संजय नहार
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला व्यापक रूप दिलं ते लोकांनी एकत्र यावं म्हणून. एकत्र येत स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घ्यावं म्हणून. असं म्हटलं जातं की, भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली; मात्र लोकमान्य टिळकांनी त्याला राष्ट्रीय, राजकीय आणि सार्वजनिक रूप दिलं. राजकीय आणि राष्ट्रीय कारणांसाठी सुरू झालेल्या या गणेशोत्सवाच्या परंपरेतला जोडण्याचा धागा अधोरेखित करण्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे काश्मीरच्या लाल चौकातला गणेशोत्सव. यंदा कोरोनाच्या संकटातही काश्मीरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात साधेपणानं गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. दत्तात्रय सूर्यवंशी, भारत खेडेकर, लक्ष्मण पाटील, प्रताप येवले, अनुप सावंत अशा काही सांगोला-माण-खानापूर-कडेगाव-तासगाव-आटपाडी या सातारा-सांगली-सोलापूर भागातल्या सोन्याची कारागिरी करणाऱ्या गलाई समाजातील मराठी लोकांच्या पुढाकारानं यंदाही लाल चौकातल्या गणेशोत्सवाची प्राणप्रतिष्ठा केली. याप्रसंगी विभागीय आयुक्त पांडुरंग पोळे यांची उपस्थिती म्हणजे काश्मीरच्या सामाजिक ऐक्याच्या व धार्मिक एकोप्याच्या परंपरेचं एकप्रकारे प्रतिनिधित्वच म्हणावं लागेल.
खरं तर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवास प्रारंभी परवानगी नाकारली होती. हिंदू सण, तोही मुस्लिमबहुल भागात होणार, शिवाय पूजेला काही लोक जमणार, त्यामुळं केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी यंदा गणपती बसवू नये, अशी विनंती केली होती. मात्र, पांडुरंग पोळे यांनी या परंपरेचं सामाजिकदृष्ट्या असलेलं महत्त्व लक्षात आणून दिल्यानंतर ही परवानगी दिली. काश्मीरमध्ये गणेशोत्सव धार्मिक असतो. याच गणेशाचं नातं काश्मीरशीही आहे. गणपती हा पार्वतीचा पुत्र आणि अनेक पुराणकथांमध्ये काश्मीरला पार्वती म्हटलं आहे. त्यामुळं काश्मीरमध्ये गणेशभक्तीचं आगळंवेगळं रूप पाहायला मिळतं. काश्मिरातील अनेक मराठी कुटुंबं स्वातंत्र्याच्या आधीपासून तेथे आहेत. तिथं ते १० दिवसांचा गणपती बसवितात. गेल्या ३८ वर्षांपासून लाल चौकातील हनुमान मंदिरात सार्वजनिकरीत्या गणेशमूर्ती बसविली जाते. तिचं अनंत चतुर्दशीला झेलम नदीत विसर्जन केलं जातं. या उत्सवात मुस्लिमबांधवही एकोप्याने सहभागी होतात.
काश्मीरचा लाल चौक म्हटलं तर रक्तरंजित, दहशतीच्या छायेखाली असलेला परिसर, अशीच ओळख डोळ्यासमोर येते. जमावबंदी व संचारबंदी या भागासाठी काही नवी नाही. साहजिकच हा चौक म्हणजे विसंवादाचं प्रतीक, हीच प्रतिमा जनमानसावर ठसली आहे. गेल्या ३८ वर्षांपासून इथं होत असलेल्या गणेशोत्सवानं या प्रतिमेला छेद दिला. लाल चौकातील गणेशोत्सवासाठी मूर्तीदेखील दरवर्षी महाराष्ट्रातून जाते, हा आणखी एक महत्त्वाचा संदर्भ. ३७० कलम काढल्यावर जी अभूतपूर्व तणावाची परिस्थिती गतवर्षी निर्माण झाली, त्यात ही परंपरा खंडित होते की काय, असं वाटू लागलं. तेव्हा सरहद संस्थेनं पुढाकार घेऊन लाल चौकातील गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती पाठविण्याचं नियोजन केलं. ही मूर्ती ज्येष्ठ इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी काश्मीरमध्ये नेली.
महाराष्ट्र आणि काश्मीर यांच्यातले ऋणानुबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत. ही परंपरा लाल चौक व परिसरात राहणाºया मराठी मंडळींनी सुरू ठेवली आहे. लाल चौकाच्या परिसरात जवळपास २०० मराठी लोक राहतात व ३०० पेक्षा जास्त मराठीबांधव कोरोना आणि संचारबंदीमुळं महाराष्ट्रात परतले आहेत. मुख्यत: श्रीनगरमधील हरिसिंग स्ट्रीट, शहीद गंज या भागात त्यांचं वास्तव्य आहे. काही कुटुंबांचं गेल्या ६० वर्षांपासून तिथं वास्तव्य आहे, तर काही कुटुंबं वर्षांतील काही महिने इथं वास्तव्यास असतात.काश्मीर खोºयातल्या सोपोरपासून ते पुलवामापर्यंत इतर मराठी मंडळी विखुरलेली आहेत. हे सगळे मराठी लोक तेथे घरी गणेशोत्सव साजरा करतात. डाऊन टाऊनमधल्या अनेक गणेश मंदिरांमध्येही गणेशोत्सव सुरू झाला. नुकतीच तेथे संचारबंदी असताना कृष्णजन्माष्टमीचा उत्सवही साजरा झाला.
काश्मीरच्या लाल चौकात साजरा होणारा गणेशोत्सव ही खरं तर महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी घटना आहे. काश्मीरमध्ये इतर ठिकाणीही गणेशोत्सव साजरा केला जातो; पण लाल चौकाला हिंदूविरोधी किंवा भारतविरोधी भावनांचं सर्वांत मोठं प्रतीक मानलं जातं. त्यामुळंच तिथल्या गणेशोत्सवाला वेगळं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या संत परंपरेवरसुद्धा काश्मीरच्या शैवपरंपरेचा मोठा प्रभाव पडला आहे. त्या अर्थानं जिथून एकोप्याचा विचार सर्वत्र गेला, तेथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं नातं अधिक बळकट झालं आहे, असं म्हणावं लागेल.
(लेखक सरहद संस्था, पुणेचे संस्थापक आहेत)