अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 06:57 AM2024-05-29T06:57:51+5:302024-05-29T06:59:06+5:30

छगन भुजबळांची खदखद, अजित पवारांचे विधान अन् बरंच काही...

Main Editorial on Mahayuti NDA BJP Ajit Pawar alliance in Maharashtra | अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

लोकसभा निवडणूक निकालास एक आठवडा शिल्लक असतानाच महाराष्ट्रातील महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच महायुतीत खडाजंगीस प्रारंभ होण्याचा अंदाज होताच; पण प्रत्यक्षात मतदानाचा अखेरचा टप्पा आटोपण्यापूर्वीच तलवारी परजण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला न गेल्याने निवडणूक लढविण्याची इच्छा दाबून टाकावी लागलेले त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीच, पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला गर्भित इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवता न आल्याची नाराजी भुजबळ यांनी कधीच लपवून ठेवली नव्हती. किंबहुना नाशिक मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार हे जाहीर होण्यापूर्वीच, भुजबळांनी खदखद व्यक्त करायला सुरुवात केली होती. महायुतीत सर्व काही ठीक नाही, असा अंदाज तेव्हाच आला होता.

त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेल्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीत भुजबळ यांनी, विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाप्रमाणे व्हायला नको, भाजपने दिलेल्या ‘शब्दा’नुसार ८० ते ९० जागा मिळायलाच हव्या, अशा आशयाचे वक्तव्य केले. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘अब कि बार, चारसौ पार’ या भाजपच्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसल्याचे विधान करून, त्यांनी थेट मधमाशांच्या पोळ्यातच हात घातला! त्याच बैठकीत त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार यांनी, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमके काय होईल, हे ब्रह्मदेवदेखील सांगू शकणार नाही, असे वक्तव्य केल्याने, महायुतीत आलबेल नसल्याच्या शंकेला खतपाणीच मिळाले. अजित पवार तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांच्यापासून चार हात अंतर राखणारा मुस्लीम समुदाय यावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिला, असेही विधान त्यांनी केले. भुजबळ व पवार यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महायुतीतील तिन्ही पक्ष वाटाघाटी करून विधानसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित करतील, असे वक्तव्य करून आग विझवण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे नेते नीलेश राणे आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भुजबळांना त्यांच्या विधानांसाठी धारेवर धरल्याने, पुन्हा एकदा आगीत तेल ओतले गेले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपसाठी देशभरात आणि त्यातही महाराष्ट्रात अनुकूल लागला तर ठीक; अन्यथा आगीचा भडका उडण्याचीच शक्यता अधिक! मुळातच भाजपचा मूळ कार्यकर्ता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत पाट लावण्याच्या पक्षनेतृत्वाच्या निर्णयाशी सहमत नव्हता; पण पक्षशिस्तीमुळे उघडपणे कोणी नाराजी बोलून दाखवली नाही. हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांना त्यामध्ये काही वावगे वाटले नव्हते. अर्थात भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना तेदेखील रूचले नव्हते. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडाच शिकवायला हवा, असे त्यांचे मत होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णयही भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता; पण तरीदेखील शिंदेसेनेच्या शिवसैनिकांसोबत जुळवून घेणे भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कठीण गेले नाही.

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेणे मात्र त्यांना जमलेच नाही. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर झाली आहे, तिने मूळ कधी धरलेच नाही, हे सतत जाणवत होते. छगन भुजबळ, अजित पवार, निलेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या विधानांनी ती वस्तुस्थितीच अधोरेखित केली आहे. बरोबर एक आठवड्याने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यामध्ये घटक पक्षांची कामगिरी कशी होते, यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. भाजपला सत्ता मिळाली व महाराष्ट्रातही त्या पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली, तर महायुतीतील भाजपचे वर्चस्व अधिक वाढेल. दुसरीकडे शिंदेसेना आणि अजित पवार गटाची कामगिरी समाधानकारक झाली नाही, तर त्यांना एक तर भाजपमागे फरपटत जावे लागेल किंवा मूळ पक्षाशी तडजोडीची तयारी ठेवावी लागेल. दोन्ही पर्याय मान्य नसल्यास, स्वत:ला मजबूत करण्याचे प्रयत्न करावे लागतील, जे अजिबात सोपे नसेल. भाजपची कामगिरी अपेक्षेनुरूप नसल्यास, त्या पक्षालाही नको त्या तडजोडी कराव्या लागतील. थोडक्यात, आजपासून एका आठवड्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण नवे वळण घेणार, हे निश्चित!

Web Title: Main Editorial on Mahayuti NDA BJP Ajit Pawar alliance in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.