- राजू नायकगोव्याच्या राजकारणात तोच कचरा, तीच दुर्गंधी आणि तीच कुजकट परिस्थिती आम्ही भोगत होतो. किंबहुना राजकारणाने नव्या आशा, आकांक्षा आणि नवे चैतन्य निर्माण करायचे असते; परंतु काँग्रेसच्या राजकारणाने साचलेपणा निर्माण केला होता. पाणीही वाहायचे थांबले की त्याचे डबके होते. गोव्याच्या राजकारणाने अशा चिखलाच्या आणि दलदलीच्या घाणीत आपल्या भवितव्यालाच अवनतीला पोहचविलेले असताना राजकीय क्षितिजावर मनोहर पर्रीकरांचे आगमन झाले अन्् ताज्या हवेची झुळूक निर्माण व्हावी तसे झाले.जवळ जवळ २५-३0 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी त्या वेळी होतो ‘सुनापरान्त’चा संपादक; परंतु अगदी तरुण असल्याने (देशामधला मी अत्यंत तरुण संपादक म्हणून गणला जात होतो.) पेपरात नवनवीन प्रयोग करीत असे. काँग्रेसचा तर मी त्या वेळी प्रखर विरोधक. गोव्यातील पक्षाने ज्या पद्धतीचे अत्यंत शोचनीय राजकारण चालविले होते- त्यालाच काँग्रेस- म्हणायचे तर मी तशा पद्धतीच्या राजकारणाचा समाचार घेणे भागच होते. वस्तुत: त्यावेळच्या ढेपाळलेल्या विरोधी अवकाशाची जागा भरून काढण्याचे काम विद्यार्थी चळवळच करीत होती.पर्रीकरांचा त्याच काळात भाजपात उदय झाला होता. पर्रीकर संघाचे कार्यकर्ते. संघातील धुरिणांनी ठरविले, संघाचा एक प्रखर कार्यकर्ता भाजपात पाठवून, पक्ष संघटनेला नवी बळकटी द्यायची. त्या वेळी श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर तसे सक्रिय होते; परंतु त्यांचा प्रभाव पडत नव्हता. दोन नावे पुढे आली, सुभाष वेलिंगकर व मनोहर पर्रीकर. वेलिंगकरांचे नाव निश्चितच आघाडीवर होते- कारण ते पर्रीकरांपेक्षा कृतिशील होते; शिवाय पर्रीकर सारस्वत! परंतु संघाने वेलिंगकरांना संघातून जाऊ देण्यास नकार दिला. संघटनेला तेवढ्या ताकदीचा नेता गमावल्यास मोठे नुकसान झाले असते. पर्रीकरांना संधी मिळाली. पक्षाला निधीचीही गरज असते. सारस्वत समाजातील माणसाला ते अधिक सोपे झाले असते, असा तर्क निघाला.तरीही, एक ठोस निर्णय घेतला होता. पर्रीकरांनी पक्ष उभारावा; परंतु स्थानिक राजकारणात भाग घेण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रीय राजकारणात जावे. म्हणजे श्रीपाद नाईक यांच्यासाठी विधानसभेचे क्षेत्र ठरवून दिले होते. गोव्याचा प्रमुख नेता म्हणून त्यांनाच प्रकाशात आणण्याच्या त्या सूत्रबद्ध हालचाली होत्या. याचे कारण बहुजन समाजाचे राजकारण केल्यानेच पक्ष येथे रुजू शकेल, असा स्वाभाविक विचार होता. त्याप्रमाणे पर्रीकरांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. तेथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पणजी मतदारसंघात त्यांना नशीब आजमावण्यास सांगण्यात आले. तेथे जे ते निवडून यायला सुरुवात झाली तो ते दिल्लीत जाईपर्यंत आणि ज्या श्रीपाद नाईकांवर पक्षाने स्थानिक नेतृत्वाची मदार ठेवली होती, ते दुसऱ्याच निवडणुकीत मडकईत पराभूत झाले. श्रीपाद नाईकांचा प्रभाव पडत नव्हता. स्थानिक राजकारणात अभावानेच दिसणारी आक्रमकता, उत्स्फूर्तता, बुद्धिमत्ता आणि धोका पत्करण्याची क्षमता हे सारे गुण पर्रीकरांकडे एकवटलेले होते. ते विधानसभेत पोहोचल्यावर तर साऱ्यांचे लक्ष त्यांनी स्वाभाविकपणे वेधून घेतले.