भारत जाेडाे न्याय यात्रेच्या सांगतेचे रूपांतर ‘चले जाव’ सभेत झाले आणि अठराव्या लाेकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा विराेधकांचा आवाज बुलंद झाला. दहा वर्षांच्या भाजपच्या सत्तेस आव्हान देण्यासाठी सारे विराेधक एकवटणे आणि समान कार्यक्रम पत्रिकेवर जनतेला पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक हाेते. लाेकशाही बळकट हाेण्यासाठी दाेन्ही बाजूने वाद-प्रतिवाद घातला गेला पाहिजे. मतदारांना पर्याय देऊन निवड करण्यास सांगितले पाहिजे, त्यात सत्तारूढ पक्षांचा कस लागेल आणि विराेधी पक्षांना सत्तेवर येण्यासाठी पर्यायी कार्यक्रम देण्याची उसंत मिळेल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाेन भारत जाेडाे यात्रांच्या निमित्ताने लाेकसंपर्काचा माेठा कार्यक्रम राबविला. यात्रा खरेच गरज हाेती. काँग्रेस पक्षाला राजकीय कार्यक्रम घेऊन जनतेपर्यंत जायचे असते, याचा विसर पडला हाेता. त्याची जाणीव राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना करून दिली. लाेकशाहीत वाद-प्रतिवाद झाल्याशिवाय राजकीय घुसळण हाेत नाही.
पर्यायी कार्यक्रम दिल्याशिवाय विद्यमान सरकारच्या कार्यक्रमांचे यथायाेग्य मूल्यमापन हाेत नाही. कारण आपला देश एक खंडप्राय प्रदेश आहे. प्रदेशानुसार भाषा बदलते, तशा समस्याही बदलतात. त्या साेडविण्याचे उपाय मांडले तरच मतदारांना पर्याय मिळेल. सत्तारूढ भाजपने अशी गॅरंटी दिली आहे की, मतदारांनी त्यांनाच मत देण्याशिवाय पर्याय नाही. लाेकशाहीत असे हाेणे किंवा मानणे याेग्य नाही. त्यातून लाेकशाही व्यवस्था निष्क्रिय हाेण्याची भीती असते. भाजपच्या याच भूमिकेला पर्याय देण्याची गरज आहे. ताे पर्याय पटला नाही, किंबहुना भाजपला पर्याय नाही, असे जनमत असेल तर तसा निर्णय हाेईल. मात्र पर्यायच नाही, हे बराेबर नाही. आणीबाणीनंतर झालेल्या सहाव्या लाेकसभेच्या निवडणुकीत ठाेस पर्याय नव्हता, तरीदेखील काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे यावर बहुमतांचे एकमत हाेते. त्यातून जाे पर्याय समाेर आला ताे चालला नाही. तेव्हा त्याच मतदारांनी पुन्हा काँग्रेसला निवडले. त्यातून लाेकशाही अधिक बळकट झाली. पुन्हा काेणी आणीबाणीचा वापर करून जनतेचा आवाज दडपणार नाही, याची शिकवण तरी मतदारांनी दिली हाेती.
‘माेदींची गॅरंटी’ ही भाषा आता वापरली जाऊ लागली आहे. देशाचा कारभार काेणा एकाच्या नावाने चालू नये, देशाच्या नावाने निवडून आलेल्या व्यक्तीने काम करावे, या मर्मावर उद्धव ठाकरे यांनी भारत जाेडाे न्याय यात्रेच्या सांगता सभेत बाेट ठेवले. भाजप सर्व देशव्यापी अस्तित्व किंवा राजकीय पर्याय म्हणून नाही, तशीच अवस्था काँग्रेसची झाली आहे. परिणामी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. राहुल गांधी यांनी आघाडीला माेठे बळ या यात्रेने उभे केले. सांगता सभेत जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राज्य करणाऱ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीने देशव्यापी पर्याय उभा राहताे आहे. मतदारांच्या पसंतीने आणि राजकीय पक्षांच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार मतदारांचा काैल येईल, पण पर्यायच नाही, ही अवस्था चांगली नाही. ताे पर्याय देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला, ही अठराव्या सार्वत्रिक निवडणुकीची चांगली सुरुवात आहे, असे मानायला हरकत नाही. इकडे इंडिया आघाडीची सभा हाेत असताना तसेच ‘चले जाव’चा नारा दिला जात असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक हाेत हाेती. पुन्हा सत्तेवर येताच आपला कार्यक्रम तयार असला पाहिजे, असे प्रत्येक मंत्रालयास सांगितले जात हाेते. हा मतदानापूर्वीचा निकाल गृहीत धरून केलेली अतिघाई आहे, असे मानायला जागा आहे. राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, फारुख अब्दुल्ला, एम. के. स्टॅलिन, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, मल्लिकार्जुन खरगे आदी साऱ्या नेत्यांनी ‘चले जाव’चा नारा देताना ब्रिटिश राजवटीचे स्मरण करून दिले. महात्मा गांधी यांनी याच मुंबईनगरीतून १९४२ मध्ये ‘चले जाव’चा नारा दिला हाेता. हा बदलाचा संदेश असू शकताे. ताे पर्यायाच्या रूपानेच दिला पाहिजे. विराेधक देत असलेल्या पर्यायावर मात करण्याची संधी सत्ताधाऱ्यांनाही असते. अशासाठीच सारे जाेडले जाणे आणि सत्तारूढ पक्षाला पर्याय देणे लाेकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. इंडिया आघाडीचे नेते सारे ‘जाेडले’ गेले, आता प्रचारात किती आघाडी घेतात ते पाहावे लागेल.