- राजेंद्र काकोडकर (राजकीय तज्ज्ञ)गेल्या आठवड्यात ममताने योगींचे विमान बंगालात उतरू दिले नाही, अमित शहांना हुसकावून लावले तर मोदींनी धमकीवजा पाठवलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करून ‘जशास तसेच’चा इंगा अरेरावीत प्रवीण असलेल्या या त्रयींना दाखवला. यापूर्वी मायावतींनी अखिलेशशी यूपीत युती करून त्याच त्रयींच्या पायाखालची वाळू सरकवली होती. बुधवारी तर प्रियंकाने आपल्या पतीविरुद्ध मोदींनी निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या सुडाच्या राजकारणाला उघडे पाडण्याचा जणू चंगच बांधला आहे. रॉबर्ट वड्रा यांना ईडी तपास यंत्रणेच्या कार्यालयात स्वत: सोडून धमक्यांना भीक घालणार नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.आजी इंदिराजींशी असलेले साम्य प्रियंकासाठी विजयसूत्र असल्याचे मानले जाते. जनतेशी संवाद साधण्याची शैली व हिंदीवरचे प्रभुत्व ह्या तिच्या भात्यातल्या मुख्य अस्त्रांद्वारे काँग्रेसच्या विजयपताका अपेक्षेपेक्षा जास्त मतदारसंघांत रोवल्या जातील अशी आस्था काँग्रेस समर्थक बाळगून आहेत.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ७० पैकी फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या व त्यांचा मतांचा वाटा २००९ मधील १८.२५ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत खाली आला होता.गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्व तीन वर्षांत सीडब्लूजी, टूजी, कोलगेट अशा एकापाठोपाठ एक घोटाळ्यांमुळे ‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ असे समीकरण स्थापित झाले होते. वास्तविक, या तिन्ही घोटाळ्यांत काँग्रेसइतकेच भाजपाचेही अंग होते. खाण घोटाळ्यात गोव्यात काँग्रेसचे तर कर्नाटकात भाजपाचे तोंड काळवंडले होते. परंतु १० वर्षे केंद्रात सत्तेत असल्यामुळे जनतेने काँग्रेसलाच जबाबदार धरले. शिवाय या घोटाळ्यांना कपिल सिब्बलसारखे काँग्रेस नेते झिडकारत होते. त्यामुळे जनता काँग्रेसपासून दूर जाऊ लागली आणि घोटाळ्यांवर न्यायालयांत शिक्कामोर्तब झाल्यावर काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यास सज्ज झाली. त्याचदरम्यान अफाट प्रसिद्धी मिळालेल्या अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे शहरी मतदारांचे मतही काँग्रेसविरुद्ध बनले. अण्णा, केजरीवाल व बेदींद्वारे ‘काँग्रेस म्हणजे कौरव’ असे बिंबविल्यावर पर्यायी भाजपाला जनतेने ‘पांडव’ मानले.उत्तर प्रदेशात सपा-बसपा युतीने काँग्रेसला अव्हेरल्यासारखे भासविले आहे. परंतु सोनिया-राहुलसाठी दोन जागा सोडल्याने त्यांच्यामधले छुपे संगनमत चाणक्यांनी ताडले आहे. तेथील तीन पोटनिवडणुकांत सपा-बसपा-काँग्रेस युतीने भाजपाचा सफाया केला होता. चिकित्सेत असे दिसून आले की सपा व बसपाची मते एकमेकांना पूर्णपणे स्थलांतरित होतात; परंतु काँग्रेसचा उमेदवार नसला, तर काँग्रेसची मते राष्ट्रीय पर्याय म्हणून भाजपाला जातात. त्यामुळे काँग्रेसची मते भाजपाला मिळू नयेत, यासाठी ही चाणक्यनीती असू शकते.शिवाय प्रियंकाला जुंपून काँग्रेसने आपली मते २००९ च्या १८ टक्क्यांवर नेली, तर भाजपाला उत्तर प्रदेशात दहा जागा मिळणे कठीण होऊ शकते. कारण युतीच्या ४६ टक्के मतांविरुद्ध भाजपाची ३१ टक्के मते म्हणजे निकाल २०१४ च्या उलट. या सपा-बसपा व काँग्रेसच्या छुप्या मतैक्यात १०-१२ जागांवर आघाडीचा कमकुवत उमेदवार उभा करत काँग्रेसला जिंकू देण्याची ‘उप-चाल’ही असू शकते. प्रियंका कित्येक वर्षे राजकारणात आहेत व त्यांनी कित्येक वेळा प्रचार कार्य केले आहे. त्यामुळे प्रियंका दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीला पूर्ण कलाटणी देतील हे अशक्यप्राय आहे. परंतु इंदिराजींशी असलेल्या साम्यामुळे त्या प्रचार करतील त्या त्या भागांत २-३ टक्के मतपरिवर्तन करू शकतील.प्रियंकांमुळे एक गोष्ट मात्र नक्कीच होतेय. भाजपाचे आतापर्यंतचे राहुल यांच्यावरील केंद्रित लक्ष विचलित होऊन प्रियंकांवर जाऊ लागले आहे. परिणामी, ढालीचा वापर कमी झाल्याने राहुल यांना तलवारबाजी करण्यास वाव मिळाला आहे. त्याशिवाय वाघरूपी मोदी बंगालात पोहोचल्यावर त्यांच्यावर दुर्गारूपी ममता आरूढ झाल्यामुळे राहुल आता ढाल फेकून देऊन भाला व तलवारीचा दुहेरी मारा भाजपावर करू शकतात. गठबंधनाचे हे बिगर गणिती फायदे भाजपाच्या २०-३० जागा कमी करू शकतात; ज्यामुळे भाजपाला १५० चे लक्ष्य गाठणे कठीण होऊ शकते.ममता, माया व प्रियंका ह्या तीन महिलांना टक्कर देण्याजोगा जनाधार असलेले महिला नेतृत्त्व भाजपाकडे नाही. मोदींनी पाच वर्षे फारशी संधी न दिल्याने सुषमांचा जनाधार लोपला आहे. त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुकीत भाग न घेण्याचे अस्त्र उगारले आहे. निर्मला सीतारामन व स्मृती इराणी यांनी घृणास्पद वक्तव्ये करून आपली प्रतिमा काळवंडवली आहे. त्यामुळे मोदींना या तीन वेगळ्या शैलीतल्या महिलांना टक्कर देणे अवघड होईल. पर्यायाने मैदान त्यांच्या स्वाधीन करून मोदींना फक्त राहुल यांच्या मागावर राहावे लागेल.
ममता, माया आणि प्रियंका बनत आहेत मोदींना डोईजड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:19 AM