके गांधीजींनी नमूद केली होती: निष्काम ऐश्वर्य, अविवेकी सुख, चारित्र्यहिन ज्ञान, मानवताहीन विज्ञान, त्यागाविना धर्म व मूल्यहीन राजकारण. गांधीजींनी समस्त मानवतेला दिलेली ही नैतिक मोजपट्टी आहे.प्रार्थनेत मोठी शक्ती असते व प्रार्थनेला लीनतेची जोड दिली, तर त्याने आत्मशुद्धी निश्चित होते, यावर गांधीजींचा गाढा विश्वास होता. सध्या सर्वत्र उर्मटपणा, असहिष्णुता व तिरस्काराचा बोलबाला दिसत असताना, गांधीजींनी सांगितलेले वैश्विक प्रेम आणि बंधुभावाचे, तसेच सृष्टीत अगदी लहानात लहान सजीवाविषयी करुणा याचे महात्म्य लक्षात घेण्यासारखे आहे. गांधीजींनी जो विश्वस्तपणाचा विचार मांडला, त्याला सर्वांविषयी प्रेम आणि करुणेच्या भारतीय तत्त्वचिंतनाचा आधार आहे.गांधीजींनी आपल्याला दिलेल्या विचारधनाच्या अफाट महासागरातून निघालेली ही काही निवडक रत्नेच मी तुमच्यापुढे ठेवली आहेत. देश आर्थिकदृष्ट्या बळकट होऊन विकासाची फळे प्रत्येक नागरिकास चाखायला मिळावीत, यासाठी प्रयत्न करत असताना आपण योग्य दिशेना वाटचाल करत आहोत की नाही, हे पाहण्यासाठी गांधीजींचे स्वराज्याविषयीचे विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत. महात्मा गांधी जगासाठी कसे चिरकाल स्फूर्तिदाते आहेत, याविषयी मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांनी काय म्हटले ते पाहा: ‘मानवाला प्रगती करायची असेल, तर गांधी अपरिहार्य आहेत. मानवतेची वाटचाल शांतता व सलोख्याचे जग निर्माण करण्यासाठीच होणार आहे, या विचाराने प्रेरित होऊनच गांधी जगले, त्यांनी त्याचाच विचार केला व त्याच दिशेने कृती केली. त्यांना दुलर्क्षित करणे म्हणजे स्वत:हून धोक्याला निमंत्रण देणे ठरेल.’गांधीजींचे विचार दैनंदिन जीवनात आत्मसात करून व कृतीत उतरवून आपण आपल्या आयुष्यांचे परिवर्तन करणे हिच या महात्म्याला १५०व्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.
महात्मा गांधीजींचे विचारधन चिरंतन उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 12:11 AM