पृथ्वीतलावरील सर्वच देशांना एका मंचावर आणणाऱ्या ३३ व्या पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप रविवारी रात्री झाला. २०६ देशांच्या १० हजार ७१४ खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली. गतिमान, उच्चतम आणि शक्तिमान या मूल्यांना वाहिलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रारंभ प्राचीन काळात ग्रीक देशाच्या अथेन्स शहरात झाला. ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान १९०० मध्ये फ्रान्सला पहिल्यांदा, १९२४ मध्ये दुसऱ्यांदा तर बराेबर शंभर वर्षांनी अर्थात रविवारी संपलेली स्पर्धा तिसऱ्यांदा फ्रान्सने आयाेजित केली हाेती. सुमारे ९ अब्ज डाॅलर्स खर्चाची ही स्पर्धा म्हणजे सर्वांना जातिभेद, लिंग, वंश, वर्णभेद सामावून घेणारा उत्सवच आहे. सुमारे ३५ क्रीडा प्रकारांतील विविध ३२९ स्पर्धा हाेतात.
सतरा दिवसांत स्पर्धा चढत्या क्रमाने हाेत गेली. अमेरिकेने सर्वाधिक १२८ पदके जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. चीन, जपान, फ्रान्स या नेहमी ही स्पर्धा गाजविणाऱ्या देशांनी चांगली कामगिरी केली. २०६ देशांनी भाग घेऊन एकूण ९४ देशांनी पदके जिंकून उत्तम कामगिरी केली. भारताने ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उतरवून एक राैप्य आणि पाच कांस्यपदके पटकावली. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय संघाने ही दुसऱ्यांदा उत्तम कामगिरी केली आहे. भारताने आजवर ४१ पदके जिंकली आहेत. भारतीय पथकातील वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पाच खेळाडूंनी तर सांघिक स्पर्धेत हाॅकी संघाने कांस्यपदक पटकावले.
पहिल्या दहा क्रमांकावरील देशांची पदक संख्या पाहिली तर आपल्याला फार माेठा टप्पा गाठायचा आहे. सहा खेळाडू चाैथ्या स्थानावर पाेहाेचू शकले आहेत. याचाच अर्थ हाॅकीसह एकूण बारा खेळाडूंनी नेमबाजी, कुस्ती, ॲथलेटिक्स याच क्रीडा प्रकारांत चमक दाखवली आहे. फुटबाॅल किंवा बास्केटबाॅल आदी क्रीडा प्रकारांत भारत पात्रता फेरी गाठून ऑलिम्पिकमध्ये सहभागी हाेत नाही. हीच अवस्था अनेक क्रीडा प्रकारांची आहे. भारताला क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मूलभूत सुविधा निर्माण करून तळातून सुरुवात करावी लागणार आहे. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला सुवर्णपदक मिळताच दहा काेटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. मात्र ताे जेव्हा सराव करत हाेता तेव्हा भाला खरेदीसाठी लाेकवर्गणी गाेळा करावी लागली हाेती. तशीच परिस्थिती भारतीय खेळाडूंची आहे.
काेल्हापूरचा स्वप्निल कुसाळे याला नेमबाज हाेण्यासाठी शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांना कर्ज काढून पैसा उभा करावा लागला हाेता. कांस्यपदक मिळताच सरकारपासून अनेक व्यक्ती आणि संस्थांनी काेट्यवधींची बक्षिसे जाहीर केली आहेत. ती त्याच्या पुढील वाटचालीस उपयुक्त ठरतील. पण ऑलिम्पिक स्पर्धा पात्र खेळाडू हाेईपर्यंत फारशी मदत मिळत नाही. सर्वच क्रीडा प्रकार किंवा स्पर्धांकडे आपण भावनिक पद्धतीने पाहताे. पदक जिंकल्यावरच खेळाडूचे कष्ट दिसतात. ती स्पर्धा जिंकण्यासाठी लागणाऱ्या साधनांचा आणि त्याच्या गरजांचा विचार केला जात नाही. महाराष्ट्रातील कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ७२ वर्षांपूर्वी हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले हाेते.
वैयक्तिक स्पर्धेतील महाराष्ट्रीयन खेळाडूचे ते पहिले पदक होते. त्यानंतर स्वप्निल कुसाळे हा दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू आहे ज्याने वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत पदक पटकावले आहे. याचाच अर्थ असा की, महाराष्ट्रातून ७२ वर्षांत दुसरा खेळाडू निर्माण झाला नाही. भारतीय महिला कुस्तीपटूंची स्थिती आपण महावीर फाेगाट यांच्या जीवनावरील ‘दंगल’ चित्रपट पाहिल्यावर लक्षात आली. त्या चित्रपटाचा पुढील भाग असावा, अशी विनेश फाेगाट हिची कुस्ती गाजली. शंभर ग्रॅम वजन वाढल्याने तिला अपात्र घाेषित केल्यावर सारा देश हळहळला. तिने केलेले ट्विट काळजात धस्स करणारे हाेते. आईला ती म्हणते, ‘मी हरले, मला माफ कर आई!’ पॅरिस ऑलिम्पिक प्रत्येक भारतीयांच्या मनात विनेश फाेगाट हिच्या रूपाने कायमचे स्मरणात राहील. विनेश फाेगाटसह अनेक महिला कुस्तीपटूंचा मैदानाबाहेरचा संघर्ष सर्वांना माहीत आहे.
आपल्या गावा-गावातील खेळाडूंना जे कष्ट घ्यावे लागतात, त्याला थाेडा जरी संवेदनशीलपणे प्रतिसाद दिला तर आपले खेळाडूदेखील डझनाने पदके आणतील. केंद्र सरकार अलीकडे ‘खेलाे इंडिया’च्या माेहिमेतून प्रयत्न करते आहे. मात्र ते फार अपुरे आहेत. भारताचे खेळाचे बजेट देशाचे आकारमान पाहता लाख काेटी रुपयांचे जरूर पाहिजे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची (आणि न मिळवलेल्यांचीही) वाटचाल प्रेरणादायी आहे. आज पदके मिळणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत ७१ व्या स्थानी आहे. पुढील स्पर्धेत आणखी जादा पदके मिळवण्याची प्रेरणा घेऊन विजेत्यांचे अभिनंदन करूया!