अटलबिहारी वाजपेयी आणि कांशीराम हे दोन दिग्गज नेते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकदा समोरासमोर आले होते. वाजपेयी यांनी कांशीराम यांना ‘जय भीम’ म्हणत नमस्कार केला. तितक्याच तत्परतेने कांशीराम हे वाजपेयींना ‘जय श्रीराम’ म्हणाले. टोकाचे वैचारिक मतभेद असूनही एकमेकांविषयीचा आदर कसा व्यक्त केला जात असे, याचे हे उत्तम उदाहरण. अशी उदाहरणे आता इतिहासाचा भाग बनत चालली आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अचानक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते समोरासमोर आले, दोघांनी हस्तांदोलन केले. दोघे एकमेकांशी बोलले अन् हसलेही. राज्याच्या राजकारणाने गेल्या काही महिन्यांमध्ये पातळी पार सोडलेली असताना ठाकरे-फडणवीस यांच्यात काही क्षण का होईना; पण संवाद व्हावा हे सुखावणारेच होते. मात्र, तो अपघात होता, हे दोन दिवसांपासून सुरू झालेल्या वाक्युद्धाने सिद्धच केले आहे.
ठाण्यातील महिला शिवसेना कार्यकर्तीस मारहाण झाली. तिची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्र परिषद घेऊन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटले. त्यावर, ‘मी फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नहीं, घुसेगा’, असे दबंग उत्तर फडणवीस यांनी दिले. पूर्वी कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे, नेते सावरून घ्यायचे. आता नेतेच एकमेकांना भिडतात. मग कार्यकर्तेही बिथरतात. गावागावांत मग गटतट तयार होऊन राजकीय दुष्मन्याही वाढतात. राजकारणातील समंजसपणाचे बोट नेत्यांनीच सोडून दिले, तर अधोगती अटळ आहे. औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रांत राज्य माघारले, तर विविध उपाययोजना करून पुन्हा प्रगती साधता येऊ शकेल; पण पुरोगामी महाराष्ट्रातील नेतृत्वाने समंजसपणाची कास सोडून दिली, तर त्यातून निर्माण होणारा सुसंस्कृतपणाचा अनुशेष कसा भरून काढणार? सत्तापक्षाने लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि विरोधकांनी ते अत्यंत प्रभावीपणे मांडावेत, हा खरेतर फोकस असायला हवा; पण त्याऐवजी भावनिक आणि त्यातही खालच्या दर्जाचे शब्द वापरणे यावरच दुर्दैवाने भर दिला जात आहे. आरोप- प्रत्यारोप करताना पातळी सोडणारे काही नेते प्रत्येक पक्षात आहेत.
या बडबोल्यांना महाराष्ट्र सकाळपासून एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. एक भोंगा सकाळी दहाला सुरू होतो. त्याच्या विधानांवरून मग उपभोंगे कानठळ्या वाजवत फिरत राहतात. लोकांना ते अजिबात रुचत नाही; पण लोक वाचाळ नसतात, ते निवडणुकीत बरोबर हिशेब करतात. या बडबोल्या नेत्यांकडे राजकीय मनोरंजनापलीकडे कोणी फारसे पाहत नाही. मात्र, उद्धव ठाकरे असोत, की देवेंद्र फडणवीस; यांनीही त्या रांगेत जाऊन बसणे योग्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीची परंपरा चालवूनही उद्धव यांनी एक सभ्य नेता, अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण केलेली आहे. या प्रतिमेला त्यांच्याकडून तडा जाऊ नये, ही माफक अपेक्षा आहे.
फडणवीस हे संघाच्या राजधानीतून आलेले विचारी नेते आहेत. लोखंडी पुलाने नागपूरचे इस पार (मूळ नागपूर) आणि उस पार (नंतर विस्तारलेले नागपूर), असे दोन भाग केले आहेत. इस पारमधील भाषा जरा रांगडी; पण उस पारच्या नागपूरची भाषा त्यापासून अंतर राखणारी. फडणवीस उस पारवाले आहेत आणि तसेच वागत, बोलत आले आहेत. या प्रतिमेला त्यांच्याकडूनच छेद जावा, असे कोणालाही वाटणार नाही. सत्ता जाण्यातून आलेल्या हताशेने बोलताना भरकटणे योग्य नाही, हे जसे ठाकरेंना लागू होते, तसेच मिळालेली सत्ता डोक्यात गेल्यासारखे बोलण्याचेही समर्थन केले जाऊ शकत नाही, हे फडणवीस यांना लागू होते. नेत्यांच्या बोलण्यातून एकमेकांबद्दल राग, असूया, द्वेष दिसला, तर तो गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये झिरपतो. त्यातून विनाकारण वितुष्टाच्या भिंती जागोजागी तयार होतात. बरं, एकमेकांवर अक्षरश: तुटून पडणारे नेते रात्रीतून कसे एकत्र येतात, हे सगळ्यांनी पाहिले आहे. त्यातून मग कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते. गावगल्ल्यांमध्ये वैराचे सातबारे घेऊन बसलेले कार्यकर्ते अशावेळी पार गोंधळून जातात. राजकीय अपरिहार्यतेतून कोण कोणाची गळाभेट कधी घेईल हे कोणी ताडले? तेव्हा, ‘दुश्मनी जम के करो, लेकिन यह गुंजाइश रहे की जब दोस्त बनो तो शर्मिंदा न हो’, हा बशीर बद्रचा शेर वैयक्तिक टीका करणाऱ्या नेत्यांनी लक्षात ठेवलेला बरा. त्यातच त्यांचे आणि महाराष्ट्राचेही हित आहे.