सत्तेचा बाजार.. काकांची देशमुखी..
By सचिन जवळकोटे | Published: August 15, 2021 07:08 AM2021-08-15T07:08:31+5:302021-08-15T07:09:25+5:30
लगाव बत्ती...
सचिन जवळकोटे
काळ किती हुश्शाऽऽर असतो बघा. दोन वर्षांपूर्वी ‘थोरले काका बारामतीकरां’नी स्वत:हून ‘कुमठ्या’च्या ‘दिलीपरावां’ना कॉल केलेला. ‘बळीरामकाकांच्या लेकराला सभापतीपदी बसवा’ असा स्पष्ट आदेश त्यांनी देऊनही शेवटपर्यंत ‘जितेंद्र’ना ‘खुर्चीचा तोहफा’ काही मिळालाच नाही. आता खुद्द ‘अजितदादां’नी याच वडाळ्याच्या ‘बळीरामकाकां’ना कॉल करून सांगितलं की ‘मानेंना खुर्चीवर बसवा!’.. किती योगायोग पाहा. दोन वर्षांपूर्वी ‘मानें’नी जशी ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतली होती, अगदी तेच पात्र आता ‘काकां’नीही रंगविलं. ‘कुमठ्या’चा वचपा ‘वडाळ्या’नं बरोबर काढला. काळ हसला की नियती रुसली, माहीत नाही. ‘बाजार समिती’ची खुर्ची पुन्हा एकदा ‘मानें’ना वाकुल्या दाखवून दूर पळाली.
‘नरोळें’ची नकारघंटा.. धोक्याची घंटा !
खरंतर जिल्ह्याच्या राजकारणात ‘सोलापूरबाजार समिती’ ही तशी खूप छोटी अन् कोपऱ्यातली संस्था. केवळ गोरगरीब शेतकऱ्यांपुरती सीमित असलेली; मात्र काही वर्षांपूर्वी ‘गाळ्यातही मोठा गाळा’ मिळतो, हे लक्षात येताच अनेक ‘प्रोफेशनल नेते’ या समितीकडं आकर्षित झाले. ‘बळीराजाची समाजसेवा’ हे ध्येय केव्हाच मागं पडलं. ‘नेत्यांचा बिझनेस’ केबिनमध्ये रंगू लागला. ‘पेट्या’ फक्त द्राक्षं किंवा आंब्याच्याच नसतात, हेही इथल्या नेत्यांनी ओळखलं. ‘मालाची आवक’ वाढत चालली. संचालकांनाही ‘घरबसल्या पोहोच’ मिळू लागली, तसा सत्तासंघर्ष अधिकच वाढत गेला.
याच समितीत गेल्या निवडणुकीत ‘दोन देशमुख’ एकमेकांसमोर उभे ठाकले. विशेष म्हणजे दोघेही एकाच पक्षातले. एकाच सरकारमधले मंत्री. त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं. ‘हात’ अन् ‘घड्याळ’वाली मंडळी या धर्मयुद्धात ‘विजयकुमारां’च्या बाजूनं उभी ठाकली. खरंतर ‘सुशीलकुमारां’ना ही अभद्र युती आवडली नव्हती; मात्र ‘जनवात्सल्य’वर ‘दिलीपरावां’नी पुढची समीकरणं उलगडून दाखविली. ‘सुभाषबापूंची ताकद वाढली तर आपल्याला खूप त्रास होईल,’ हे पटवून देण्यात ‘माने’ यशस्वी ठरले. होकार मिळाला खरा; मात्र ‘विजयकुमारांचा भस्मासुर झाला तर आपलं अवघड होईल’ ही तेव्हा खासगीत व्यक्त केलेली भीती आता प्रत्यक्षात खरी ठरली.
गेल्या आठवड्यात ‘लगाव बत्ती’तून स्पष्टपणे सांगितलं होतं की, बाजार समितीत राजकीय भूकंप होणार. अगदी तस्संच झालं. ‘विजयकुमारां’नी राजीनामा द्यावा यासाठी हालचाली सुरू झाल्या. ‘यानू माडादूऽऽ ह्यांग माडादूऽऽ’ या दोन्हींचाही प्लॅनिंग डाटा ‘हसापुरें’च्या डोक्यात तयार होता. आता हे ‘सुरेश’ म्हणजे ‘लोकल पीके’ होऽऽ. पीके म्हणजे ‘प्रशांत किशोर’ म्हणे.
