जुळ्या भावांवरचे, जुळ्या बहिणींवरचे किंवा डबल रोल असलेले असंख्य चित्रपट तुम्ही आजवर पाहिले असतील. त्यातील गमती-जमतींनी तुम्ही हरखूनही गेला असाल... आठवा नुसती यादी... बॉलिवूडचे अनेक चित्रपट तुमच्या डोळ्यांसमोरून तरळत जातील..
दिलीप कुमारच्या ‘राम और श्याम’पासून सुरू झालेला हा सिलसिला नंतर सीता और गीता (हेमा मालिनी), चालबाज (श्रीदेवी), किशन-कन्हैया (अनिल कपूर), जुडवा (सलमान खान), बडे मियाँ-छोटे मियाँ (अमिताभ आणि गोविंदा), दुश्मन (काजोल), कहो ना प्यार है (हृतिक रोशन), कमिने (शाहिद कपूर), रावडी राठोड (अक्षय कुमार), तनु वेड्स मनु रिटर्न्स (कंगना रनौत)... असा कितीही वाढवता येईल. डबल रोलची ही क्रेझ अजूनही संपलेली नाही आणि नियमित कालावधीनंतर असे चित्रपट सातत्यानं येतही असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यातही असे डबल रोल आपल्याला दिसले तर? त्यावेळीही आपल्याला आश्चर्यच वाटतं. कारण हे डबल रोल इतके हुबेहूब असतात की यातला कोण, नेमका कोणता हे सांगणं आपल्याला फारच अवघड जातं. आपल्यालाच काय, त्यांच्या सख्ख्या आई-वडिलांना, नवऱ्याला किंवा बायकोलाही त्यांना ओळखणं अवघड जातं.
त्याहून अफलातून असा एक किस्सा घडला आहे, तो अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात. अर्थात हा किस्सा नाही, तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे; पण त्यातून अनेक ‘किस्से’ मात्र घडले आहेत.
ब्रियाना आणि ब्रिटनी डिन या दोन्ही सख्ख्या बहिणी. दोघीही जुळ्या आणि तंतोतंत एकमेकींसारख्या दिसणाऱ्या. त्यात लोकांना चकमा देण्यासाठी हेअर स्टाइल आणि कपडेही अगदी सेम टू सेम घालणाऱ्या. एकीनं एखादी कृती करायची आणि दुसरीला पुढे करायचं किंवा ‘ती मी नव्हेच’ म्हणून कानावर हात ठेवायचे हा प्रकार दोघींनीही अनंत वेळा केलेला. त्यावरून शाळेत शिक्षकांकडून आणि घरी पालकांकडून दोघींनाही रट्टे बसलेले; पण तरीही त्यांनी आपली ही सवय काही सोडली नाही.
त्यांच्यासारखेच जोश आणि जेरेमी सेल्यर्स हे दोघे सख्खे भाऊ. दोघेही जुळे. दोघेही डिट्टो एकमेकांसारखे दिसणारे. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा असे. त्यांचाही या बहिणींप्रमाणेच फंडा. दोघांचीही हेअर स्टाइल सेम. दोघेही सारख्याच रंगरूपाचे कपडे घालणार. लहानपणापासून त्यांच्या खोड्याही तशाच.
या दोघी बहिणी आणि दोघे भाऊ केवळ दिसायलाच सारखे नाहीत, तर त्यांच्या आवडीनिवडी आणि पसंतीही जवळपास सारख्याच. त्यामुळे जे एकाला किंवा एकीला हवं तेच दुसऱ्याला किंवा दुसरीलाही हवं असायचं. त्यांच्यातली ही आवडनिवड अगदी जोडीदारांच्या बाबतीतही सेम होती. आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा, याविषयीचे त्यांचे ठोकताळेही अगदी सेम. इतकेच नाही, त्यांना एकाच दिवशी लग्न करायचं होतं, दोघी बहिणींना तर एकाच वेळी गर्भवती व्हायचं होतं आणि एकाच दिवशी बाळाला जन्मही द्यायचा होता! - आता काय करावं? दोघींना किंवा दोघांनाही एकाच व्यक्तीशी लग्न तर करता येत नाही... पण त्यावरही मार्ग निघाला.
या दोन्ही बहिणी आणि दोघे भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे. त्यांचा एकमेकांशी कधी संपर्कही आला नाही; पण एका टीव्ही शोच्या निमित्तानं या चौघांचा एकमेकांशी परिचय झाला. अमेरिकी टीव्ही चॅनल ‘टीएलसी’च्या ‘एक्स्ट्रीम सिस्टर्स’ या शोमध्ये एकत्रितपणे ते दर्शकांच्या समोरही आले. याच कार्यक्रमादरम्यान त्यांचं एकमेकांशी सूत जमलं. दोन्ही जोडप्यांनी आपापले पार्टनर निवडले आणि याच शोमध्ये या जुळ्यांचं ‘टि्वन वेडिंग’ही झालं!
पण हा किस्सा मात्र इथेच संपलेला नाही. या दोन्ही दाम्पत्यांना जे एक-एक मूल झालं, त्यांचे आईबाप वेगळे असूनही तीही ‘जुळी’ आहेत! दिसायलाही सारखी आहेत. आई-बाप वेगवेगळे असूनही मग ही मुलं ‘जुळी’ कशी? - तर त्याचंही एक ‘शास्त्र’ आहे. (सोबतची चौकट पाहा.) त्यानुसार या मुलांना ‘जुळी’ भावंडं म्हटलं जातं.
‘कझिन्स’ असूनही ‘जुळे’! वयाच्या ३५ व्या वर्षी ब्रियाना आणि ब्रिटनी यांनी ३७ वर्षीय जॉश आणि जेरेमी यांच्याशी २०१८ मध्ये लग्न केलं. या दोन्ही जोडप्यांना मुलं झाली. दोन्ही मुलं सध्या एक वर्षाची आहेत. एका मुलाचं नाव आहे जॅक्स, तर दुसऱ्याचं नाव आहे जेट. आता ही दोन्ही मुलं खरंतर जुळी नाहीत. वेगवेगळ्या दाम्पत्याच्या पोटी ती जन्माला आली आहेत, त्यांच्या जन्मातही तीन महिन्यांचं अंतर आहे, तरीही ही मुलंही ‘जुळी’, एकसारखी दिसणारी आहेत. एवढंच नाही, त्या दोघांचा ‘डीएनए’देखील सारखाच आहे. वेगवेगळ्या आईबापांच्या पोटी जन्माला येऊनही ही मुलं ‘जुळी’ (क्वाटर्नरी ट्विन्स) आहेत. तांत्रिकदृष्ट्या ते ‘कझिन्स’ असले, तरी अशा मुलांना सख्खे भाऊ किंवा बहीण मानलं जातं. जगात अशा जुळ्या भावंडांचं प्रमाण अतिशय दुर्मीळ आहे.