- विजया रहाटकरभाजप राष्ट्रीय सचिव,(माजी अध्यक्षा, महाराष्ट्र महिला आयोग)
देशभरात लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल भरपूर चर्चा सुरू आहे. त्यात व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकापासून संस्कृतीरक्षकांचा लिव्ह इन रिलेशनशिपला पूर्ण विरोध, अशी टोकाची मते व्यक्त होताना दिसतात. पण भारतीयांनी आधुनिक जीवनशैली अंगीकारताना त्यातले सांस्कृतिक अंग विसरलेच पाहिजे, असे नव्हे. भारतीय विचाराच्या परिप्रेक्षात व्यक्ती स्वातंत्र्याला निश्चित महत्त्व आहे. यात व्यक्ती, मतं, धर्म, अभिव्यक्ती या सर्व स्वातंत्र्यांचा समावेश नक्की आहे. पण व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक मात्र अजिबात अभिप्रेत नाही. भारतीय विचाराच्या परिप्रेक्षात व्यक्ती स्वातंत्र्य आणि समष्टी विचार - विकास यात परस्पर सहयोग दिसतो.
मुळात लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये तरी कशी आली आणि कशी रुजली?- त्यामागे कुटुंबेतर व्यक्ती संस्थात्मक विचार अधिक आहे. जो विचार भारताचा नव्हे! कारण कुटुंब हे तर भारतीय संस्कृतीचे खरे वैशिष्ट्य! भारतीय संस्कृतीत जे चार आश्रम मानले गेले आहेत, त्यामधला मुख्य गृहस्थाश्रम हा कुटुंब प्रणालीचा हा अपरिहार्य घटक आहे. कुटुंब प्रणालीत उभय मान्य वैवाहिक संस्कार संबंधांना अधिक महत्त्व आहे, अधिकृतता आहे! यात “संस्कार” या शब्दाला अधिक महत्त्व आहे. कारण विवाह हा भारतीय विचारानुसार “संस्कार” आहे, तर लिव्ह इन रिलेशनशिप हा “व्यवहार” आहे!! इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास लिहिताना “कुटुंब” घटकावर या अर्थाने विशेष भर दिला आहे.
केवळ पाश्चात्य संकल्पना म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपवर आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि तसा हेतूही नाही. पण ज्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये फक्त दोनच व्यक्तींचा विचार आहे आणि कुटुंब विचार हा त्यात अनुस्युत नाहीच, तो विचार भारतीय नाही. स्त्री सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा घटक इथे दुय्यम स्थानावर जातो. कोणाही जीवाची, विशेषतः महिलेच्या जीवाची किंमत मोजून लिव्ह इन रिलेशनशिप हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही! जर महिलाच सुरक्षित नसेल, तर लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेलाच छेद जातो. शिवाय स्त्री-पुरुषामधले नाते निर्माण करताना, टिकवताना आणि फुलवताना जी मूलभूत सपोर्ट सिस्टिम लागते, ती भारतीय कुटुंब संस्था विवाह या “संस्कार” संकल्पनेतून मिळवते. आज कुटुंबे विभक्त झाली आहेत. ही सपोर्ट सिस्टिमच डळमळीत झाली आहे.
अनेकदा कौटुंबिक उत्तरदायित्व नको म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडला जातो, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. उत्तरदायित्व नको असलेले संबंध ही लिव्ह इन रिलेशनशिपची पूर्वअट किंबहूना व्याख्या असता कामा नये. लिव्ह इन रिलेशनशिपमधूनच गेल्या काही वर्षांमध्ये महानगरांमध्ये ज्या अमानुष घटना घडल्या, त्यातला एक महत्त्वाचा धागा कुटुंबाच्या पाठिंब्याअभावी निर्माण झालेल्या महिला असुरक्षिततेचा आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधून महिला सुरक्षितता हा घटक दुर्लक्षित राहणे अक्षम्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे लिव्ह इन रिलेशनशिपला आज अप्रत्यक्षपणे भले कायदेशीर मान्यता असेल, पण त्याबाबत स्वतंत्र कायदा झालेला नाही. तो जितका लवकर होईल, तितके चांगले! पण तरीही कुटुंब जीवन हे भारतीय विचार प्रणालीतले परिपूर्ण जीवन आहे आणि ते आधुनिक काळातही भारतीय राज्यघटनेचा लेटर अँड स्पिरिटमध्ये अवलंब करतानाही मान्य केले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे.