मी कुठे जाऊ? हा प्रश्न ज्यांना खूप मार्ग असतात त्यांच्यासाठी असतो. ज्याला एक आणि एकच मार्ग आहे त्याला पर्याय नसतात. पर्याय आपण निर्माण करायचे असतात. आणि त्यांच्यातच खेळायचं असतं. मला समाजकार्य करणारी माणसं दिसतात. एखादी बाई वेश्यांच्या मुलांना सांभाळते, शिकवते, एखादा माणूस फासेपारध्यांच्या मुलांना घेऊन झाडाखाली शाळा भरवतो, एखादा पाटी पुस्तक पुरवतो, एखादा दत्तक घेतो, एखादा फुकट शिकवतो, एखादा हॉस्पिटलमध्ये डबे पोहोेचवतो, एखादी पेशंटशी गप्पा मारायला जाते, एखादी हॉस्पिटलमधील पेशंटसोबत आलेल्या माणसांना जेवू घालते, एखादा माणूस जगाच्या कल्याणासाठी सायकलवर फिरतो, एखादा पन्नास वेळा रक्तदान करतो, एखादा अंध अपंग व्यक्तीशी लग्न करतो वा करते, एखादा पोरक्या मुलांना सांभाळतो, एखादा आयुष्यभर मातृभाषेसाठी टाहो फोडतो, एखादा बलात्कारित मुलींच्या पाठीशी उभा राहतो, एखादा नराधमांचे हात पाय तोडतो, एखादा रडणाऱ्यांचे अश्रू पुसतो. एखादा पेपरमधून अन्यायाला वाचा फोडतो, एखादा नुसताच एखादा असतो तो परिस्थितीने घायाळ होतो, गप्प होतो, दिङ्मूढ होतो.आपल्यातले बरेच ह्याच कॅटेगिरीतले. आपल्या अवतीभवती रोज काहीतरी घडतं. बरं, वाईट. बरं घडलं तर आपण टाळ्या पिटीत नाही, पेढे वाटीत नाहीत वा वाईट घडलं म्हणून आपण पेटून उठत नाही. आपण गट निर्माण केलेत. यांनी उठाव करायचा, यांनी कायम विरोधात बोलायचं, यांनी कायम बाजूने! यात होतं काय की विरोध खरा आणि बोलका असला तरी तो दडपला जातो, दुर्लक्षिला जातो. पण बाजूचा मुद्दा कायम उचलला जातो. आज सत्तेत असताना तो ज्या गोष्टींचं समर्थन करतो तेच तो विरोधात गेला की त्यालाच विरोध करतो. यालाच राजकारण म्हणतात आणि ते सर्वत्र मुरले आहे. आता शेतकऱ्यांचा प्रश्न हा पुरून उरणारा आहे. पण परिस्थिती चिघळली किंवा चिघळवली की झाले! काश्मीर हा भारताचा कायम जिव्हाळ प्रश्न, नंदनवनात सफरचंद खायची की तरुणांच्या दगडफेकीला बळी पडायचं? वाईट वाटतं ते या गोष्टीचं की दगडफेक करणारे आपलेच आणि त्यांना अडवणारे आपलेच! कुणाला थांबवणार? असहाय होऊन बातम्या वाचायच्या! एखादा कुणी या सर्व अमानवी प्रश्नांवर तोडगा काढील का? हवाय एखादा मुत्सद्दी नेता, शूर सेनानी, संत, विचारवंत, जगाला प्रकाश देणारा महत् भाग्यवंत मानव. पण नकोच, त्यालाही माणसं आपापल्या जातीत, धर्मात ओढायला टपून बसलीत. आहे एखादा असा जो माझ्या मातृभाषेत मला विश्वास देईल. आहे असा एखादा? हा एखादाच शोधत फिरतंय जग. पण तो एखादा कुठे आहे कळत नाही.
- किशोर पाठक -