- अविनाश पाटीलमूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य आजही आम्ही मान्य केलंय. पण स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांनंतरही रुग्णांना मंत्रतंत्राच्या हवाली करणारा समाज, एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात कसा, असा प्रश्न खरं तर अस्वस्थच करतो.मंत्र बळे वैरी मरे, तर का घ्यावी लागती हाती कट्यारे, असा परखड सवाल साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी केला. पण ही मंत्राची निरर्थकता मात्र अजूनही येथे भल्याभल्यांच्या लक्षात आली नाही आणि मुहूर्तावर एक नव्हे तीन आॅपरेशन करणाऱ्या पुण्याच्या डॉ. सतीश चव्हाणने प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयूत जाऊन आपल्याच रुग्णावर मंत्रोपचार केले. संध्या सोनवणे यांच्या अतिरक्तस्रावाने झालेल्या मृत्यूने पुन्हा ‘मंत्रतंत्र’ विषयाला चर्चेच्या केंद्रस्थानी आणले.आज ही अस्वस्थ करणारी घटना आपल्यासमोर आली. पण अशा अनेक घटना आजही समाजाच्या सर्व थरांत सातत्याने घडत आहेत. काहींची चर्चा होते, फारच थोडे गुन्हे दाखल होतात आणि मोठ्या प्रमाणावर या घटना लाटेसारख्या घडतात, निर्माण होतात आणि विरूनही जातात. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या पाठपुराव्याने गुन्हा दाखल झाला. यथावकाश पोलीस तपास करीत राहतील. कोर्टाच्या तारखा पडत राहतील. चर्चेचे चार दिवस संपले की आपण सारे हे विसरणार.खरा प्रश्न आहे तो असा समाज निर्माण होऊ शकतो का, की ज्यात तंत्रमंत्राच्या कालबाह्य, अशास्त्रीय उपचाराला थारा नसेल, डॉ. सतीश चव्हाणांसारखे जादूटोण्याचा आसरा घेणारे डॉक्टर नसतील आणि माणसं आपल्या जीवनाचे प्रश्न हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे सोडवतील. ही अपेक्षा फार वेगळी नाहीए, या देशाच्या राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य सांगितलं आहे. शिक्षणाच्या गाभा घटकात वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती हे सूत्र स्वीकारलंय. मूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य आजही आम्ही मान्य केलंय. पण स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांनंतरही आम्ही मध्ययुगीन समाजात वावरत असल्याचा अनुभव घेतोय. आजही संध्यासारख्या शेकडो, हजारो रुग्णांना मंत्रतंत्राच्या हवाली करणारा समाज, एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात कसा, असा प्रश्न खरं तर अस्वस्थच करतो.माणसाच्या उत्क्रांतीकाळात सृष्टीतील न उमगलेल्या गोष्टींना त्याने चमत्कार मानले. वादळ, वणवे, भूकंप, महापूर याचा कोणताही कार्यकारण भाव न उमगल्याने या घटना दैवी ठरल्या. यावर उपाययोजनांसाठी त्याने तंत्रमंत्राने, जादूटोण्याचा आधार घेतला. त्याला यातू क्रिया म्हटले जाते. चांगले होण्यासाठी शुक्ल यातू व वाईट घडवण्यासाठी कृष्ण यातू ही त्याने त्या काळी शोधलेली पद्धत होती. त्या काळाच्या स्थितीचा विचार करता हे घडणे स्वाभाविकच होते. पण आज जेव्हा आपलं सारं जगणंच विज्ञानमय झालेलं आहे, आणि कार्यकारणभाव समजण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. अशा वेळी समाजाचं, त्यातल्या त्यात एक वैद्यकीय व्यावसायिकाचं मंत्रतंत्र, जादूटोण्याच्या आहारी जाणं हे माणसाचं प्रगतीचं चाक उलट फिरवणं आहे.विश्वाला स्वत:चे नियम आहेत, ते भौतिक आणि मानवी बुद्धीला समजू शकतात, असं सांगणाºया महान शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगचा नुकताच मृत्यू झाला. बुद्ध, चार्वाकांपासून तर गाडगेबाबांपर्यंत फार मोठ्या विचारवंतांच्या परंपरेने हे विवेकाचं सत्य आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जगात जे काही घडतं त्यामागे काही तरी कारण असतं आणि ते मानवी बुद्धीला समजू शकतं. सगळीच कारणं मानवी बुद्धीला समजलेली नसली तरी ती कोणत्या मार्गाने समजतील तो मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच आहे. एवढं हे साधं तत्त्व आहे. स्वत: अनुभव घेतल्याशिवाय, पुरावादेखील तपासून घेतल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही इतकी ही साधी बाब आहे. दुकानातून घेतलेल्या साधा पाच रुपयांचा पेनही लिहून घासून तपासून घेणारा माणूस जीवनाचे अनेक निर्णय मात्र मंत्रतंत्र, जादूटोणा, कुंडली याआधारे घेतो तेव्हा तो या सर्व विवेकी परंपरेचाच पराभव करत असतो. तेव्हा संध्या जगायच्या असतील आणि डॉ. सतीश चव्हाणांसारख्यांची अंधश्रद्ध मानसिकता मारायची असेल तर आपण आपल्या मेंदूवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. स्वत:च्या बुद्धीवादावर विश्वास ठेवणारा समाज निर्माण करणं हेच यावरचं पहिलं आणि शेवटचं उत्तर आहे. पुन्हा अशी संध्या या समाजात बळी ठरू नये म्हणून.
(लेखक हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत)