विवाहाची पंगत असो नाही तर सत्यनारायणाच्या महाप्रसादाची पंगत असो. ‘वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ अशीच सुरुवात़ अन्न हे पूर्णब्रह्म मानून यज्ञकर्म म्हणून सेवन करायचे़ आवडीच्या पदार्थांचा आग्रह आणि भरपेट भोजन संपले़ बुफे पद्धत आल्यामुळे ज्याला जेवढे आवश्यक तेवढेच घ्यायचे. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबली, यज्ञकर्म ही भावना लोपली़ उदरभरण हेच दृढ झाले़ नवनवे पदार्थ आले़ माणसाच्या जिभेची चवच बदलली़ चांगल्या गावठी तुपाचा वास अनेकांना मानवेना़ गीतगोविंदकार जयदेवाने ‘शर्करे कर्कषासि’ असे मोठ्या अभिमानाने गीतगोविंद काव्याची महती गाताने लिहिले आहे़ शर्करा शब्दामधील कर्कषपणा म्हणजे आजचा ‘मधुमेह’ वाढला आहे़ मराठी खाद्य संस्कृतीमध्ये वारंवार भेटणारे गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, शिरा फार फार तर गुलाब जामुऩ थालिपीठ, धपाटे, झुणकाभाकर, भरलीवांगी, मिरचीचा ठेचा, ओंजळभर भाजलेल्या शेंगा, एखादा कांदा असा बेत जमला तर मराठी मनाला स्वर्ग दोन बोटे उरतो़ ही सुग्रास भोजनाची परिसीमा़ आजचा मराठी माणूस मराठी थाळी परिपूर्ण, असली तरी जेवायला कौतुकाने मागवत नाही़ गुजराथी, राजस्थानी थाळी, पंजाबी डिशेस यांचीच रेलचेल़ स्टार्टर्स, सूप प्रत्येकाच्या पसंतीचे़ जाताना बडीशेप आणि दात टोकरायला काडी घेऊनच हॉटेल सोडायचे़ दाक्षिणात्यांनी इडली-डोसा-मेदूवडा लोकप्रिय केले़ पंजाबची ‘मकईकी रोटी और सरसों का साग’ खाणारा हिरो हिंदी चित्रपटात लोकप्रिय ठरला़ चायनाने तर सर्वांवर फास्टफु डची कुरघोडी केली़ उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खायला हॉटेलात जायची गरज उरली नाही़ महाराष्ट्राने म्हणजेच मराठी माणसाने आपल्या खाद्यपदार्थाची ओळख जगाला करूनच दिली नाही़ ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा़ ही आपली पराक्रमी ओळख़ चीनच्या आक्रमणात ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा आपला वीरत्वाचा परिचय़ खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत मात्र आपण जगाच्या पाठीवर एकदम मागे म्हणजे मागासलेलेच राहिलो़ मिळू द्या की मराठमोळी थाळी देशाच्या कानाकोपऱ्यात़ थालिपीठ, धपाटे, झुणका-भाकर का होऊ द्या की कॉण्टिनेण्टल मेनू़ वाजू द्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा डंका़ अटकेपार झेंडे लावण्याचा पुरुषार्थ पूर्वजांनी दाखविला़ भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने विश्वसंचार केला़ संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबात फडकवली़‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही आपली परंपरा़ जगाला विठोबाचा परिचय करून दिलात पोटोबाचा केव्हा करून देणार? बा मराठी माणसा घे थोडे मनावर आणि लाग कामाला़ डॉ. गोविंद काळे
मनाचिये गुंथी - जाणिजे यज्ञकर्म
By admin | Published: February 22, 2017 12:23 AM