- गजानन दिवाण, सहायक संपादक ( gajanan.diwan@lokmat.com) घरदार, नोकरी सोडली तरच समाजकार्य होऊ शकते हे काही वास्तव नाही. हे सारे करून, आपला संसार सांभाळून महिन्याला स्वत: केवळ २०० रुपये द्यायचे आणि वर्षभरात साधारण ६० लाख रुपयांपर्यंत गरजूंना मदत करायची... असे कोणी करतोय म्हणून सांगत असेल तर किती विश्वास ठेवाल? जालन्यातील मैत्र मांदियाळीची टीम साधारण १० वर्षांपासून हेच करत आहे.
राज्य शासनात अभियंता म्हणून काम करणारे अजय किंगरे हेही तुमच्याआमच्या सारखेच. २०१२ त्यांनी ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक वाचले. तोपर्यंत समाजात असेही लोक असतात आणि त्यांच्यासाठी कोणीतरी काम करतोय हे किंगरे यांच्या गावीही नव्हते. ना कुठले नाते, ना कुठले रक्ताचे संबंध तरीही स्वत:चे गाव सोडून आदिवासींसाठी जीवन वाहिलेले प्रकाश आमटे, मंदाताई आमटे यांना भेटण्याची इच्छा झाली. सोबत काही मित्रांना घेऊन त्यांनी हेमलकसा गाठले. आमटेंचे काम पाहून आपणही काहीतरी वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जेवढे शक्य होते तेवढी देणगी देऊन हे सर्व मित्र जालन्याला परतले. त्यानंतर आलेल्या दिवाळीला मित्रांनी काही पैसे स्वत: जमा केले, जवळच्या मित्रांना मेसेज केले. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. साधारण एक लाख रुपये जमा झाले. हे पैसे घेऊन ते सर्वजण हेमलकसा येथे गेले. प्रत्येक देणगीदाराच्या नावाची पावती अनिकेत आमटे यांच्याकडून घेतली. या दात्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून ‘प्रकाशवाटा’ पुस्तक घेतले. प्रकाशभाऊंनी समाजासाठी केलेल्या या कामाचे कौतुक केले. या तरुणाईच्या समाजकार्याचे बीज येथे रोवले गेले. परततानाच ‘मैत्र मांदियाळी’ हे नावही ठरले. ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाला भेटून किंगरे यांनी पावती आणि ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक दिले. यात डॉक्टर, इंजिनिअर होते. नोकरदार होते. व्यावसायिकही होते. या सर्वांना प्रकाश आमटे दाम्पत्य आणि त्यांचे काम पहिल्यांदाच पुस्तकरूपातून समजले. समाजकार्य जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचविण्यासाठी हाच मार्ग स्वीकारण्याचे ठरले.जानेवारी २०१५ ला प्रत्येकी २०० रुपये जमा करून मैत्र मांदियाळीच्या कामाचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी व्हॉटस्ॲप नव्हते. मित्रांना टेक्स्ट मेसेज केले. पहिल्याच महिन्यात ७० जणांनी प्रत्येकी २०० रुपये दिले. प्रत्येकाचे नाव आणि त्या पैशांचे काय केले याचा हिशेब फेसबुकवर टाकण्यास सुरुवात केली. असे केल्याने विश्वास वाढला. ७० ची संख्या दोनशेवर पोहोचली.
एकदा मुंबईला जाताना किंगरे यांना एक्स्प्रेसवर एका हॉटेलवर कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी एक डबा ठेवलेला दिसला. ही कल्पना त्यांना आवडली. त्या डब्यावर निर्मात्याचे नाव होते, त्याचा फोटो काढला. परतताना नगरमध्ये त्यांची भेट आणि त्यांच्याकडील १३ बॉक्स घेतले. मैत्र मांदियाळीचे स्टीकर लावून जालन्यात ओळखीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवले. ते पाहून अनेक दुकानदारांचे फोन येऊ लागले. बॉक्सची ही संख्या पुढे एकट्या जालना जिल्ह्यात ३०० झाली. त्यावेळी दर महिन्याला या सर्व बॉक्समधून ७० ते ८० हजार रुपये जमा होऊ लागले. पुढे व्हॉटस्ॲप आले. पैसे देणाऱ्यांची नावे, रक्कम आणि ते कोणाला दिले याचा हिशेब दर महिन्याला व्हॉटस्ॲप आणि फेसबुकवर शेअर करण्यात येऊ लागला.
