- विजय बाविस्कर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं असावं, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्याबाबतच्या आराखड्यावरुन राज्यात बराच वादही झाला. मुलांच्या पाठीवर दप्तराचे व अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे, पण तरीही ‘शाळा आहे शिक्षण नाही’, अशी खंत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात. शाळेबाहेर एक मोठी बिनभिंतीची शाळा असते, तेथे मुलांवर काय संस्कार होतात, ज्या पालकांसोबत मुले आपला मोठा काळ व्यतीत करतात त्या पालकांची मुलांबाबतची ‘पालकनीती’ काय, हे महत्त्वाचे मुद्दे सरकारी पटलावर अद्यापही फारसे महत्त्वाचे बनलेले नाहीत. ‘पालकत्व’ हा जिव्हाळ्याचा विषय असला, तरी तो दुर्लक्षितच आहे. पालकत्वासाठी सहसा कुणी शिक्षण-प्रशिक्षण घेत नाही. पालकनीती परिवार व ‘खेळघर’ नावाची संस्था यासाठी धडपडते आहे. मुलाला समजदार पालक मिळावा, हे या परिवाराचे ध्येय आहे. पुण्यातील लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील ज्या मुलांच्या घरात शिक्षणाचे काहीही वातावरण नाही, धाकटी भावंडं सांभाळावी, हीच ज्यांच्याकडून पालकांची अपेक्षा होती, अशा मुलांसाठी हे खेळघर सुरू झालं. मुलांनी आनंदानं शिकावं, त्यासाठी पोषक वातावरण तयार करावं, सर्वात महत्त्वाचे मुले शिकण्यासाठी स्वत:हून राजी व्हावीत, तसेच त्यांच्या पालकांमध्येही पालकपण रुजावं, असा या संस्थेचा आग्रह आहे. त्यातून खेळघर ही संकल्पना बहरत गेली. अधिकाधिक जबाबदार पालक निर्माण करण्यासाठी संस्था कार्यशाळा घेते. जे पालक संस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी संस्था हस्तपुस्तिकाच तयार करते. ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ हे खेळघराचे नवीन पुस्तक आले आहे. पालकांसाठी वाटाड्या म्हणून या पुस्तिका पूरक ठरतील, असे त्यांना वाटते. पण, हे काम एकट्या-दुकट्या संस्थेचे नाही. असे खेळघर प्रत्येक वस्तीत व घरोघर तयार व्हावे. पालकनीती प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. वंचितता ही फक्त आर्थिक, सामाजिकच असते असे नव्हे. काही वैशिष्ट्यपूर्ण शाळा व संस्था सोडता अनेक मुले संकल्पनापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे लहान-मोठे, गरीब-श्रीमंत अशी सर्व मुले एकत्र व आनंदाने शिकतील, अशी शिक्षणनीती, खेळघर आकारास यायला हवे. तरच, माणूस घडेल. सांगा कसं जगायचं...कण्हत कण्हत की गाणं म्हणत?...अशा शब्दातून जीवनानुभव श्रीमंत व समृद्ध करणारी भावकविता देणारे कवीवर्य मंगेश पाडगावकरांचे आपल्यातून जाणे, हे चटका लावून जाणारे आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं सांगणाऱ्या पाडगावकरांनी जगण्यावर मनमुक्त प्रेम केले आणि आपल्यालाही करायला शिकविले. त्यांच्या अक्षरकिल्लीने सकारात्मक जगण्याची नवी दृष्टी मिळाली. पाडगावकरांचे पुण्याशीही अतूट नाते होते. पुणेकरांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यांच्या कवितांना डोळ्यात, डोक्यात आणि हृदयात सामावून घेतले. त्यांच्या आविष्काराला उदंड प्रतिसाद कायम दिला. मनमुराद दाद दिली. त्यांचे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. ऋणानुबंध घट्ट होते. ते ‘अर्धे पुणेकर’ होते. सर्जनशील, संवेदनशील, सहवेदनेशी एकरूप होणारा हा कवी आज काळाच्या पडद्याआड गेल्याने समस्त पुणेकरही हळहळले आहेत. एक अक्षरनक्षत्र निखळले आहे. आनंदयात्री पाडगावकरांनी जो सकारात्मक जगण्याचा संदेश आपल्या कवितांमधून दिला, तो अंगीकारून पुढे जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. पाडगावकरांवर ओथंबून प्रेम करणाऱ्या पुण्याचे क्षितिज प्रगतीच्या दिशेने उजळते आहे. शहर ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. प्रगतीची ही घोडदौड सुरू असताना पाडगावकरांना अपेक्षित असलेले सकारात्मकतेचे बीज आणि माणूसपण जिवंत राहावे.. हीच नववर्षाच्या आनंदयात्रेसाठी शुभेच्छा!