भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार
मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचा यंदाचा विजेता ठरला आहे जस्टीन नारायण हा भारतीय वंशाचा तरुण. जस्टीनचे यश ही भारतीय उपखंडाच्या खाद्यसंस्कृतीला दिलेली दाद आहे. जगभर प्रसारित होणाऱ्या फूड रिॲलिटी शोजमध्ये मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्यामुळे जस्टीन विजेता झाल्याबरोबर समाजमाध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. स्पर्धा जिंकल्यावर त्याला तब्बल एक कोटी साठ लाख रुपये मिळाले. इतर अनेक फायदे. खाद्य व्यवसायाच्या क्षेत्रातल्या अनेक संधी त्याला आता मिळू शकतात. कँडी पेटेटो टाको किंवा ब्री चीझ आइस्क्रीमसारखे अफलातून पदार्थ सादर करणारा जस्टीन भारतीय पदार्थ तितक्याच सहजतेने करतो. लहानपणी आईने भरवलेला वरण-भात (दाल-राईस) असो की, लहानपणी खालेल्ली कच्ची कैरी, जस्टीनच्या स्वयंपाकात डोकावत राहते.
भारतीय जेवण म्हणजे बटर चिकन, करी आणि कोर्मा, असा एक फार मोठा गैरसमज भारताबाहेर आहे; पण रिॲलिटी शोजमध्ये भाग घेणारे जस्टीनसारखे अनेक जण हा समज खोटा ठरवत आहेत. डाळभातासारखे साधे पोटभरू खाणे असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, ग्रेव्हीज, रोटी नानचे प्रकार; मास्टरशेफच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जस्टीनबरोबर दुसरी फायनलिस्ट होती किश्वर चौधरी. बांगलादेशात मूळ असलेल्या किश्वरने फायनल राउंडला पाँता भात आणि आलू भोरता ही डिश सादर केली. पाँता भात हलक्या आंबवलेल्या पाण्यात बनतो. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणचे हे गरिबाघरचे खाणे. आदल्यादिवशी रात्री उरलेल्या भाताचा दुसऱ्या दिवशी पाँता भात बनतो. हा पदार्थ तिने ‘smoked rice water’ अशा फॅन्सी नावाने सादर केला. तिच्या या कृतीत तिला तिचे मूळ, बांगलादेशचा इतिहास, परिस्थिती आणि खाद्यसंस्कृती याबद्दल बरेच काही सांगायचे होते. तिची पाककृती सोशल मीडियावर व्हायरल होताच मराठी मंडळी फोडणीची पोळी nutty crushed bread म्हणून सादर करायला मोकळी झाली म्हणायची.
या आधीच एक मराठी तरुण मास्टरशेफच्या पाचव्या पर्वात गाजला. ऋषी देसाई. मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूरला महाराष्ट्राच्या खाद्य जीवनात विशेष स्थान. ऋषीने मास्टरशेफ जिंकली नाही तरी इथे मिळालेल्या अनुभवाचा फायदा करून त्याने स्वतःचा फूड शो चालवला. शिवाय भारतीय खाद्यपदार्थांबद्दल त्याचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले.
फॅमिली मॅन या गाजलेल्या वेब शोमधले एक पात्र चेन्नईला गेल्यानंतर म्हणते, आज मला साउथ इंडियन खायचे आहे! त्यावर तिथला स्थानिक चिडून म्हणतो, ‘हे बघ, दक्षिण भारतात पाच राज्ये आहेत, तुला नेमके काय खायचे आहे?’- असेच काहीसे भारताबाहेरच्या भारतीय जेवणाबद्दल आहे. भारतात प्रांतागणिक, समाजागणिक, चालीरीतीगणिक खाद्यसंस्कृती बदलते. ती फक्त करी कल्चरच्या एका नावाखाली प्रसिद्ध झाली ती परदेशी उघडलेल्या पंजाबी उपाहारगृहांमुळे. त्यात भर पडली उडुपी रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या इडली, दोसा या प्रकारांमुळे; पण भारतीय जेवण किती वेगवेगळ्या स्वरूपात सादर होऊ शकते, हे आता अशा रिॲलिटी शोजमुळे जगासमोर येत आहे. शशी चेलय्या या मूळच्या तामिळ बल्लवाचार्याने मास्टरशेफच्या दहाव्या पर्वात विजेतेपद मिळवले. सिंगापूरला आईच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शशी ऑस्ट्रेलियात आला. त्याच्या भारतीय आणि चायनीज पाककृती विशेष गाजल्या.
मास्टरशेफच्या अनेक देशात आवृत्या निघाल्या; पण ऑस्ट्रेलियाची लोकप्रियता इतर कुणालाही लाभली नाही. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांचा समूह आहे. त्यामुळे सादर होणारे पदार्थ विविधांगी असतात. स्पर्धेचे जजेस स्वतः शेफ असतात, खाद्यपदार्थ जोखताना, त्यातील घटक, चवीचे संतुलन (टोकाच्या तिखट, आंबट, खारट चवी नसतानाही, वेगळ्या चवी असणे महत्त्वाचे), सादरीकरण अशा सगळ्या बाबतीत दादा असलेली मंडळी इथे येतात. इतक्या दिमाखदार शोमध्ये जस्टीनला मिळालेले यश भारतीयांना निश्चितच सुखावणारे आहे.
bhalwankarb@gmail.com