मैत्र मांदियाळीच्या सदस्यांनी आतापर्यंत प्रवास, पेट्रोल यासह येण्या-जाण्याचा खर्च यात कधीच लावला नाही. लोकांना हा हिशेब दिसू लागला. त्यामुळे विश्वास वाढू लागला. एका मित्राचा वाढदिवस होता. त्यांना तो बीड जिल्ह्यातील सहारा अनाथालयात साजरा करायचा होता. काही कारणामुळे त्यांना जाणे जमले नाही. त्यामुळे रात्री हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीवर पाच हजार खर्च झाला. हेच पैसे सहारा अनाथालयाला दिले असते तर अनेकांचे पोट भरले असते असा विचार पुढे आला. त्या मित्राकडून अडीच हजार घेतले आणि त्याची पोस्ट करून फेसबुकवर शेअर केली. त्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोणाचा तरी वाढदिवस किंवा स्मरणदिवस असेल तर लोक स्वत:हून पैसे देऊ लागले. यातूनही चांगले पैसे मिळू लागले.
अमरावतीच्या एका कार्यक्रमात फासेपारधी समाजातील मुलांसाठी काम करणारे मतीन भोसले किंगरेंना भेटले. या मुलांचे पोट भरण्यासाठी मतीन यांनी सुरुवातीला काही दिवस भीक मागितली, हे किंगरे यांना समजले. पुढे एकदा हेमलकसाकडे जाताना रस्ता चुकले म्हणून कारंजामार्गे जात असताना किंगरे यांना मतीन यांची ‘प्रश्नचिन्ह’ ही पाटी दिसली. यावेळी मतीन यांच्याकडे १८८ मुले होती. एका जुनाट गोडाऊनमध्येच मुलांची शाळा सुरू होती. अंगावर व्यवस्थित कपडे नाहीत, पायात काही नाही. मुलींचे फ्रॉक फाटलेले. न विंचरलेले केस. किराणा एक दिवसाचाच शिल्लक. मतीन मुंबईला गेलेले. ते परत नाही आले तर दुसरा दिवस उपवासाचा. हे चित्र किंगरे यांना पाहावले गेले नाही. मैत्र मांदियाळीच्या वतीने १५ दिवसांचा किराणा भरून दिला. ‘प्रश्नचिन्ह’ची मुले उपाशी झोपी द्यायची नाहीत असे त्याचदिवशी ठरले.
जालन्याला आल्यानंतर सोशल मीडियावर आवाहन केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अन्नधान्य, प्रत्येक मुलाला कपडे ‘प्रश्नचिन्ह’ला पाठवण्यात आले. मुलांसाठी शाळेची बॅग, मुलींसाठी टिकली, पावडर, नेलपॉलिश याचाही सेट दिला. त्यानंतर दर महिन्याला किराणा भरून एक टेम्पो जालन्यावरून ‘प्रश्नचिन्ह’ला जाऊ लागला. सोबत शैक्षणिक साहित्यही जाऊ लागले. दिवाळीला फराळ, कपडे जाऊ लागले.
एकदा प्रचंड पाऊस झाला. प्रश्नचिन्हच्या त्या गोडाऊनमध्ये पाणी साचले. मुलांना बसायलाही जागा नव्हती. जवळच एक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभे होते. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन काही दिवसांसाठी ‘प्रश्नचिन्ह’चा संसार तिथे हलवण्यात आला. काही दिवसांची सोय झाली. या पोरासांठी इमारत बांधण्याचे मैत्र मांदियाळीने ठरवले. दीड वर्षात पोरांची राहण्याची आणि शाळेची कायमस्वरूपी व्यवस्था झाली. पैसा कमी पडत नव्हता. मदत केवळ मराठवाड्यातूनच नाही तर पुणे, मुंबईपासून येत होती. परदेशातूनही येत होती.
असेच एकदा जालन्यात मैत्र मांदियाळीच्या सदस्याच्या दुकानावर नववीतला मुलगा काम मागू लागला. आई धुणीभांडी करते.आता सुट्या आहेत. घरी बहीणही असते.या कामातून दप्तर आणि पुस्तकासाठी पैसे मिळतील, असे त्या मुलाने सांगितले. शाळा सुरू होण्याआधी तू ये म्हणून त्याला परत पाठविले. यावर मैत्र मांदियाळीच्या सदस्यांत चर्चा झाली. शाळा सुरू होण्याआधी आपल्या मुलाला घेतो तशी बॅग, संपूर्ण साहित्य घेऊन त्या मुलाला बोलावले. सोबत आलेल्या बहिणीला आणि त्याला ते दिले. त्यांचा आनंद गगनात न मावणारा होता. समाजात अशी कितीतरी मुले असतील त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे ठरले.
जालना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला पत्र पाठवून गरजवंत मुलांची यादी मागवली. पालकांचे नंबर घेतले. त्यांच्याशी बोलून यादी फायनल केली आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचविले. आपल्या मुलाप्रमाणे आणखी एका विद्यार्थ्याची जबाबदारी घ्या आणि वर्षाला केवळ ४५० रुपये द्या, असे सोशल मीडियावर आवाहन केले. भरभरून प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून हे काम सुरू आहे. दरवर्षी साधारण ७०० विद्यार्थ्यांना हे किट दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये समाजभान निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक शाळेत ‘मूठभर धान्य, एक वही एक पेन’ असा उपक्रम राबवला. पहिल्याच वर्षी ७८ क्विंटल धान्य गोळा झाले. आठ हजार वह्या आणि आठ हजार पेन जमा झाले.
मैत्र मांदियाळीने आतापर्यंत प्रश्नचिन्ह, सेवासंकल्प, माहेर, शांतीवन, बालग्राम अशा संस्थांना मदत केली. प्रश्नचिन्हचा काहीसा भार कमी झाल्यानंतर मैत्र मांदियाळीने नवीन मोहीम हाती घेतली. भोकरदनमधील एका शाळेत किंगरे भाषणासाठी गेले होते. कोणालाही काही गरज लागली तर फोन करा असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले. नंतर काही दिवसांनी एका मुलीचा त्यांना फोन आला, ‘वडील नाहीत. अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी मदत हवी आहे.’ तिला मदत केली. बारावीला मागासवर्गातून ती जिल्ह्यात तिसरी आली. तिच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले. त्यातून एकेक विद्यार्थी पुढे आला. यातूनच ‘शैक्षणिक पालकत्व’ ही योजना जन्माला आली. हुशार आणि गरजू विद्यार्थी समोर आले तसे पालकत्व स्वीकारणारेही समोर येऊ लागले.
आतापर्यंत मैत्र मांदियाळीने १०० पेक्षा जास्त मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. यातील एक जण आत्ताच आयएफएस झाला. त्याला उत्तर प्रदेशात पोस्टिंग मिळाली. एक जण मंत्रालयात लागला. एक जण इंजिनिअर झाला. तो गुजरातमध्ये एका कंपनीत आहे. अंशत: अंध असलेला एक जण आसाममध्ये युनियन बँकेत लागला. यादी खूप मोठी आहे. मैत्र मांदियाळीत दर महिन्याला २०० रुपये जमा करणाऱ्यांची संख्या सध्या दीडशेवर पोहोचली आहे. इतर दात्यांच्या मदतीतून महिन्याला साधारण दीड ते दोन लाख रुपये जमा होतात. दिवाळीला दहा लाखांपर्यंत मदत जमा होते. वेगवेगळ्या माध्यमातून वर्षाला साधारण ६० लाख रुपये येतात आणि त्याचे वाटपही होते. मैत्र मांदियाळीतील किंगरेंसह ज्ञानेश्वर सातपुते, निवृत्ती रुद्राक्ष, सुनील शेळके, संदीप ढगे, दिनकर सकट, राजीव राठोड, गणेश साळवे, गणेश झाडे, रामेश्वर कोटकर, अनिल कुलकर्णी असे अनेक जण खारीचा वाटा उचलत आहेत.समाजात प्रश्नचिन्हसारख्या अनेक संस्था आहेत. खर्च झेपत नाही म्हणून शिक्षण सोडणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. समाजाचा एक भाग म्हणून यांना मदतीचा हात देण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांचीच. मैत्र मांदियाळीने खारीचा वाटा उचलला. तुम्ही कधी उचलणार?