हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात व्यासमुनींना समाजाच्या सर्व थरांना मार्गदर्शक वाटेल असे महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती झाली म्हणतात. त्यांच्या तरल प्रतिभेचा वेग लेखणीपेक्षा अधिक तीव्र होता. एक श्लोक लिहावा तर शंभर श्लोक त्यांच्या मनात उसळी घेत असत. त्यांनी बुद्धिदात्या गणेशाला लेखकु होण्याची विनंती केली. लिहित्या श्लोकाचा अर्थ लक्षात आल्यानंतरच पुढचा श्लोक लिहायचा असा त्यांचा क्रम सुरू झाला. त्यामुळे महर्षी व्यासांना चिंतन करायला वेळ मिळू लागला.वारकरी पंथातील बहिणाबार्इंनी वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक इतिहास जसा अभंगातून लिहून ठेवला, तशाच प्रकारे कोणकोण कोणाचे अभंग लिहून ठेवण्याचे काम करीत होता, त्याचा आदरपूर्वक उल्लेख नोंदवून ठेवला आहे. स्वत: ज्ञानदेवांनी आपले लेखकु म्हणून ‘सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाहला’ असे गौरवपूर्वक सांगितले आहे. बहिणाबाई म्हणतात, ‘ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा! चिदानंद बाबा लिही त्यास.’ ‘निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने। मुक्ताईची वचने ज्ञानदेवे।। चांगयाचा लिहिणार शामा तो कासार। परमानंद खेचर लिहित होता।। सावत्या माळ्याचा काशिबा गुरव। कर्म्याचा (कर्ममेळा) वसुदेव काईत होता।। चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग। म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग।’ ही वारकरी संतांच्या समतामयी वागण्याची एक साक्ष आहे असे म्हणायला हवे. महीपतींनी जे तुकारामचरित्र लिहिले आहे त्यामध्ये ‘संतांजी तेली जगनाड्या देख। जो तुकयापाशी होता लेखक’ असे वर्णन केले आहे. चाकणला जन्मलेले संताजी हे त्यांचे वडील भिवाशेट यांच्याबरोबर संत तुकारामांच्या कीर्तनाला गेले आणि प्रभावित होऊन त्यांचेच टाळकरी, मित्र व शिष्य झाले. संत तुकोबांचे काव्य जतन करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. संत वाङ्मयाच्या अभ्यासक डॉ. आरती कुळकर्णी यांनी ‘संत तुकारामांची शिष्य परंपरा’ या लेखात म्हटले आहे की, संताजींच्या तीन पिढ्यांनी तुकोबांचे काव्य जतन करण्याचे बहुमोल ऐतिहासिक कार्य केले आहे. गजानन विजय ग्रंथाचे कर्ते संत दासगणू महाराज यांचे लेखकु संत छगनकाका यांची तीव्र स्मरणशक्ती आणि अमोघ पाठांतर याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. अधिकारी सत्पुरुष अनंत दामोदर आठवले यांचे वडीलही संत दासगणू महाराजांच्या लेखनिकाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे वाचनात आले आहे. संतांचे लेखन समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आणि मानवविकासाला हातभार लावण्याचे हे अमोल कार्य करणाऱ्या व्यक्तीही असाधारणच होत्या. लोककल्याणाच्या तळमळीने संतांनी केलेले सखोल, प्रदीर्घ आणि रसाळ जीवन-चिंतन समाजासाठी अक्षरबद्ध करून ठेवणाऱ्यांविषयीची कृतज्ञता या चार शब्दांत कशी मावणार?- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -
मनाचिये गुंथी - संतांचे बहुश्रुत लेखकु
By admin | Published: June 03, 2017 12:19 AM