उत्सवातील उत्साहामुळे काय होते हे केरळकडून शिका, असे हर्षवर्धन यांनी अन्य राज्यांना सांगितले. महाराष्ट्रातील भाजपच्या उतावीळ नेत्यांनी आपल्याच आरोग्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे आणि आपल्या धर्माधिष्ठित मागण्यांना काही तरी महिने मुरड घालावी, हे बरे!
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सरकारने नेमलेल्या शास्रज्ञांच्या तज्ज्ञ समितीने रविवारी कोरोना साथीबाबत दिलेली माहिती उत्सवाच्या काळात दिलासा देणारी आहे. कोरोना साथीचा भारतातील उच्चांक सप्टेंबरमध्ये येऊन गेला. आता रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. ही घट कायम राहिली तर फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल असा अंदाज शास्रज्ञांच्या समितीने मांडला. सप्टेंबर महिन्यांत सक्रिय रुग्णांची संख्या दहा लाखांच्या वर होती, ऑक्टोबरमध्ये ती साडेसात लाखांवर आली. देशात सर्व ठिकाणी रुग्णसंख्येला उतार पडलेला दिसतो. महाराष्ट्र अद्यापही आघाडीवर असला तरी इथेही परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
कोरोना चाचण्यांची संख्या कमी झालेली नाही. चाचण्या कमी करून रुग्णसंख्या कृत्रिमरीत्या कमी दाखविता आली असती. भारताने तसे केले नाही. कोरोनाची वास्तव स्थिती व त्यावरील उपाययोजना याबाबत भारतात लपवाछपवी झाली नाही. तथाकथित प्रगत देशांना हे वास्तव पचविणे कठीण जाते. कोरोना नियंत्रणासाठी झालेले प्रयत्न सर्वोत्कृष्ट होते, असे कोणी म्हणणार नाही. यामध्ये राहिलेल्या त्रुटींवर वेळोवेळी बोट ठेवले गेले. त्रुटी लक्षात आणून दिल्यावर सरकारने त्यावर उपाययोजना केली हेही मान्य केले पाहिजे. सरकार, प्रशासन, वैद्यक क्षेत्र व नागरिक या सर्वांनी आपल्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यामुळे देशाला मोठ्या संकटापासून दूर ठेवता आले. वेळीच जाहीर केलेल्या लॉकडाऊनने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, असे शास्रज्ञांच्या समितीने म्हटले आहे.
लॉकडाऊन उशिरा लागू केला असता तर जूनमध्येच रुग्णसंख्या दीड कोटीपर्यंत गेली असती. त्याचा भयंकर ताण वैद्यक सेवेवर पडला असता आणि किमान २६ लाख रुग्ण मृत्युमुखी पडले असते असे समितीने म्हटले आहे. आजही रुग्णसंख्येचा आकडा सत्तर लाखांच्या पुढे आहे. मात्र यापुढील वाढ मंदगतीने होईल आणि त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळतील. अफाट लोकसंख्या, गरिबी आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे भारताला कोरोनाचा जबरदस्त फटका बसेल अशी अटकळ सर्वांनी बांधली होती. सुदैवाने ती खोटी ठरली. तथापि, दिवाळी साजरी करण्याची वेळ अद्याप आलेली नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. गर्दी टाळणे आणि मास्क घालणे ही बंधने गेले सहा महिने नागरिक पाळीत आहेत. लॉकडाऊन शिथिल होऊ लागल्यावर ही बंधने सोडून देण्याकडे नागरिकांचा कल जाणे हे मनुष्यस्वभावाला धरून आहे. पण चूक केली तर कोरोना पुन्हा वेगाने सक्रिय होईल हा धोका आजही कायम आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन याकडे सातत्याने लक्ष वेधीत आहेत. कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात केरळने उत्तम कामगिरी बजावली. या चांगल्या कामाची हर्षवर्धन यांनीही आठवण करून दिली. मात्र कोरोना मंदावताच ओनम सणासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले.
विवाह समारंभांना परवानगी देण्यात आली. निर्बंध हटताच कोरोनाने संधी साधली आणि आज केरळमध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल रुग्णसंख्या आहे. उत्सवातील उत्साहामुळे काय होते हे केरळकडून शिका, असे हर्षवर्धन यांनी अन्य राज्यांना सांगितले. महाराष्ट्रातील भाजपच्या उतावीळ नेत्यांनी आपल्याच आरोग्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे आणि आपल्या धर्माधिष्ठित मागण्यांना काही महिने तरी मुरड घालावी. हर्षवर्धन यांचा मुद्दा वैज्ञानिक होता, तरी त्याला डाव्या पक्षांची सत्ता असलेल्या केरळमधून वैचारिक फोडणी देण्याचे उद्योग सुरू झाले आणि केंद्र सरकारच्या विरोधात कांगावा सुरू झाला. तो करण्याची गरज नाही. कोरोना विचारधारा पाहून पसरत नाही वा थांबत नाही. शरीरात घुसण्याची संधी मिळाली की धर्म, जात-पात, लिंग, वय याकडे तो पाहात नाही. या अर्थाने तो कमालीचा ‘सेक्युलर’ आहे व ‘सेक्युलर’ मार्गाने, म्हणजे वैद्यानिक पद्धतीने त्याला नामोहरम केले पाहिजे. रुग्णसंख्या घटली म्हणजे कोरोना नष्ट झालेला नाही. आपल्या आजूबाजूला तो दबा धरून बसला आहे. आक्रमण करण्याची त्याची शक्ती कायम आहे. दबा धरून बसलेला शत्रू जास्त घातक असतो हे लक्षात ठेवून ‘चार फुटांचे अंतर, मास्क निरंतर’ याच नियमाने आपण दसरा-दिवाळी साजरी केली पाहिजे.