एकूण सतरा घेणेकऱ्यांना देय असलेल्या नऊ हजार कोटी रुपयांपैकी चार हजार कोटी रुपये अदा करण्याचा देकार देऊन विजय मल्ल्या यांनी एकप्रकारे ‘मिटवामिटवीची’ भाषा आपल्या वकिलांमार्फत केली असून या सर्व ऋणकोंचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने म्हणे या देकारावर विचार करण्याचे ठरविले आहे. पूर्णपणे गाळात गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा म्हणून मल्ल्या यांनी मिळेल तिथून कर्ज उचलण्याचा सपाटा लावला होता आणि कर्ज देणाऱ्यांनीही सतत त्यांना उपकृत करण्याची भूमिका बजावली होती. कर्जवसुलीसाठी त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची सुनावणी येत्या सात तारखेस मुक्रर असून तत्पूर्वी स्टेट बँक या देकारावरील आपली भूमिका न्यायालयास कळविणार आहे. नऊ हजार कोटींच्या निम्म्याहूनही कमी रकमेचा देकार देऊन मल्ल्या आपली मान सोडवून घेऊ इच्छितात असे दिसते. मध्यंतरी त्यांच्या मुंबईतील एका स्थावर मालमत्तेचा लिलाव करुन ऋणकोंनी आपले पैसे वसून करण्याचा प्रयत्न करुन पाहिला खरा, पण त्या लिलावात बोली लावण्यासाठी कोणी फिरकलेच नाही. त्याआधी दाऊदची मुंबईतीलच मालमत्ता लिलावातच विक्रीस काढली गेली असता तसाच अनुभव आला होता. तथापि हिंमत करुन एका माजी पत्रकाराने यशस्वी बोली लावली पण त्याला व्यवहार मात्र पूर्ण करता आला नाही. या पार्श्वभूमीवर ‘सहाराश्री’ सुब्रतो राय यांची मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस काढून दहा हजार कोटी रुपये संकलित करण्याचा जो आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्याकडे पाहावे लागेल. कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सुब्रतो राय गेल्या दोन वर्षांपासून तिहार कारागृहात बंद आहेत. त्यांना जामिनावर मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. पण जामीन हवा असेल तर पाच हजार कोटींचा जामीन आणि तितक्याच रकमेची बँक गॅरंटी अशा शर्ती न्यायालयाने पूर्वीच घालून ठेवल्या असल्या तरी राय यांना तसे करणे शक्य झालेले नाही, कारण त्यांची पत शून्याच्याही खाली गेली आहे. केवळ जामीन मिळावा यासाठी राय यांनी कपिल सिब्बल यांच्यासारख्या नामांकित विधिज्ञाला पणास लावले आहे. पण सिब्बल यांचा सारा युक्तिवाद न्यायालयाने फोल ठरविला आहे. सुब्रतो राय एकूण चाळीस हजार कोटींचे मालक असून त्यापैकी दहा हजार कोटी रुपये उभे करणे अवघड नाही असा न्यायालयाचा अभिप्राय आहे. ही रक्कम उभी करण्याची जबाबदारी न्यायालयाने ‘सेबी’वर सोपविली असून राय यांची ‘स्वप्नसृष्टी’ असलेली अॅम्बी व्हॅली सोडून अन्य स्थावर मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस काढण्याचे आदेश दिले आहेत. तसे करताना संबंधित मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या तुलनेत कमाल दहा टक्क््यांपर्यंत कमी रकमेत लिलाव करण्याची मुभादेखील न्यायालयाने सेबीला दिली आहे. तथापि विजय मल्ल्या यांच्या स्थावर मालमत्तेच्या लिलावाबाबत जो अनुभव नुकताच येऊन गेला, तसाच अनुभव येथेही आला तर राय यांची सुटका होणे कठीणच म्हणायचे.
मल्ल्यांची उपरती
By admin | Published: March 31, 2016 3:35 AM