- डॉ. रामचंद्र देखणेसाधुत्व आणि पांडित्य यांचा सुरेख संगमचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. तत्त्वज्ञ, प्राचार्य, विचारवंत, लोकशिक्षक याबरोबरच अलीकडच्या काळातील महान संत म्हणूनच मराठी माणूस आणि मराठी मन मामासाहेबांच्या ठायी विनम्र झाले आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी. ज्ञानदेवांपासून तुकोबारायांपर्यंत आणि त्यानंतर निळोबारायांपर्यंत आलेल्या संतपरंपरेचे लोकोद्धाराचे महान कार्य मामासाहेबांनी पुढे चालू ठेवले. ज्ञानाला निरहंकाराची, कर्माला शुद्धतेची, विचारांना आचारांची, व्यवहाराला नीतीची, शब्दांना प्रासादिकतेची, शिक्षणाला जीवनमूल्यांची जोड देऊन उभे असलेले मामांचे व्यक्तिमत्त्व हाच सात्विकतेचा महान आदर्श आहे. मामा हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. अध्यापन चालू होते त्याच वेळी सतत संचार करून कीर्तना-प्रवचनाचेही कार्य चालू होते. चैत्र महिन्यापासून तो थेट फाल्गुनापर्यंत त्यांची नैमित्तिक कीर्तन-प्रवचने ठरली होती. हजारो लोेक बैलगाड्या घेऊन मामांच्या कीर्तनाला येत असत. त्यांचे कीर्तन ऐकणे हाच अमृतानंदाचा अनुभव असे.‘‘साच आणि मवाळ। मिठुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।’’ अमृताचे शब्द कल्लोळ साज. मवाळ आणि रसाळ वाणीतून उमटत असत. श्रवणसुखाने श्रोतृवर्ग समाधानी होई. श्रोत्यांना मामांच्या कीर्तनाची गोडी किती होती या विषयी एक घडलेला प्रसंग त्यांच्या चरित्रात लिहिला आहे. वालचंदनगरपासून जवळच डोळेवाडी नावाचे एक छोटे गाव आहे. त्या गावात सावतोबांचे मंदिर आहे. तेथे भजन-कीर्तनाचे कार्य नित्य चालू असे. त्याच परिसरात मामासाहेबांच्या कीर्तनश्रवणाने भारावलेले बापू पवार नावाचे सद्गृहस्थ नेहमी कीर्तनाला येत असत. एकदा त्या भागात मामांचे कीर्तन ठरले होते. दुर्दैवाने कीर्तनाच्या सुमारासच बापूंची पत्नी वारली. बापूंवर मोठा कठीण प्रसंग ओढवला. एकीकडे तर कीर्तनश्रवणाची ओढ लागलेली. शेवटी आपल्या पत्नीचे प्रेत झाकून बापू कीर्तनाला गेले. कोणासही न सांगता निर्विकारपणे त्यांनी सर्व कीर्तन ऐकले. कीर्तन संपल्यानंतर प्रेताचे सर्व क्रियाकर्म उरकले. पेरणीसाठी वाफसा आला आहे. याच वेळी नेमकी घरात मयत झाली तर...‘मढे झाकूनिया करिती पेरणी।’ या तुकोबारायांच्या अभंग वर्णनाप्रमाणे शेतकरी मढे झाकून पेरणी करून घेतो आणि नंतर प्रेताची विल्हेवाट लावतो. तसेच काहीसे याही वेळी घडले. मामांच्या कीर्तनश्रवणासाठी पत्नीचे प्रेतही झाकून ठेवून दु:ख गिळून आलेल्या या महान श्रोत्याची भूमिका पाहिल्यावर मामांचे कीर्तन कसे असेल याची आपोआप कल्पना येते.‘‘बोलू ऐसे बोले। तेणे बोले विठ्ठल डोले।’’परमात्म्याला डोलायला लावण्याचे सामर्थ्य मामांच्या कीर्तनात होते. व्यसनमुक्ती, कर्मयोग, देशभक्ती, अनासक्त वृत्ती यासारखे विचार सांगून, जीवनमूल्ये मांडून मामांनी कीर्तनकार खरोखरीच ज्ञानदीप चेतविला आहे.