- अॅड. विजय गव्हाणेमाजी आमदार, (मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते)मराठा आरक्षणासंदर्भातला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. त्यानंतर १ डिसेंबरला जल्लोष साजरा करा, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. मराठा समाजाच्या दृष्टीने हा अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे. ज्या निर्णयाची तमाम मराठा समाज डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता तो निर्णय आता दृष्टिपथात आहे. तकलादू आरक्षण जाहीर करून वेळ मारून नेण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले नाही. कारण मी जो निर्णय घेईन तो टिकाऊ असेल, मराठा समाजाची दिशाभूल करणारा नसेल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी यापूर्वीच दिली होती, ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. वैधानिक कारवाई पूर्ण होऊनच आरक्षण मिळणार असल्याने मराठा समाजातील तरुण आणि भविष्यातल्या असंख्य पिढ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहतील.शेती हा मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचे अर्थकारण बिघडले. शेती तोट्याची झाली. परिणामी, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे दुष्टचक्र निर्माण झाले. एकीकडे ही परिस्थिती आणि दुसरीकडे मराठा तरुणांमध्ये नोकरीच्या संधीच नसल्याने आलेली उदासीनता, यामुळे ग्रामीण भागातली अस्वस्थता वाढत राहिली. अस्वस्थ तरुणाईची खदखद मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली. या मोर्चांचा नेमका संदेश सरकारच्याही कानावर गेला. आज मराठा आरक्षणावरून सरकारविरोधी टीका करणाºया विरोधकांनी सत्तेत असताना काय दिवे लावले, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा होता. कारण आधीचे संदर्भ अधोरेखित केले, तर मराठा समाजाला सामाजिक न्याय मिळूच नये, हेच जणू पद्धतशीरपणे षड्यंत्र केल्याचे दिसून येते. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिले तेव्हा त्यांनी मराठा समाजालाही आरक्षण दिले होते. १९३२, १९३५, १९५० गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अॅक्ट १९४२ नुसार मराठा समाजाला आरक्षण होते. १९६५ साली कोणतेही सबळ कारण न देता मराठा समाजाला आरक्षणातून बाहेर काढण्यात आले. यामागे कोणाचे कारस्थान होते? आरक्षणाचे प्रकरण जेव्हा-जेव्हा न्यायालयासमोर यायचे तेव्हा-तेव्हा जे आरक्षण मंडल आयोगाने नाकारले, खत्री कमिशनने नाकारले ते आरक्षण कशाच्या आधारे द्यायचे, अशी भूमिका घेतली जायची. मराठा समाजाला आरक्षण देणे किती आवश्यक आहे, हे बापट आयोगाने सांगितले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण क्षेत्रीय पाहणीचा अहवाल आणि मागासलेपणाचे जे दहा निकष आहेत, त्यासंदर्भातले जे मतदान आहे त्यात मात्र हे आरक्षण नाकारले गेले. बापट आयोगावेळी रावसाहेब कसबे यांनी मतदान करून आरक्षण नाकारले. वस्तुत: बापट आयोगासमोरील प्रस्ताव नाकारला जावा यासाठीच कसबे यांची नियुक्ती होती की काय, असा साधार प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. जेव्हा जनतेने तत्कालीन सत्ताधाºयांना घरी बसवले तेव्हा त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सुचला. मराठा आरक्षण जाहीर करण्यास थोडा उशीर झाला, असे जर कोणाला वाटत असेल, तर संविधानिक बाबींच्या पूर्ततेचे महत्त्वच त्यांना माहीत नाही किंवा केवळ राजकीय द्वेषातून पछाडल्यामुळेच ते असे बोलत असतात.गेल्या काही वर्षांतील उच्चशिक्षणाची आणि तंत्रशिक्षणाची परिस्थिती पाहिली, तर त्यात आरक्षित समूहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेताना दिसतात. मात्र, मराठा समाजातील मुले अत्यंत नगण्य स्वरूपात दिसतात. याचे कारण या समाजात वर्षानुवर्षे एक जाणीव पक्की झाली की, शिकून काय करायचे? संधीच नाहीत, दुसºया बाजूला उच्चशिक्षण घेण्याची आर्थिक कुवत नाही. जणू या समाजाची स्वप्ने पाहण्याची असोशीच संपून गेली. आरक्षणाचा लाभ मिळाला तर मुले उच्चशिक्षण, तंत्रशिक्षणात दिसू लागतील आणि त्यांनाही स्वप्ने पडू लागतील. त्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमाम मराठा तरुणांच्या डोळ्यांमध्ये स्वप्न पेरण्याचे काम केले आहे. आता या तरुणांना स्वप्ने पडू लागतील, त्यांच्यातही विलक्षण जिद्द निर्माण होईल. हा सामाजिक बदल सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवावा, असा आहे. खोट्या कल्पनांच्या जोरावर आता कठोर वास्तवात टिकाव लागणार नाही. जीवन-मरणाचे प्रश्न अधिक तीव्र होत असताना मराठा समाजाला आपल्या प्रश्नांची जाणीव झाली आहे. अस्मितेला त्याने केव्हाच मूठमाती दिली आहे. असे असताना पुन्हा त्याच अस्मितेच्या दलदलीत मराठा समाजाला ढकलण्याचा वेडेपणा कुणी करू नये.आजवर आरक्षणाच्या नावावर ज्यांनी झुलवले, थापा मारल्या त्यांना जनता ओळखून आहे. खेड्यापाड्यांत फिरताना मला काही वृद्ध माणसे भेटतात. आजवरच्या सगळ्या राजकारण्यांना ओळखून असलेल्या या माणसांच्या अनुभवाचे जिवंत बोल महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, ‘आजवर सगळ्या लबाडांनी झुलवलंय, दिलंच तर ह्योच बामण मराठ्यांना आरक्षण देईल.’ हे शब्द खरे ठरत आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल शेवटच्या माणसाला असलेला हा विश्वास किती सार्थ ठरला आहे, हे आपण पाहतोच आहोत.
मराठा आरक्षण : प्रयत्नांची परिपूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:02 AM