हे सहज घडले नाही. १९९४च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा जिंकून येण्यापूर्वी पर्रीकर राज्याच्या राजकारणाचा बारीक अभ्यास करीत होते. लोकांना, बुद्धिवाद्यांना, पत्रकारांना, संपादकांना भेटत होते. मला आठवते या काळात जवळजवळ दर शनिवारी ते मडगावी येत. या शनिवारी संध्याकाळी नियमित ते माझी भेट घेत. त्यांच्याबरोबर पक्षाचे इतर तीन तरुण कार्यकर्ते असत; परंतु बोलण्याचे काम पर्रीकरच करीत.गोव्यात त्यानंतर दोन वेळा ते मुख्यमंत्री बनले. सध्या भाजपा गोव्यातला प्रमुख पक्ष आहे. गोव्यात पर्रीकरांचा प्रचंड वचक आणि दरारा आहे. शिवाय देश पातळीवर मंत्रिमंडळाच्या पहिल्या पाच ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये त्यांची वर्णी लागते. पद आहेच, परंतु एक अत्यंत प्रामाणिक नेता म्हणून त्यांना असलेला मान इतरांना अभावानेच आहे. त्यादृष्टीने नरेंद्र मोदीही पर्रीकरांची ‘ताकद’ ओळखून आहेत. संरक्षणमंत्रिपद हे साधेसुधे पद नाही. प्रचंड ताकदवान नेता बनण्याचे आव्हान त्यांनी अवघ्या २५ वर्षांत साकार केले आहे. इतकी वर्षे गोव्यात सत्तेवर असलेल्या एकाही नेत्याला ते जमलेले नाही. राष्ट्रीय पातळीवरच का, अखिल गोवा आकाराचाही नेता या पक्षाला निर्माण करता आलेला नाही.२०१२च्या निवडणुकीत त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे ख्रिश्चन समाजाचाच पाठिंबा नव्हे, तर चर्च धर्मसंस्थेचा त्यांनी भाजपाला पाठिंबा मिळवून दिला. गेल्या ५० वर्षांतील ही अत्यंत प्रभावी आणि विरळा राजकीय चाल आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ख्रिस्ती चर्च नेहमी फुटीरवादी, विभाजनवादी आणि तेवढीच हिंस्त्र संघटना संबोधित आली, त्या चर्च धर्मसंस्थेला पक्षाच्या मागे उभी करणे ही तशी राजकारणातील किमयाच आहे. परवा मी एका स्थानिक वृत्तवाहिनीसाठी एका चर्चेत राशोल सेमिनारीचे प्रा. फा. व्हिक्टर फेर्रांव यांना विचारता त्यांनी बिनदिक्कत मान्य केले की चर्चने मनोहर पर्रीकरांकडे पाहूनच भाजपाला पाठिंबा दिला होता. पर्रीकरांनी २०१२च्या निवडणुकीत सात ख्रिस्ती आमदारांना जिंकून आणले आहे. ही मोठीच किमया आहे. त्यादृष्टीने पाहिले तर भाजपाची संपूर्ण बांधणी पर्रीकरांनी एकहाती केली आहे. संपूर्ण व्यूहरचना त्यांची जिगर, तडफ आणि विलक्षण बुद्धिचातुर्य या बळावर त्यांनी ते साध्य केले. तसे पाहिले तर त्यांच्या एवढा दरारा असलेला प्रक्षोभक आणि चलाख विरोधी नेताही झालाच नाही. गेल्या २५ वर्षांत गोव्यात कोणतेही आंदोलन झाले आणि त्यात पर्रीकरांचा सहभाग नाही असे झालेच नाही. किंबहुना पर्रीकर विरोधी पक्षात असतात, तेव्हा आंदोलक, निदर्शक कार्यकर्ते मंडळींना तो एक मोठाच दिलासा असतो. ते मग कॅसिनो मांडवीतून न हटविल्यास आम्ही आतमध्ये घुसू, असे त्यांनी सबिना मार्टिन्सबरोबर मांडवीच्या तीरावर महिला आंदोलकांसमोर जाहीर करणे असो, गोवा बचाव आंदोलनात त्यांचे सक्रिय वावरणे असो, खाणीवर बंदी लागू करण्याआधी या उद्योगाचा पर्दाफाश करणे असो किंवा शिक्षण माध्यम धोरणाविरुद्ध