मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रकाश करात यांच्या नेतृत्वात आत्मघाताच्या वाटेने सुरू केलेला प्रवास यापुढेही चालू राहणार आहे असे संकेत त्या पक्षाने अलीकडे घेतलेल्या धोरणविषयक निर्णयातून प्राप्त होणारे आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार या पक्षाच्या पाठिंब्याने आपल्या पहिल्या कारकिर्दीत पुढे होते. त्यावेळी त्या पक्षाच्या सरचिटणीस पदावर असलेल्या करातांनी प्रत्येक वळणावर सरकारला अडविण्याचे व आपल्या पाठिंब्याचे राजकीय मोल वसूल करण्याचे अतिशय संतापजनक धोरण राबविले. देशात होणा-या परकीय गुंतवणुकीला त्यांनी विरोध केला. अमेरिकेशी झालेल्या अणुकराराला विरोध करण्यासाठी त्यांनी थेट भाजपशी मैत्री केलेली दिसली. या अडवणुकीला कंटाळलेल्या डॉ. सिंग यांनी कमालीच्या उद्वेगाने म्हटले ‘प्रकाश करात हे मला त्यांच्या घरगड्यासारखे वागवीत आहेत.’ त्याचवेळी त्यांना आव्हान देत डॉ. सिंग यांनी अणुकरारावर लोकसभेत मतदान घेतले व त्याचवेळी सरकारवर विश्वास दर्शविणारा ठरावही मांडला. त्यात प्रकाश करातांसह भाजप व त्याचे मित्रपक्ष पराभूत झाले आणि सरकारच्या झालेल्या विजयाचा लोकांना झालेला आनंद एवढा मोठा होता की त्यांनी डॉ. सिंग यांच्या आघाडी सरकारला पुन्हा एकवार बहुमत मिळवून दिले. त्या निवडणुकीत करातांचा पक्ष पराभूत होऊन दुर्लक्ष करण्याएवढा लहान झाला. तरीही करातांचा अहंकार शाबूतच राहिला. स्वत:च्या पक्षात त्यांनी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांच्याविरुद्ध पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पिनारायी विजयन यांना जवळ केले आणि मुख्यमंत्र्यांची कारकीर्द अपयशी होईल असे प्रयत्नही केले. मात्र या काळात पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे करातांना सरचिटणीस पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी सीताराम येचुरी या लोकाभिमुख नेत्याची निवड झाली. येचुरींविषयीचा करातांच्या मनातील दुष्टावा तेव्हापासूनचा आहे. येचुरी सध्या राज्यसभेचे सभासद आहेत. त्यांना नव्याने उमेदवारी मिळू नये हा डाव करातांनी पिनारायी विजयन यांच्या मदतीने यशस्वी केला आहे. त्याचवेळी येचुरींनी राष्ट्रीय पातळीवर आखलेल्या धोरणांचाही पराभव करण्याची त्यांनी शिकस्त चालविली आहे. कम्युनिस्टांचा देशातील धर्मांध शक्तींना पहिला विरोध आहे व त्यांना पराभूत करण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट करणे हा येचुरींचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेससोबत एक मर्यादित सौहार्दाचा एकोपा करण्याची तयारी दर्शविली आहे. करातांचा या धोरणाला विरोध आहे. धर्मांध शक्ती विजयी झाल्या तरी चालतील पण काँग्रेससोबत समझोता नको अशी कमालीची एकारलेली व कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाच्या विरोधात जाणारी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुर्दैवाने त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीत व धोरणविषयक समित्यांमध्ये त्यांचे व पिनारायी विजयन यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे पक्षाने येचुरींच्या या धोरणाविरुद्ध आता ठरावही संमत केला आहे. एका लोकाभिमुख नेत्याला उमेदवारी नाकारणे आणि त्याने आखलेल्या धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकजुटीच्या धोरणाला विरोध करणे या दोन्ही बाबी प्रकाश करात यांचे काँग्रेसविषयीचे एकारलेले व टोकाच्या विरोधाचे धोरण स्पष्ट करणाºया आहेत. याच भूमिकांपायी २००९ व २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क्सवाद्यांची जबरदस्त पिछेहाट झाली. तरीही त्यांनाच चिटकून राहण्याचे प्रयत्न प्रकाश करात आणि त्यांचा पक्षातील गट करीत असतील तर ती बाब आत्मघाताच्या वाटचालीचा संकेत ठरणारी आहे. कम्युनिस्ट पक्ष मग तो डावा असो वा उजवा हा प्रथम धर्मांध शक्तींना विरोध करणारा व समाजातील वंचितांच्या वर्गासोबत जाण्याचे धोरण आखणारा पक्ष म्हणून जगात विख्यात आहे. भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्टांची आताची वाटचाल पाहता तो या एकूणच धोरणाला हरताळ फासण्याच्या व धर्मांध शक्ती मजबूत राहतील अशा धोरणाच्या बाजूने जात आहे हे कुणालाही समजणारे आहे. करातांच्या या एकारलेल्या भूमिकेविरुद्ध सोमनाथ चटर्जींनी जोरदार आवाज उठविला आहे. येचुरी यांनी त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली नाही मात्र त्यांना व त्यांच्या सहका-यांना ती तशी करावी लागणारच आहे.
मार्क्सवाद्यांची आत्मघाती वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:49 PM