नाटक आणि रंगभूमी हे मानवी भावभावनांच्या अभिव्यक्तीला लाभलेले एक सांस्कृतिक परिमाण आहे. भरताने नाट्यशास्त्रात नाटकाविषयी ‘नाट्यमित्यभिधीयते...’, असे म्हणत जी नाटकांची व्याख्या केली आहे. या जगात सुख-दु:खांनीयुक्त असा लोकस्वभाव दिसून येतो. तोच अंगादी अभिनयांनीयुक्त असला म्हणजे त्याला नाट्य असे म्हणतात. प्रसिद्ध रंगकर्मी आणि नाट्यविषयाच्या अभ्यासक विजया मेहता यांनी रत्नागिरी येथे त्यांच्या शिष्य परिवाराने केलेल्या सत्कार समारंभात म्हटले होते की, रंगमंचावरील मिथ्या जगात वावरत घेतलेला सत्याचा शोध म्हणजे नाट्यकला. कल्पनेचा खोटा फुलवरा निर्माण करून सत्याचा आभास येथे उभा केला जातो आणि मानवी गुण व संवेदना यामध्ये रूपांतरित होतात. नाटक ही भाव आणि अवस्था यांची अनुभूती आहे. या अनुभूतीत सौंदर्य व्यापारही अभिप्रेत आहे. लोकवृत्तीत दिसून येणाऱ्या भाव आणि अवस्था जेव्हा सौंदर्य व्यापारातून अभिव्यक्त होतात तेव्हा ते नाट्य होते. ही अभिव्यक्ती अभिनयाच्या साधनाने होते. हे सांगताना भरताने लोकधर्मी व नाट्यधर्मी अशा दोन धर्मी सांगितल्या आहेत. लोकधर्मी ही अनुभवांच्या अभिनयाशी निगडित आहे तर नाट्यधर्मी ही नाट्यागत सौंदर्य व्यापाराशी निगडित आहे. नाटकाच्या अभिव्यक्तीला आणि सादरीकरणाला कारणीभूत असणारे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे नट आणि नाटककार. नाटक हा या दोघांचाही व्यापार आहे. नाटककार हा भावाचे अनुकीकरण करण्यासाठी लौकिक प्रवृत्तीचे दर्शन नाटकाच्या कथानकातून घडवतो. नाट्यातील कथावस्तूचा जो भाग लोकवार्ता क्रियेने युक्त होतो त्यालाच लोकधर्मी म्हणायचे. नाटककाराने लिहिलेली उत्तम शब्दकृती उत्तम अभिनयाने ठसविण्याचे काम नटाला करावे लागते. नाटकात संवाद लिहावे लागतात आणि संवाद वठवावे लागतात. संवाद हे नाट्याचे शरीर आहे. ते शब्दसंवादातून जन्म घेते आणि अभिनय संवादातून उभे राहाते. आंगिक, आहार्य आणि सात्त्विक असे तीन प्रकारचे अभिनय असतात. या भूमिकेतून शंभू मित्रा यांचे वाक्य महत्त्वपूर्ण वाटते. ते म्हणतात, ‘नट हा वाद्यही असतो आणि वादकही असतो. तो स्वत:चे वास्तव जीवन विसरून रंगभूमीच्या विश्वासी एकरूपी झालेला असतो. बहुरूपी विविध सोंगे घेतो. त्यात स्त्री-पुरुषांचीही रूपे असतात. ज्ञानदेव म्हणतात; पण तो बहुरूपी स्त्री-पुरुष भाव विसरून ‘लोकसंपादणी तैसीच करतो’ लोकसंपादणी करीत उभा असतो. ही लोकसंपादणीच रंगभूमीवरील नटरंग खुलवीत जातो आणि मानवी भावभावनांचे दर्शन घडवितो.- डॉ. रामचंद्र देखणे -
मनाचिये गुंथी - नाटक आणि लोकसंपादणी
By admin | Published: June 01, 2017 12:18 AM