‘विजयकुमारां’ना भेटूनही त्यांचा राजीनामा येईना. ‘प्लॅन ए’ फेल गेला म्हटल्यावर ‘प्लॅन बी’ बाहेर काढला गेला. ‘म्हेत्रें’च्या बंगल्यावर ‘श्रीशैल’अण्णांना बोलावून घेतलं गेलं. आपलं पद काढून घ्यायला ‘पीके’च आसुसलेत, हे ‘नरोळें’च्या पूर्णपणे लक्षात आलेलं. कारण दोघांतली दुश्मनी अवघ्या तालुक्याला ठाऊक असलेली. त्यांनी राजीनाम्याचं पत्र ‘अण्णां’च्या पायथ्याशी ठेवून ‘सिद्धाराम निष्ठा’ सिद्ध केली. मात्र त्यानंतर ‘पीकें’नी पुढं केलेला अजून एक नवा कागद पाहताच ते दचकले. चमकले. ‘अण्णां’कडं अविश्वासानं पाहू लागले; कारण तो कागदच ‘विजयकुमारां’वरील अविश्वास ठरावाचा होता.
दोन्ही हात जोडत ‘नरोळें’नी सही करायला स्पष्टपणे नकारार्थी मान हलवली. त्यांचा हा अनपेक्षित नकार पाहताच ‘म्हेत्रे-हसापुरे’ दचकले. त्यांच्या हातातला कोरा कागद कोराही रह गया. ‘पीकें’ची स्किम गंडली. ‘म्हेत्रें’च्या ‘लक्ष्मी सदन’मधून ‘नरोळे’ बाहेर पडले; मात्र ते गेल्या दोन वर्षांतल्या समितीच्या ‘लक्ष्मी’ला जागले. यामागे खरा ब्रेन होता ‘देशमुखां’चा.
‘विजयकुमार’ तसे खूप हुशार. क्षणिक फायदा न बघता ‘लाँगलाईफ’ विचार करणारे. दोन वर्षांपूर्वी ‘कुमठे’ नको म्हणून ‘बळीरामकाकां’नी ‘देशमुखांचा वाडा’ जवळ केलेला. त्यातून ध्यानी-मनी नसताना सभापतीपदाची लॉटरी फुटलेली. त्याचवेळी अत्यंत चाणाक्षपणे ‘देशमुखां’नी सर्व सूत्रं ‘नरोळें’च्या ताब्यात दिलेली. केवळ सह्यांचे अधिकारच नव्हे, तर सभापतींची गाडीही देऊन टाकलेली. या काळात समितीत अनेक रस्ते झाले. अनेकांचे खिसेही ‘चकचकीत’ झाले. ‘सबका विकास’ डोक्यात ठेवून ‘घासातला घास’ सर्वांना घरपोच देण्याची नवी संस्कृतीही रुजविली गेली.
पूर्वी म्हणे ‘एकट्यानंच खा-खा खायचं अन् बाकीच्यांनी आशाळभूतपणे उपाशीपोटी बघत राहायचं’ असे प्रकार घडलेले. त्या पार्श्वभूमीवर ‘खाओ-खिलाओ’ चा ‘डीएन’ पॅटर्न अनेकांना आवडलेला. ‘डीएन’ म्हणजे ‘देशमुख-नरोळे’ होय.
यामुळंच भरल्या पोटी तृप्त झालेल्या मंडळींसाठी ‘सभापती’ जणू देवमाणूस बनले तर ‘उपसभापती’ चक्क कुबेर. त्यामुळं गेल्या दोन वर्षांत या मंडळींच्या मानसिकतेत प्रचंड बदल झालाय, हे ना ‘म्हेत्रें’ना कळालं ना ‘मानें’ना समजलं. त्यामुळं ‘आपली माणसं सह्या करायला तयार नाहीत’ या धक्क्यातून न सावरलेल्यांनी घेतला थेट ‘बारामती’चा सहारा. आगामी विधान परिषदेसाठी ‘मानें’ना ‘एम व्हिटॅमिन’ पुरवायचं असेल तर त्यांनाच सभापती करा, या भाषेत ‘अजितदादां’नी ‘बळीरामकाकां’ना कॉल करून सांगितलं. काका गडबडले.
अशातच ‘राजन अनगरकर अन् यशवंत इंदापूरकर’ यांनाही ‘दादां’नी थेट वडाळ्याला पाठवून दिलेलं. किमान त्यांचं तरी ऐकतील म्हणून. ‘ज्यांनी आपल्या मुलाला गेल्या दोन-तीन वर्षांपासून नुसतं फिरवत ठेवलंय, ते आता पक्षीय पातळीवरून आपल्यावर दबाव आणताहेत,’ हा गुप्त निरोप तत्काळ पोहोचवला गेला ‘देशमुखां’च्या गोटात. ‘विजयकुमार’ सावध झाले. ते खरंतर राजीनामा द्यायच्या मूडमध्ये होते. मात्र आता त्यांनी नवं अस्त्र बाहेर काढलं, ‘शेळके किंवा साठे यांचं नाव फायनल करा. मी लगेच खुर्ची सोडतो.’
याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत ‘दिलीपराव’ सभापती होणं ‘विजयकुमारां’ना नको होतं. केवळ त्यांनाच नव्हे तर समितीतल्या बहुतांश जणांनाही नकोच होतं. ‘बळीरामकाका’ तर त्याही पुढचे निघाले. ‘तुम्हीच राहा आता या खुर्चीवर’ असं त्यांनी स्पष्टपणे म्हणे देशमुखांना सांगितलं. तसा ठामपणे निर्णयही जाहीर केला.
किती गंमत पाहा..‘काका’ हे ‘घड्याळ’वाल्या पार्टीचे अध्यक्ष. ‘विजयकुमार’ हे ‘कमळ’वाल्यांचे आमदार. ‘नरोळे’ हे ‘हात’वाल्यांचे चेले. तरीही उपमुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावून त्यांनी दाखविली ‘सर्वपक्षीय एकात्मता’. आता ‘लक्ष्मी’ला कोणताच जात-धर्म नसतो. पक्षही नसतो हा भाग वेगळा.
जाता जाता : ‘तुमच्या दोन संचालकांनाही अविश्वास ठरावावर सह्या करायला सांगा,’ अशी विनंती करायला ‘हसापुरे’ म्हणे थेट ‘सुभाषबापूं’च्या बंगल्यावर गेले. तिथं नेहमीप्रमाणं ‘माझं कोण ऐकतंय’ची टेप ऐकवली गेली. मात्र तिथून ते बाहेर पडताच दुसऱ्या क्षणाला ‘बापूं’चा कॉल थेट देशमुखांच्या ‘विक्रम’ना. ‘विजयकुमारांच्या विरोधातील या मोहिमेत आम्ही उतरणार नाही,’ असं स्पष्टपणे ‘बापूं’नी सांगितलं. आता ही ‘अंदर की बात’ ओपन झाल्यामुळं भोळ्याभाबड्या जनतेला वाटेल की, दोन्ही देशमुख एकत्र आले वाटतं.. पण तसंही नाही. ‘माने’ पुन्हा मोठे झाले तर ‘बापूंना ‘दक्षिण’मध्ये भविष्यात परवडणार नव्हतं. ‘मनीषभैय्या’च्या बांधणीत बिलकुल रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळं ‘घरातली ईषा’ परवडली; मात्र ‘बाहेरचा द्वेष’ नको, हेच या मागचं समीकरण होतं.
होटगी मठापर्यंत पोहोचली मंडळी..
एका छोट्या यार्डाच्या राजकारणात खुद्द उपमुख्यमंत्री उतरलेत, हे समजताच सारे डायरेक्टर एकत्र जमले. अनेकांनी आपल्या खिशात ठेवलेले पेनही पटापटा अडगळीत टाकून दिले, सही न करण्यासाठी. आता तर हा विषय होटगी मठापर्यंत जाऊन पोहोचलाय. ‘म्हेत्रे-देशमुख-हसापुरे-इंदुमती’ ही सारी मंडळी तिथं जाऊन आलीत. विशेष म्हणजे ‘बळीरामकाका’ही दर्शन घेऊन आलेत. आता ही कुठली ‘नवी लॉबी’ म्हणायची ?
‘अजितदादां’चं वजन वापरूनही फासा उलटा पडला, हे लक्षात येताच ‘दिलीपरावां’नी त्याच रात्री मीडियाला फोन करून स्पष्टपणे सांगितलं, ‘आय ॲम नॉट इंटरेस्टेड’. मात्र त्यांचा स्वभाव पाहता असं झटकन हार मानणाऱ्यांमधले ते नाहीत. ते नक्कीच गप्प बसणार नाहीत. काही काळ दम धरतील. या विश्रांतीच्या काळात कदाचित आत्मचिंतनही करतील. आपल्याला बरेच जण टाळताहेत.. ते भीतीपोटी की द्वेषापोटी, याचाही शोध घेतील.
खरंतर लोकांना मॅनेज करण्यात ते भलतेच माहीर. वेळ पडली तर थेट दुश्मनाच्याही घरी जातील. बंद दरवाजाआड ‘जादू की झप्पी’ करतील. बाहेर येताना मात्र दुश्मनाच्या खांद्यावर हात ठेवून दिलखुलास हसत येतील. मात्र ही ट्रीक प्रत्येकवेळेला चालत नाही, याचा अनुभव त्यांना आता येऊ लागलाय. ही संचालक मंडळी आपल्यापेक्षाही थोडीशी हुशार आहे, हेही कळू लागलंय.
ता. क. : खुद्द ‘अजितदादां’चा शब्द धुडकावून लावणाऱ्या ‘बळीरामकाकां’नी किमान पक्षनिष्ठेची तरी जाणीव ठेवावी, असा सल्ला ‘कुमठा’ परिसरातून दिला जातोय. कदाचित ‘घड्याळ’वाल्यांच्या पक्षात अधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर ‘दिलीपराव’ त्यांना नक्कीच पक्षनिष्ठा शिकवतील ही भाबडी आशा.
लगाव बत्ती..