शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 6:57 AM

छगन भुजबळांची खदखद, अजित पवारांचे विधान अन् बरंच काही...

लोकसभा निवडणूक निकालास एक आठवडा शिल्लक असतानाच महाराष्ट्रातील महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच महायुतीत खडाजंगीस प्रारंभ होण्याचा अंदाज होताच; पण प्रत्यक्षात मतदानाचा अखेरचा टप्पा आटोपण्यापूर्वीच तलवारी परजण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला न गेल्याने निवडणूक लढविण्याची इच्छा दाबून टाकावी लागलेले त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीच, पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला गर्भित इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवता न आल्याची नाराजी भुजबळ यांनी कधीच लपवून ठेवली नव्हती. किंबहुना नाशिक मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार हे जाहीर होण्यापूर्वीच, भुजबळांनी खदखद व्यक्त करायला सुरुवात केली होती. महायुतीत सर्व काही ठीक नाही, असा अंदाज तेव्हाच आला होता.

त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेल्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीत भुजबळ यांनी, विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाप्रमाणे व्हायला नको, भाजपने दिलेल्या ‘शब्दा’नुसार ८० ते ९० जागा मिळायलाच हव्या, अशा आशयाचे वक्तव्य केले. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘अब कि बार, चारसौ पार’ या भाजपच्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसल्याचे विधान करून, त्यांनी थेट मधमाशांच्या पोळ्यातच हात घातला! त्याच बैठकीत त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार यांनी, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमके काय होईल, हे ब्रह्मदेवदेखील सांगू शकणार नाही, असे वक्तव्य केल्याने, महायुतीत आलबेल नसल्याच्या शंकेला खतपाणीच मिळाले. अजित पवार तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांच्यापासून चार हात अंतर राखणारा मुस्लीम समुदाय यावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिला, असेही विधान त्यांनी केले. भुजबळ व पवार यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महायुतीतील तिन्ही पक्ष वाटाघाटी करून विधानसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित करतील, असे वक्तव्य करून आग विझवण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे नेते नीलेश राणे आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भुजबळांना त्यांच्या विधानांसाठी धारेवर धरल्याने, पुन्हा एकदा आगीत तेल ओतले गेले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपसाठी देशभरात आणि त्यातही महाराष्ट्रात अनुकूल लागला तर ठीक; अन्यथा आगीचा भडका उडण्याचीच शक्यता अधिक! मुळातच भाजपचा मूळ कार्यकर्ता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत पाट लावण्याच्या पक्षनेतृत्वाच्या निर्णयाशी सहमत नव्हता; पण पक्षशिस्तीमुळे उघडपणे कोणी नाराजी बोलून दाखवली नाही. हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांना त्यामध्ये काही वावगे वाटले नव्हते. अर्थात भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना तेदेखील रूचले नव्हते. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडाच शिकवायला हवा, असे त्यांचे मत होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णयही भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता; पण तरीदेखील शिंदेसेनेच्या शिवसैनिकांसोबत जुळवून घेणे भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कठीण गेले नाही.

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेणे मात्र त्यांना जमलेच नाही. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर झाली आहे, तिने मूळ कधी धरलेच नाही, हे सतत जाणवत होते. छगन भुजबळ, अजित पवार, निलेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या विधानांनी ती वस्तुस्थितीच अधोरेखित केली आहे. बरोबर एक आठवड्याने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यामध्ये घटक पक्षांची कामगिरी कशी होते, यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. भाजपला सत्ता मिळाली व महाराष्ट्रातही त्या पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली, तर महायुतीतील भाजपचे वर्चस्व अधिक वाढेल. दुसरीकडे शिंदेसेना आणि अजित पवार गटाची कामगिरी समाधानकारक झाली नाही, तर त्यांना एक तर भाजपमागे फरपटत जावे लागेल किंवा मूळ पक्षाशी तडजोडीची तयारी ठेवावी लागेल. दोन्ही पर्याय मान्य नसल्यास, स्वत:ला मजबूत करण्याचे प्रयत्न करावे लागतील, जे अजिबात सोपे नसेल. भाजपची कामगिरी अपेक्षेनुरूप नसल्यास, त्या पक्षालाही नको त्या तडजोडी कराव्या लागतील. थोडक्यात, आजपासून एका आठवड्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण नवे वळण घेणार, हे निश्चित!

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे