महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा माहोल सध्या ‘नांदा साैख्य भरे’च्या टप्प्यावर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ‘भांडा साैख्य भरे’ सुरू होईल. महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटप, सगळ्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा हे सर्व सुरू असताना राजकीय पक्ष आणि खासकरून काही घराणी ज्या काही ‘तडजोडी’ करीत आहेत, त्या पाहिल्या तर डोके भणाणून जावे. विचारधारा, पक्ष, नेते यावरील निष्ठा खुंटीला अडकवून भद्र-अभद्र पक्षांतरे सुरू आहेत. पक्षांच्या फोडाफोडीमुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहेच. तरीदेखील काही नेते, त्यांची कुटुंबे कुठल्या तरी एका बाजूला आहेत, हे समाधान होते. तेदेखील मतदारांना मिळू न देण्याचा चंग जणू या मंडळींनी बांधला आहे.
भाजप व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरे यांची मनसे तसेच बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे यांची परिवर्तन महाशक्ती आघाडी, ॲड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी इतकी गर्दी निवडणुकीत उतरली आहे. शिंदेसेनेला बंडावर लोकप्रियतेचा शिक्का हवा आहे, तर त्यांच्यावरील गद्दारीचा शिक्का उद्धव ठाकरे यांना सिद्ध करायचा आहे. अशीच स्थिती दोन्ही राष्ट्रवादींची आहे. महायुती व महाविकास आघाडी महाराष्ट्राचे कधीच हित साधू शकत नाही हा तिसऱ्या, चाैथ्या, पाचव्या आघाडीचा प्रचाराचा मुद्दा आहे. अर्थातच विधानसभेत जाण्याची स्वप्ने पडणाऱ्यांना उमेदवारीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी इकडून तिकडे उड्या मात्र नक्कीच माराव्या लागतील. तशा त्या मारताना होणारी पक्षांतरे धक्कादायक मात्र अजिबात नाहीत. ती ठरवून केली जात आहेत. सगळ्यांची सोय पाहून निर्णय होत आहेत.
नवी मुंबईतल्या नाईक कुटुंबाला एकापेक्षा अधिक आमदारकी घरात हव्या आहेत. त्यासाठी वडील गणेश नाईकांनी हातात ‘कमळ’ तर मुलगा संदीपने हातात ‘तुतारी’ घेतली आहे. एकाचवेळी ‘कमळ’ फुलेल व ‘तुतारी’ही वाजेल असे स्वप्न पाहिले जात आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याही घरात दोन पक्ष अवतरले आहेत. स्वत: राणे लोकसभेला विजयी झाले आहेतच. कणकवलीत नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तथापि, माजी खासदार निलेश राणे यांना भाजपमधून संधी शक्य नसल्याने त्यांनी आता शिंदेसेना जवळ केली आहे. भुजबळांच्या घरातही दोन पक्ष अवतरले आहेत. स्वत: छगन भुजबळ येवल्यातून अजित पवार गटातून लढतील. त्यांचे चिरंजीव, शेजारच्या नांदगावचे माजी आमदार पंकज भुजबळ नुकतेच राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेचे आमदार बनले. तिथले आमदार सुहास कांदे शिंदेसेनेत आहेत आणि भुजबळ-कांदे यांच्यातील वाद जुना आहे. पंकज यांच्या पराभवाचा वचपा माजी खासदार समीर भुजबळ यांना काढायचा आहे. विदर्भातील पुसदचे नाईक घराणेही मागे नाही. मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील सध्या पुसदचे अजित पवार गटाचे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांनी चुलत बंधू निलय नाईक यांचा पराभव केला होता. आता ही भाऊबंदकी थेट सख्ख्या नात्यात झिरपली आहे. इंद्रनील यांच्याविरोधात बंधू ययाती यांनी दंड थोपटले आहेत. मुलांच्या भांडणात मनोहरराव व्यथित आहेत.
या थोरांच्या घराघरांमध्ये एकत्र नांदू पाहणारे विविध पक्ष युती व आघाडीत एकमेकांना उमेदवारही पुरवत आहेत. पूर्व टोकावरच्या अर्जुनी मोरगावमध्ये भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांच्या छावणीत धाडले आहे. त्यासाठी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याचा त्याग अजित पवारांनी केला आहे. पती संजय खोडके अजित पवारांचे खास आणि आपण मात्र काँग्रेसच्या आमदार अशा एकाच घरात दोन स्वयंपाक घरांचा प्रयोग अमरावतीच्या सुलभा खोडके यांना नको असावा. म्हणून त्यांनी काँग्रेसचा त्याग केला. इगतपुरीचे हिरामण खोसकर तसे मूळचे राष्ट्रवादीचे. दिग्गज नेते माणिकराव गावितांच्या कन्या निर्मला या गेल्यावेळी काँग्रेस सोडून शिवसेनेत गेल्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीने खोसकरांना काँग्रेसमध्ये पाठवले. ते आमदार झाले. आता ते स्वगृही परतले आहेत. आता निर्मला गावित कधी परत जुन्या घरट्यात येतात ते पाहायचे. ही सगळी बजबजपुरी माजलीय ती केवळ आणि केवळ मतदारांना राजकीय पक्ष गृहीत धरीत असल्यामुळेच. अनुभव असा आहे की, मतदारांना हे अजिबात आवडत नाही. राजकीय पक्ष व घराण्यांकडून सुरू असलेली ही मनमानी मतदार सहन करतात का, हे निकालात स्पष्ट होईलच.