- सविता देव हरकरे, उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूरकोरोनाशी लढा देत असताना यावर नियंत्रणासाठी सर्वाधिक प्रभावी उपाय ठरत असलेल्या लॉकडाऊनमुळे या देशातील लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडवून आणलेत. गत अनेक वर्षांपासून आपल्याच विश्वात गाढ झोपलेल्यांना एका विषाणूने जागे केले. अशांना सत्ता, संपत्ती किती मिथ्या आहे, याची जाणीवच करून दिली नाही, तर कमी गरजांमध्ये दैनंदिन जीवन कसे जगता येऊ शकते, याचा धडाही दिला. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान. जे कुठेतरी कमी होत चालले होते, पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र गेल्या पंधरवड्यात बघायला मिळाले.या संकटकाळी आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून सर्व स्तरांतील लोक जमेल तशी मदत करताहेत. कुठलाही जातीभेद, धर्मभेद अथवा पंथभेद न मानता. कोरोनासारखेच. कारण, त्यालाही कोण कुणाचा शत्रू, कुणाचा मित्र यांच्याशी काही देणे-घेणे नाही. त्याच्यासाठी सर्व सारखेच. असो, पण लोकांनी लग्नासारख्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणाशीसुद्धा तडजोड केल्याचे दिसून आले. काहींनी विवाह पुढे ढकलले, तर काहींनी कुटुंबातच विधी उरकला. याच शृंखलेत एका प्रेमीयुगुलाने ऑनलाईन विवाह करून नवा पायंडा घालून दिला. खरं तर गत सहा महिन्यांपासून त्यांनी लग्नाची जय्यत तयारी केली होती. ती कोरोनात वाहून गेली, पण या समजदार युगुलाने आनंदात मिठाचा खडा पडू द्यायचा नाही असे ठरवले आणि करून दाखवले. सामाजिक बांधीलकीचे आणखी एक उदाहरण दिल्लीत बघायला मिळाले. तेथील मराठी प्रतिष्ठानने अडकून पडलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्यातून अनेक मुलं-मुली तिथे जातात. लॉकडाऊनमुळे ते अडचणीत सापडले होते. प्रतिष्ठानने त्यांना दिलासा दिला.नागपूरमध्ये काही तरुणांनी सोशल कनेक्ट नावाचा देशव्यापी सेतू तयार केला आहे. भुकेलेल्यांना अन्न, आजारींना औषधोपचार, ज्येष्ठांना हवे ते सहकार्य दिले जातेय. यानिमित्ताने मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. महिला बचत गटही मास्क निर्मितीत महत्त्वाचे योगदान देत आहे. त्याच्या सहभागाने देशात दीड कोटीवर मास्क तयार झाले. आरोग्य कर्मचारी व सामान्यांच्या उपयोगात ते येत आहेत. शहर व गावपातळीवरही लोक ‘फुल ना फुलाची पाकळी’ जमेल तशी मदत करताहेत. विविध स्तरांतून येणाऱ्या अशा बातम्या या संकटसमयीही उत्साह वाढविणाºया आणि आशावर्धक आहेत. हा समाज जिवंत असल्याचे हे द्योतक आहे. या काळात घराबाहेर न पडणे हीसुद्धा समाजसेवाच ठरणार आहे. अनेक सूज्ञ नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरातच स्वत:ला गुंतवून ठेवलंय. घरातील स्वच्छता, दैनंदिन कामे, वाचन, लिखाण, व्यायाम संगीत यात रममाण होताहेत. हा सकारात्मक बदल आहे.सामाजिक शिस्त नावाचा प्रकार तसा आपल्या येथे दुर्मीळच, पण या काळात तोही बघायला मिळतोय. कोरोनाच्या भीतीने असो वा पोलिसांच्या, लोक शिस्त पाळायला लागलेत. त्यामुळे कोरोना संकट विरल्यानंतर नेमके काय घडणार? या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गाचे भय व खबरदारी म्हणून केलेल्या लॉकडाऊनची मुदतही लवकरच संपेल. त्यानंतर काय? आज लोकांनी आपल्या जीवनशैलीत, सवयींमध्ये जो बदल केलाय तो ते कायम ठेवणार की ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होणार हे सांगणे कठीण आहे, पण यासंदर्भात विनोबाजींचा कारागृहातील अनुभव प्रेरणादायक आहे. त्यांना इंग्रजांनी अंधाºया कोठडीची शिक्षा दिली होती. अशा वातावरणात ते खचतील, त्यांची प्रकृती ढासळेल व ते क्षमा मागतील अशी इंग्रज सरकारला अपेक्षा होती, पण त्यानंतर जे घडले ते आश्चर्यकारक होते. दिवसागणिक ते अधिक तजेलदार दिसायला लागले होते. विनोबांनी २४ तासांचे नियोजन केले. लहानशा खोलीतच ते अनेक मैलांचे अंतर चालत. योग, ध्यानधारणा सुरू होतीच. त्यांच्यासाठी जेवण घेऊन येणाºया पहारेकºयाच्या समस्या जाणून त्याला सल्ला देऊ लागले. जेलमधील इतर लोकांची समस्या निवारणासाठी गर्दी होऊ लागली. हा प्रकार बघून इंग्रज जेलरही चकित झाला. पुढे तर जेलमध्ये कैद्यांसाठी गीतेच्या प्रवचनाचे वर्ग सुरू झाले. स्वत: अंधार कोठडीत असतानाही समाजासाठी काय करता येईल, याचा विचार त्यामागे होता. आपल्याला स्वत:च्या घरात राहून ते शक्य नाही का?
कोरोना, भारतीय समाज आणि ‘सोशल कनेक्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 5:19 AM