वातावरण तापविण्याचा प्रश्न असो. विरोधी नेता असताना त्यांच्या शब्दकोषात ‘नाही’ हा शब्दच नव्हता. प्रत्येक धोरणात्मक प्रश्नावर त्यांनी काँग्रेस सरकारला नामोहरम केले. पुढे ही त्यांची भूमिका त्यांनाच अडचणीची ठरून विरोधकांना आयतेच कोलीत मिळवून देणारी असली तरी विरोधी नेत्याला शोभणारा चाणाक्षपणा आणि उत्स्फूर्तता त्यांच्याकडे होती. असा एक विचार मांडतात की विरोधी पक्षाने येनकेन प्रकारेण सत्ताधारी पक्षाचे नीतीधैर्य खचवावे व सत्तेच्या आसनाखालचे जाजम ओढून सरकार उलथवून टाकण्याच्या प्रत्येक संधीचा वापर करावा. त्या तत्त्वाला पर्रीकर जागले. या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आपल्या चारित्र्यावर डाग लागू न दिलेले ते देशामधले विरळा नेते आहेत.पर्रीकरांचा आणखी एक मोठा गुण म्हणजे, त्यांनी भाजपालाच सत्तेवर आणले असे नव्हे तर पक्षाच्या वतीने ‘दगडाला’सुद्धा मंत्री बनविले. भाऊसाहेब बांदोडकरांबद्दल नेहमी सांगितले जाते, की दगडालासुद्धा जिंकून आणण्याची क्षमता त्यांच्यात होती. बांदोडकरांना त्यांच्या विरोधकांनी ‘परधार्जिणा’ हे बिरुद कायमचे चिकटवले. पर्रीकरांनी पक्षश्रेष्ठींना गोव्यात लुडबूड करू दिली नाही. त्यांनी स्वत:ला हवा तसा माणूस निवडून त्याला आमदार बनविले. (पर्रीकरांनी आपल्यानंतर पणजी मतदारसंघात आपल्या पुत्राला तिकीट दिले नाही. कॉँग्रेस नेत्याने- कोणीही हे केले असते; परंतु त्यांनी पक्षसंघटनेत वावरणाºया सिद्धार्थ कुंकळयेकरांना संधी दिली. जिंकूनही आणले!) त्यामुळे पर्रीकर असेपर्यंत या लोकांची डाळही शिजू शकली; कारण विधानसभेत या मंत्र्यांच्या वतीने पर्रीकरच बोलायला उभे राहात. जनमानसातील पक्के स्थान, बहुजन समाजात विलक्षण आदर, अभ्यासू वृत्ती आणि तडफदारपणा हे त्यांचे गुण विधानसभेत सतत दिसले आहेत. त्यादृष्टीनेही गोव्याचा गेल्या ५० वर्षांतील तो एक विरळा प्रभावी नेता ठरावा. त्यांनी या काळात गोव्यात अखिल गोमंतकीय पातळीवरचा नेता म्हणून सिद्ध केले नाही तर भारतातही आदर निर्माण केला, त्यामुळेच संघाने पंतप्रधानपदासाठी जी तीन-चार जणांची यादी बनविली होती, त्यात पर्रीकरांचे नाव होते. मला आठवते तीनेक वर्षांपूर्वी गोव्यातील भंडारी समाजाचे एक शिष्टमंडळ, त्यांच्या निवडणुकीनंतर मला भेटायला आले होते. मी त्यांनाच पहिला प्रश्न केला, ‘भंडारी समाजाचा गोव्यातील सर्वश्रेष्ठ नेता कोण?’ एकाने श्रीपाद नाईक यांचे नाव घेतले, दुसरा रवी नाईक, सुभाष शिरोडकर आणि तिसरा आणखी कोणाचे तरी स्वत:च्या सोयीनुसार नाव घेत होता. मी म्हटले, ‘भंडारी समाजाचा खरा नेता मनोहर पर्रीकर आहे!’ त्यांना ते मान्य करावे लागले. भंडारी समाजात आज त्या समाजाच्या नेत्यांना किती मान आहे, महत्त्वाचे म्हणजे विश्वासार्हता आहे काय? त्यामुळे समाज पर्रीकरांच्या नावाने भाजपाला मतदान करीत आला आहे. गेल्या निवडणुकीत तर भाजपाने भंडारी समाजाला सर्वात अधिक उमेदवार दिले.परंतु, पर्रीकरांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आली तेव्हा,
मनोहर पर्रीकर म्हणजे ताज्या हवेची झुळूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 1:17 AM