सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)बिहारी जनमताचा राजरोस अपमान करीत अखेर संधिसाधू नितीशकुमार मोदी गुरुजींच्या शाळेत दाखल झालेत. सर्जिकल स्ट्राइक्स व नोटाबंदीचे मानभावीपणे स्वागत केल्यानंतर, विरोधकांची एकजूट फाट्यावर मारीत ज्याप्रकारे रामनाथ कोविंदांना राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी पाठिंबा दिला, तेव्हा विश्वासघाताचा प्रयोग आज ना उद्या नितीशकुमार हमखास करणार याचा अंदाज राजकीय जाणकारांना आलाच होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला याच स्तंभामधे प्रस्तुत लेखकाने हे भाकीत नमूदही केले होते. प्रत्यक्षात घडलेही तसेच.सत्तेचा आश्रय शोधताना तथाकथित नैतिकतेचा आव आणीत नितीशकुमारांनी आपला डाव साधला. मुखवट्याआडचा चेहरा लपवण्यासाठी निमित्त केले पदत्याग न करणाºया तेजस्वी यादवांचे. खरं तर या कारस्थानी नाटकाची स्क्रिप्ट काही महिन्यांपूर्वी नितीशकुमारांच्या सहकार्यानेच दिल्लीत लिहिली गेली होती. के.सी. त्यागींसारखे शिलेदार भाजपबरोबरचा सत्तेतला पूर्वकाळ अधिक सुखाचा होता, अशी सूचक विधाने करीत, या नाटकाची पार्श्वभूमी तयार करीत होते. सत्तेसाठी लाचारी पत्करीत थेट भाजपच्या गोटात शिरलो तर आपल्या प्रतिमेला तडा जाईल, याचा अंदाज नितीशकुमारांना होता. बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक निमित्त हवे होते. मग लालूप्रसाद व कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा भडिमार करीत त्यांना टार्गेट करण्याचे कारस्थान शिजले. भाजपच्या सुशीलकुमार मोदींना कागदपत्रांचा जो दारुगोळा त्यासाठी पुरवला गेला त्यात बिहार सरकारने मोठी भूमिका बजावल्याचा आरोप आता उघडपणे होतो आहे. नाटकाच्या संहितेनुसार नितीशकुमारांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला तेव्हा पुढची जय्यत तयारी अगोदरच करण्यात आली होती. राजीनामा दिल्यापासून १५ तासांच्या आत नितीशकुमारांनी भाजपच्या पूर्वीच्याच भिडूंना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.सत्तेच्या राजकारणात झटपट यू टर्न घेण्याबाबत नितीशकुमार किती वाक्बगार आहेत, याचा एक किस्सा या निमित्ताने आठवला. बिहारमधे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमारांच्या जद (यू)ने सपाटून मार खाल्ला. यानंतर जद (यू)चे दोन डझनांहून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत ही माहिती नितीशकुमारांना समजली. सत्ता आपल्या हातून निसटते आहे, याची जाणीव होताच नितीशकुमारांनी तासभर एका खोलीत स्वत:ला बंदिस्त केले. आपले कट्टर राजकीय विरोधक लालूप्रसादांशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधला व म्हणाले, ‘हम बहुत अकेला महसूस कर रहे है, साथ आ जाईये नां!’ नितीशकुमारांच्या संभाषणाचा राजकीय गर्भितार्थ लालूंना लगेच समजला. दोघांमधे नियमित संवाद त्यानंतर सुरू झाला. त्यातूनच पुढे बिहारच्या महाआघाडीचा जन्म झाला. मोदींच्या देशव्यापी दिग्विजयानंतर याच महाआघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला सपशेल भुईसपाट केले. मोदींच्या विरोधात बिहारी जनतेने दिलेला हा निर्णायक कौल होता. देशात विरोधकांसाठी तो आदर्श ठरला. नितीशकुमारांनी मात्र अवघ्या २० महिन्यात या जनादेशाचा अपमान करीत, पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या या प्रयोगात आपली राजकीय विश्वासार्हता मात्र नितीशकुमार कायमची गमावून बसले आहेत. मोदींचे विरोधक त्यांना थेट पंतप्रधानपदाचे दावेदार मानत होते, आता त्याच मोदींचे मांडलिक त्व पत्करून भाजपच्या मांडवात भयग्रस्त व लाचार मुख्यमंत्र्यांच्या रांगेत त्यांना बसावे लागेल. दोन वर्षानंतर पुन्हा लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर आजच्या प्रतिष्ठेने मोदी नितीशकुमारांना वागवतील, याची खात्री कोण देणार? देशाच्या राजकारणात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता खरोखर दुथडी भरून सर्वत्र वाहात असती तर नितीशकुमारांसाठी लाल गालिचा अंथरून भाजपने त्यांच्यापुढे सत्तेच्या पायघड्या घातल्या नसत्या. गेल्या तीन वर्षात मोदींनी बºयाच निवडणुका जिंकल्या. ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत विरोधी पक्षाची माणसे फोडली. जागोजागी भाजपची सत्ता प्रस्थापित केली. जिथे हा प्रयोग शक्य झाला नाही, तिथे सरकारी यंत्रणांचा धाकदपटशा दाखवला. सूडबुध्दीने धाडी घालून विरोधकांना बदनाम केले. याच काळात भाजपशासित राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्याचे सरकारने टाळले. वृत्तवाहिन्यांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत आज सर्वत्र दहशतीचा माहोल आहे. गोरक्षकांच्या हिंसक जमावाने जिवंत माणसे मारण्याचे प्रयोग चालवले आहेत. बेलगाम व्यवस्था अन् सरकारला विरोध करणाºयांचे आवाज दडपून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा घाट घातला जातोय.भारताच्या सर्व सीमांवर सध्या तणाव आहे. आत्महत्येचा मार्ग पत्करलेले शेतकरी, विद्यार्थी, दलित, मुस्लीम सारेच समुदाय बेचैन आहेत. कमालीचा असंतोष जनतेत धुमसतो आहे. दोन वर्षात याचे महाकाय लाटेत रूपांतर होऊ शकेल. काल्पनिक आशेपोटी दगडाला शेंदूर लावून देवत्व जरूर बहाल करता येते, मात्र हा देव खोटा आहे असे एकदा सिध्द झाले तर असंतोषाच्या लाटांमधे दगडावरचा शेंदूर उतरायला वेळ लागत नाही. पर्यायी नेतृत्व कोण? हा विषयही अशावेळी गौण ठरतो. कोट्यवधींच्या देशात सक्षम नेतृत्वाचा तोटा थोडाच आहे? नितीशकुमारांना हे वास्तव यथावकाश समजेलच.
मोदी मास्तरांच्या शाळेत अखेर नितीशकुमार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:59 AM