- सुधीर महाजन (मराठवाडा)३१ वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी मधुकर सरपोतदार, साबीर शेख यांच्या उपस्थितीत रमेश आमराव, सुभाष पाटील, परशुराम वाखुरे यांनी औरंगाबादेत शिवसेना शाखेची स्थापना केली. या घटनेची काँग्रेसच्या गोटात फारशी दखल घेतली गेली नसली, तरी औरंगाबादचे वातावरण सेनेच्या वाढीस पोषक ठरले. त्यावेळी औरंगाबादच्या राजकारणावर मुस्लिमांचा प्रभाव होता. आ. अमानउल्ला मोतीवालांचे वर्चस्व आणि औरंगाबाद शहरात होणाऱ्या जातीय दंगली आणि त्यामुळे सतत असणारा तणाव. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सामान्य माणसाच्या मनात असणारा असंतोष. याला शिवसेना हा योग्य पर्याय सापडला. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांची आक्रमक भाषा, कडवे हिंदुत्व आणि शिवसेनेची आक्रमकता यामुळे औरंगाबाद शहरात शिवसेना फोफावली. तरुण तिकडे वळला. १९८५, १९८६ आणि १९८७ साली झालेल्या जातीय दंगलींमध्ये शिवसेनेने हिंदूंची बाजू घेतली आणि सेना भक्कम झाली. महापालिका जिंकल्यानंतर शिवसेना ग्रामीण भागात पसरली. हाच काळ विद्यापीठ नामांतराचा होता. नामांतरवादी आणि विरोधी, असे दोन तट पडले होते. सेनेने येथे विरोधाची भूमिका घेतली. जातीच्या राजकारणाच्या रेषा त्याचवेळी स्पष्ट होत्या. आज ११ आमदार आणि तीन खासदार अशी सेनेची राजकीय ताकद आहे. बलस्थाने : शिवसेनेच्या बलस्थानांचा विचार करताना तिची दुहेरी रचना महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधी आणि संघटनाप्रमुख अशी वेगवेगळी रचना आहे. या संघटनेत आमदार-खासदारापेक्षा जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख प्रभावी दिसतो. संघटनात्मक पदाचे महत्त्व कायम आहे. आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची क्षमता असलेला हाच एकमेव पक्ष दिसतो. वरून आलेल्या कोणात्याही आदेशाचे पालन बिनबोभाट होते आणि बाळासाहेबांनंतरसुद्धा संघटनात्मक चौकट कायम आहे.कमकुवत बाजू : आक्रमकपणा हा शिवसेनेचा स्थायीभाव होता. सेना आता पूर्वीसारखी आक्रमक राहिली नाही. आता तर सत्तेत असूनही नसल्यासारखे सेनेचे वागणे आहे. धड सत्ताधारी नाही आणि विरोधी पक्षही नाही, अशी अवस्था आहे. संघटना बांधणी नाही. राजकारणात खुशमस्कऱ्यांना महत्त्व आले आहे. हे सेनेतील गुणदोष असतील तरी मराठवाड्यात भगव्याचे आकर्षण आहे. फक्त कोणता भगवा हा प्रश्न आहे.
मराठवाड्यात आजही सेनेचाच दबदबा
By admin | Published: June 18, 2016 6:26 AM