नाशकात अवकाळी आलेल्या पावसाचे सावट साहित्य संमेलनाच्या उद्घाटन-मुहूर्तावर सरले खरे; पण शहराबाहेरच्या आडगावातला हा साहित्य सोहळा अखेर संमेलनाध्यक्षांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविनाच सुरू झाला. अंगभूत प्रतिभेने जगाच्या अवकाशात लखलखलेली तरीही मराठी मुळांशी आजन्म बांधीलकी जपलेली जी मोजकी मराठी माणसे आहेत; त्यात डॉ. जयंत नारळीकर यांचे स्थान उत्तुंग!! डॉ. नारळीकर युरोप-अमेरिकेत मुक्काम करते आणि तिथल्या हस्तीदंती मनोऱ्यात राहाते; तर ते त्यांनी कमावलेल्या प्रतिष्ठेला साजेसेच ठरले असते; पण ते आपल्या देशात परत आले, एवढेच नव्हे; तर विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेल्या भारतासारख्या देशाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे का महत्त्वाचे आहे, हे सातत्याने सांगत राहिले. ते तिथे थांबले नाहीत. पुण्यात आयुकासारखी जागतिक कीर्तीची संस्था उभारण्यात त्यांनी आपले उत्तरायुष्य खर्ची घातले. त्यांच्यासारख्या वैज्ञानिकानेच विज्ञान-साहित्यही लिहावे, मराठी साहित्यातल्या तोवरच्या वैराण दालनात लेखक-वाचकांची वर्दळ सुरू करावी; हे तर मोठेच अप्रूप ! इतके उत्तुंग कर्तृत्व गाठीशी असताना स्वत:ची अभिजात नम्रता सांभाळण्याचा अस्सलपणा तर मराठीत दुर्मीळच !! - अशा या मीतभाषी सरस्वतीपुत्राचा (आभासी नव्हे, प्रत्यक्ष) सन्मान करण्याची संधी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाने गमावली; याचे कारण साहित्य संस्था म्हणवणाऱ्या बजबजपुरीतील स्वयंघोषित मुखंडांचा करंटेपणा !!
योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या हातात उचित मानसन्मानाची फुले पडूच द्यायची नाहीत, ही आपली राष्ट्रीय खोड ! हा देश मैदानातून निवृत्त होत असल्याच्या दिवशीच चाळिशीतल्या खेळाडूला सर्वोच्च सन्मानाचे ‘भारतरत्न’ प्रदान करण्याइतका तत्पर आहे म्हणून दाद द्यावी; तर अवघ्या ब्रह्मांडाला आपल्या स्वरवैभवाने गुंगवून टाकणाऱ्या स्वरभास्कराच्या खांद्यावर हीच ‘भारतरत्न’ शाल इतक्या उशिराने पडते; की जर्जर झालेल्या त्या कायेला नेमके काय चालू आहे हे कळेनासेच झालेले असते... अशा पार्श्वभूमीवर संकेत, अभिजातता, सुसंस्कृतता या कशाशी काही देणेघेणेच न उरलेल्या साहित्य संस्थांकडून तरी काय वेगळी अपेक्षा करावी? या जगातली गणितेच उफराटी. ज्यांची ‘उपद्रव क्षमता’ मोठी आणि जातीपातीचे हुकमी एक्के उगारून मतांचे जुगाड जमवण्याची ताकद भक्कम असे कितीतरी ‘साहित्यिक’ ऐन पन्नाशी-साठीत संमेलनाच्या अध्यक्षपदाचे मानसन्मान साग्रसंगीत उपभोगून बसले... पण अध्यक्षस्थानावरून ज्यांना ऐकण्यासाठी सामान्य मराठी माणसाने जीवाचे कान केले असते; ते फादर दिब्रिटो असोत, की डॉ. जयंत नारळीकर; यांचे पत्ते काही साहित्य महामंडळाला ‘वेळेत’ सापडू शकले नाहीत. अर्थात हे दोघे थोडेतरी भाग्यवान ! अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोडेबाजार बंद झाला, म्हणून लोकलाजेस्तव का असेना; त्यांची नावे अध्यक्षपदाच्या यादीत आली तरी ! बिचारे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशांसारख्या साहित्यिकांना तर त्यांच्या अख्ख्या हयातीत साहित्य महामंडळाने हिंग लावून विचारले नाही- हे सारे कुठवर चालणार? त्याची लाज, किमान खंत तरी संबंधितांना वाटणार का?
वयोमानानुसार गात्रे थकल्याने प्रवासाचा, संभाव्य संसर्गाचा ताण सहन करण्यापलीकडे गेलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांची अनुपस्थिती साहित्य संमेलनाच्या इतिहासात नोंदली जाईल हे खरे, पण त्याचे तिकीट साहित्य महामंडळाच्या (आजी-माजी) निबर, अहंमन्य पदाधिकाऱ्यांच्या नावानेच फाडले गेले पाहिजे. संमेलनाध्यक्षांना रस्तामार्गे प्रवासाचा ताण नको म्हणून त्यांना चॉपरने, नंतर विमानाने नाशिकला ‘आणले’ जाण्याच्या चर्चांनाही अभिजात अगत्यापेक्षा पैशाच्या बळावर काय वाट्टेल ते जमवता येते या उर्मट बेफिकिरीचा वासच अधिक होता. या उर्मट व्यवहारांमुळेच जाणते लेखक आणि सुज्ञ वाचकही स्वत:ला अखिल भारतीय म्हणवणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनांपासून दुरावले आहेत. भपक्याचा रुबाब तेवढा मिरवणाऱ्या या मांडवातले अगत्य संपले आहे, आणि चैतन्य लोपले आहे. दरवर्षी दोन-तीन-पाच कोटी जमवू शकणारे बाहुबली यजमान शोधायचे, त्यांच्या खिशात हात घालायचे आणि वरून त्यांनाच नैतिकतेचे धडे शिकवत बसायचे हा उपद्व्याप मराठी साहित्य महामंडळाने आतातरी बंद करावा... आणि महत्त्वाचे म्हणजे, समस्त मराठी माणसांच्या वतीने कृतज्ञतेची उबदार शाल पुण्याला जाऊन डॉ. जयंत नारळीकर यांच्या थकल्या खांद्यांवर सन्मानाने पांघरण्याची कृपा करावी, एवढीच विनंती !