अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची २६१५ वी जयंती आज संपूर्ण भारतवर्षात संपन्न होत आहे.भगवान महावीरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. परंतु महावीरांनी त्यात सुख मानले नाही. अल्पवयातच त्यांनी मोहमायेचा त्याग करून तपाचरण केले व सर्व प्राणिमात्राला कल्याणाचा मार्ग दाखविला.आत्मवाद, रत्नत्रयवाद, वस्तू स्वातंत्र्यवाद, अहिंसावाद, अपरिग्रहवाद, अनेकांतवाद, सर्वोदयवाद इ. लोककल्याणकारक सिद्धांताचा महावीरांनी पुरस्कार केला.जीवनातील सर्व समस्यांचे मूळ हिंसा आहे. जैन दर्शनात अहिंसापूर्वक समताच खरा धर्म असल्याचे सांगितले आहे. सुख सर्वांना प्रिय आहे. जसा व्यवहार स्वत:करिता तसाच दुसऱ्याशी असावा. ‘जगा नि जगू द्या’ असा सर्वमान्य संदेश भगवान महावीरांनी दिला. अहिंसा सर्व प्राणिमात्राचा स्वभावधर्म असल्याने तो विश्वधर्म आहे. केवळ जीव वध करण्याने हिंसा होते वा तो न करण्याने अहिंसा होते, असे नव्हे. उलट आपल्या क्रियेत प्रमाद काय आहे, हे महत्वाचे. हेतुरहित कोणतीही कृती हिंसा होत नाही. रागद्वेषादी विकारांना मनात न येऊ देणे अहिंसा होय. भारतासारख्या शांतताप्रिय देशात आज अनेक आव्हाने उभी आहेत. जागतिक दहशतवादास तोंड देण्याची जबाबदारी प्रत्येक देशाला पार पाडावी लागणार आहे. देशाच्या इतिहासात निरपराध माणसाना आपले प्राण गमवावे लागले. कौटुंबिक नातेसंबंधात खून, हाणामारीच्या घटना घडतात. हिंसात्मक कारवायाची यादी न संपणारी आहे. त्याकरिता एकच उपाय आहे, अहिंसेचा अवलंब करणे.‘अहिंसा परमो धर्म:’ ही भगवान महावीरांची शिकवण जगभर पोहोचविण्याची आवश्यकता आहे. जगातील अनेकांना हिंसा नको आहे. जगातील १८७ देशांनी युनोकडे मागणी केली आहे की २ आॅक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून जाहीर करावा. त्याप्रमाणे हा दिवस अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. भगवान महावीरांनी जैन दर्शनात ‘अहिंसा’ अखिल प्राणीमात्रासाठी आहे हे दर्शविले आहे. जे प्राणीमात्रासाठी आहे ते विश्वासाठी आहे व जो धर्म सर्व विश्वासंबंधी आहे तोच विश्वधर्म आहे. देशातील सर्व धर्मांनी, संप्रदायांनी अहिंसेचे समर्थन केले आहे. महाभारत, बुद्ध धर्मातील धम्मपदात याचा उल्लेख आढळतो.भावहिंसा: रागद्वेषादि विकार न होणे ही भाव हिंसा होय.द्रव्यहिंसा: जीवाचा योजनापूर्वक वध करणे ही द्रव्यहिंसा होय.थोडक्यात भावहिंसेत हिंसेची भावना असते.द्रव्यहिंसेत प्रत्यक्ष कृती आहे. जैन दर्शनात अहिंसेचा सूक्ष्म विचार केला आहे. आयुर्वेदात औषधी निर्माण करताना कोणत्याही प्रकारे हिंसा होणार नाही याची दक्षता घेतली आहे.पुष्पार्युवेद ग्रंथात अकरा हजार जातीच्या फुलांच्या उपयोगाने औषध तयार करण्याच्या अहिंसक प्रक्रिया सांगितल्या आहेत. यात केवळ परागरहित फुलांचा उपयोग होतो. भगवान महावीरांनी अहिंसेचा जोरदार पुरस्कार केला. त्यामुळे जैनदर्शन व भगवान महावीर परस्पर पर्याय झाले. अहिंसेने सर्वत्र सामंजस्य निर्माण होऊन सुख, शांती व समाधान मिळेल यात कोणतीही शंका नाही. प्रत्येकाने अहिंसा तत्त्वाचे पालन करण्याचा संकल्प केल्यास खऱ्या अर्थाने भगवान महावीर जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल.- रवींद्रकुमार बानाईत, जैन
महावीरांचा अहिंसा धर्म, हाच खरा विश्व धर्म़़
By admin | Published: April 19, 2016 2:55 AM