कोपर्डी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे जे राज्यभर मोर्चे निघत आहेत त्या मोर्चातून मराठा समाजाच्या स्पंदनांची नेमकी नस शोधण्याची जबाबदारी पार पाडण्यापेक्षा स्वयंघोषित माध्यमतज्ज्ञ, तथाकथित पुरोगामी आणि समाजमनाची नेमकी जाण नसणारे दृष्टिहीन विचारवंत या जनशक्तीचा जो विपर्यास करीत आहेत तो दुर्दैवी आहे. एखाद्या समाजाची अस्वस्थता नेमकेपणाने समजून घेण्याऐवजी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातूनच ही सर्व चर्चा होत असल्याने नेमके सत्य पुढे येत नाही हे त्याहून अधिक दुर्दैवी आहे. मराठा समाजात असलेल्या अस्वस्थतेचे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला असता ही खदखद तत्कालीक नाही, तर मराठा समाजाला दुर्लक्षून जाणीवपूर्वक केल्या जाणार्या राजकारणात, समाजकारणात दिसून येते. 'मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले' ही संकल्पना मोडीत काढून मराठा समाजाला वगळून राजकारण, मराठा समाजाला वगळून समाजकारण, असे नवे कारस्थान पद्धतशीरपणे रुजवले जाऊ लागले. 'मराठा तितुका वगळावा' हे ब्रीद राबविण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरू झाले. आजवर बहुजनांच्या हिताचे राजकारण करण्याचा झेंडा मराठय़ांची हाती होता. मराठा समाजाने हे धुरीणत्व यशस्वीरीत्या पार पाडले. राजर्षी शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड आदींनी सामाजिक न्यायाचे जे तत्त्व राबवले ते संपूर्ण बहुजन समाजासाठी होते; पण मराठा समाजाचीच उपेक्षा आणि जाणीवपूर्वक या समाजाला अनुल्लेखाने मारणे सुरू झाले तेव्हा मराठा समाजाच्या मनात एक सल निर्माण झाली. कोपर्डी येथील घटनेनंतर संपूर्ण समाजाने एकवटून जर या घटनेचा धिक्कार केला असता तर आपल्या पाठीशी सर्व समाज आहे ही भावना मराठा समाजात निर्माण झाली असती; पण असे घडले नाही. ज्याप्रमाणे निर्भयावरील अत्याचाराचे देशभर पडसाद उमटले आणि संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला तसे कोपर्डीच्या घटनेबाबत झाले नाही. वस्तुत: दिल्लीतील निर्भयापेक्षाही कोपर्डीची घटना अत्यंत अमानवीय आणि पाशवी होती. मात्र, सर्व समाजाने याबाबत ही संवेदनहीनता दाखविली. त्यामुळे मराठा समाजाला रस्त्यावर यावे लागले आणि मोर्चे काढावे लागले, अशा भावना मोर्चामधील सुशिक्षित तरुणी व्यक्त करीत होत्या. याची दखल सर्व समाजाने संवेदनशीलतेतून घेण्याची गरज आहे. केवळ औपचारिक निषेधातून आपण संवेदनशील आहोत असे म्हणणे संयुक्तिक होत नाही. आज लाखोंच्या संख्येने जे मोर्चे निघत आहेत त्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला दिसत नाही. कोणताही राडा न करता अत्यंत अहिंसक मार्गाने हे मोर्चे निघत आहेत, त्याचे कौतुक करताना कोणीही दिसत नाही; पण मराठा समाजाबद्दल कमालीचा द्वेष फैलवणारे विखारी लेखन सध्या सुरू आहे. स्वाभिमानी मराठा समाज रस्त्यावर उतरल्याबद्दलची पोटशूळ फक्त इतरांमध्येच उठत आहे असे नाही, तो प्रस्थापित मराठय़ांमध्येही उठू लागला आहे. या मोर्चाचे हेही वैशिष्ट्य आहे. मोर्चाच्या सुरुवातीला विद्यार्थिनी चालत होत्या, पाठोपाठ महिला, नंतर मराठा पुरुष, शेवटी सर्व पक्षांचे नेते मागे चालत असताना दिसतात. यातून हे स्पष्ट होते. आजपर्यंत आम्ही तुमच्या मागे होतो; परंतु आम्ही समाज एकत्रितपणे उठाव केलेला आहे. तरी आपण राजकीय नेत्यांनी निमूटपणे पाठराखण करावी. शरद पवारांनी औरंगाबादच्या मोर्चानंतर अँट्रॉसिटीबद्दल जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद उमटल्यानंतर त्यांनी लगेच घूमजाव केले. पवारांच्या आजवरच्या लौकिकाला ते साजेसेच होते. पवारांच्या विधानाने मराठा समाजाचे काही होवो की नाही, दलितांचे मोर्चे निघायला सुरुवात झाली. त्यांच्या विधानानंतर सोशल मीडियावरही चर्चा भरकटायला प्रारंभ झाला. आज महाराष्ट्रात सर्वसामान्य, स्वाभिमानी मराठा समाज पूर्णपणे ताकदीनिशी रस्त्यावर उतरला तो कुणाच्या आव्हानावरून नव्हे. स्वाभिमानी मराठा समाजाची वज्रमूठ उभारली जात असताना प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणाच्याही नेतृत्वाखाली न लढता स्वयंस्फूर्तपणे जर लोक या पद्धतीने संघटित होऊ लागले, तर आपण बेदखल होऊ ही भीती प्रस्थापितांच्या मनात आहे. अन्य जातीय समूह आपापल्या प्रश्नांबद्दल जेव्हा संघर्ष करतात तेव्हा ते सामाजिक न्यायाची लढाई लढतात आणि मराठा जेव्हा आपल्या हक्कांबद्दल, प्रश्नांबद्दल बोलू पाहतो तेव्हा तोच नेमका जातीयवादी कसा काय ठरवला जाऊ शकतो? हरियाणामध्ये जाठ, गुजरातेत पाटीदार आणि अन्य राज्यांत त्या-त्या समाजाने चळवळी केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातही काहींनी चळद अँड. विजय गव्हाणे (मराठवाडा विकास आंदोलनाचे नेते व माजी आमदार )
मराठा आक्रोशाची स्पंदने..
By admin | Published: September 21, 2016 7:56 AM